विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, मुलभूत शास्त्राची बांधणी करणारा विभाग म्हणून वेगाने प्रगती करत असल्याचे कोविड- 19 च्या उदाहरणाने सिध्द झाले- प्रो. आशुतोष शर्मा

Posted On: 05 MAY 2020 4:20PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 मे 2020

 

आधुनिक काळात विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग शास्त्रात फक्त भर टाकण्याऐवजी मुलभूत शास्त्राची सुविहीत बांधणी करणारा विभाग म्हणून  कात टाकून वेगाने पुढे येत आहे आणि कोरोना विषाणू प्रादुर्भाव ही या दृष्टीने संधी आहे, असे प्रतिपादन विभागाचे सचिव आशुतोष शर्मा यांनी केले. विभागाच्या 50व्या स्थापनादिनाच्या निमित्ताने, एलटेस टेक्नोमिडीयाच्या सहयोगाने ‘कोरोनाशी लढा- शास्त्रीय शोध आणि संशोधनाला चालना’ या विषयावर लाईव वेबीनारमध्ये ते बोलत होते.

शास्त्रज्ञांनी विज्ञान संशोधन सुरू ठेवावे आणि त्यांच्या हाती परिणामकारक तसेच परिवर्तन करणारे निष्कर्ष लागावे,यासाठी त्यांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम विभागाच्या विचाराधीन आहेत. वैज्ञानिक आणि उपयुक्त सखोल संशोधन आणि विकास म्हणजेच Scientific and Useful Profound Research and Advancement (SUPRA)  तसेच Intensification of Research in High Priority Areas (IRHPA), हे त्यापैकीच दोन कार्यक्रम. विज्ञानक्षेत्रात या दोन्ही कार्यक्रमांनी बदल घडवून आणला आहे. यापैकी काही प्रयत्न कोविड-19वर लवकरात लवकर उपाययोजना शोधण्याच्या लढ्यात  आमच्या प्रयत्नांना पाठबळ पुरवित आहे”, असं ते म्हणाले.

डिएसटीअंतर्गत येणाऱ्या काही स्वायत्त संस्थांनी कोविड महामारीवर अनेक पैलू असलेल्या सुचना दिलेल्या आहेत. खाजगी कंपन्या तसेस स्टार्टप्सच्या सहकार्याने त्यावर काम सुरू असल्याचं त्यांना स्पष्ट केलं. बदल घडवण्याच्या प्रक्रियेला विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग निःसंशय वेग देत आहे, आणि त्याची कसोटी घेण्याची वेळ अनायसेच या संकटामुळे आल्याचं त्यांनी नमूद केले.

अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाउंडेशनच्या (NSF) धर्तीवर  असलेल्या  या विभागाचा पाया 3 मे 1971 ला घातला गेला. अमेरिकेची नॅशनल सायन्स फाउंडेशन (NSF) विज्ञान संशोधनाला फक्त निधीपुरवठाच करत नाही तर इतर देशांसोबत या क्षेत्रातील कामकाजात सहभाग नोंदवते तसेच त्याला पूरक धोरण आखते. शास्त्रज्ञ, वैज्ञानिक संस्था एवढेच नाही तर शाळा, महाविद्यालये, पीएचडी करणारे, नवशास्त्रज्ञ, स्टार्टअप्स आणि एनजीओ अश्या विज्ञान क्षेत्राशी या ना त्या कारणाने संबधितांनां भरपूर मदत करणारी बहुआयामी व्यवस्था NSFने उभी केली आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने गेल्या पाच वर्षात केलेल्या प्रगतीबाबत बोलताना आशुतोष शर्मा यांनी विभागाचे बजेट 100 टक्के वाढल्याचा उल्लेख केला. त्यामुळे बऱ्याच क्षेत्रात नवीन संशोधनाला चालना देता आल्याचे त्यांना नमूद केले.

स्टार्टअप्स तसेच नवनिर्माणांची संख्या दुपटीने वाढवणाऱ्या त्यांच्यासाठीच्या निधी (NIDHI) या  कार्यक्रमाचा, तसेच मानक (MANAK) या दरवर्षी 10 लाख शालेय विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मुर्तरूप देणाऱ्या आणि या विद्यार्थ्यांना भविष्यकाळातील शास्त्रज्ञ वा उद्योजक म्हणून विकास करणाऱ्या कार्यक्रमाचा त्यांनी उल्लेख केला.

लघुउद्योजक आणि स्टार्टअप्सना उपयुक्त अश्या उद्योजक आणि विद्यापीठांना जोडणाऱ्या साथी सेंटर्स या 125 कोटींच्या कार्यक्रमाचाही शर्मा यांनी उल्लेख केला.

कला, गणित, दळणवळण यासारख्या विविध क्षेत्रांना जोडणाऱ्या सायबर- फिजिकल सिस्टीमसारख्या अनेक काळाच्या पुढील कार्यक्रमांचाही त्यांनी उल्लेख केला.  नॅशनल मिशन ऑन क्वांटम सायन्स, विज्ञान तंत्रज्ञान आणि त्याचे उपयोजन, सुपरकॉम्प्युटिंग मिशन, तसेच शाश्वत विकास, स्वंयंचलित मशीन्स, हवामानबदल अभ्यास आणि कोविड-19 वरील उपाययोजना यामुळे भविष्यकालीन आव्हानांसाठीची आपली तयारी लक्षात येते असे ते म्हणाले

या विभागाशी (DST) संबधीत स्वायत्त शिक्षणसंस्था, इतर संस्था, नवनिर्माते, शास्त्रज्ञ, स्टार्टअप्स, एनजीओज यांनी अनेक कसोटींच्या क्षणी आपल्या अडचणी बाजूला सारत तात्काळ प्रतिसाद दिला. कोविड-19 च्या लढ्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (DST) 11 मुख्य गोष्टी हाताळल्या. यात मुलभूत संशोधन, मास्क तसेच निर्जंतुकीकरणासाठी एनजीओजना मदत , विज्ञान प्रसार, आणि नॅशनल कॉन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन्स याद्वारे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे याचा समावेश आहे.

अनेक संशोधना आणि उत्पादनात विभागाचा सहभाग आहे.  विभागाच्या अंतर्गत स्वायत्त असणाऱ्या श्री चित्रा थिरुनल इन्सिट्युट फॉर मेडिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजी (SCTIMST)  या संस्थेने 15 नाविन्यपूर्ण उत्पादनांची निर्मिती केली. त्यातील 10  विविध उत्पादकांना थेट वापरासाठी देण्यात आली. सर्वे ऑफ इंडिया या अजून एका संस्थेने तयार केलेली  उपकरणे विविध भागात 3D मॅपिंगसाठी  थेट वापरण्यास देण्यात आली. सुस्पष्ट दिशा, पुरेसा निधी, आणि सखोल वैद्न्यानिक ज्ञान या त्रिसूत्रीने DST करत असलेली वाटचाल देशाला विज्ञान व तंज्ञज्ञान क्षेत्रातील भारताच्या प्रगतीला चालना देईल.

***

M.Jaitly/V.Sahajrao/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1621209) Visitor Counter : 315