आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
रक्तदान हेच जीवन दान रक्त दानासाठी जनजागृती करूया तसेच गरजूंना वेळेवर आणि योग्य किमतीत रक्त मिळेल याची काळजी घेऊ या.
आपण सर्वांनीच रक्तदान करायला हवे.
फिरत्या रक्त संकलन करणाऱ्या गाड्यानी इच्छुक रक्तदात्यांकडून रक्त संकलन करायला हवे तसेच रक्तदात्यांना त्यांच्या निवासस्थानापासून आणण्याची आणि सोडण्याची व्यवस्था करणे आवश्यक: केंद्रीय मंत्री हर्षवर्धन.
Posted On:
04 MAY 2020 5:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 मे 2020
रक्तदान हेच जीवनदान आहे .रक्तदानाप्रति जागरुकता वाढवणे जरुरीचे आहे. तसेच गरजूंना वेळेवर, सुरक्षित आणि योग्य रक्त मिळावे यासाठी नेहमी तयार असले पाहिजे. आपण सर्वांनीच रक्तदान करायला हवे, मग ते कुणाहीसाठी असो. असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी नवी दिल्लीत भारतीय रेड क्रॉस सोसायटी इमारतीत आयोजित रक्तदान शिबिरात केलं.
"थॅलेसिमिया रुग्णांना मी बरेचदा भेट देतो, तसंच ट्विटर वरून किंवा इतर समाज माध्यमांवरून असाध्य रोगांनी पीडित रुग्णांना रक्त मिळण्यासाठी केलेली आवाहने माझ्यापर्यंत येतात. त्यांच्यासाठी नेहमी रक्त उपलब्ध करणं ही आपली जबाबदारी आहे. रक्तपेढीत नेहमीच रक्ताचा पुरेसा साठा असणे आवश्यक आहे."
"अनेक सेवाभावी संस्था, गैरसरकारी सामाजिक संस्था आणि सामान्य माणसांनीही रक्तदानासाठी मोठ्या प्रमाणावर पुढे यायला हवे. त्यामुळेच देशात आवश्यक तेवढा रक्त साठा उपलब्ध होईल", असं ते म्हणाले. "मानवी दुःख कमी करण्यासाठी केव्हाही जे शक्य होईल ते करणे आणि तसे करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आपला उद्देश असला पाहिजे".
रक्त संक्रमणासाठी पुरेसा साठा राखून ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी रेड क्रॉसला केले. इच्छुक रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना घरून आणण्याची आणि सोडण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी केली. याशिवाय आत्ताच्या कठीण काळात फिरत्या रक्तसंकलन गाड्या नियमित रक्तदात्यांच्या निवासस्थानापर्यंत घेऊन त्यांना रक्तदानाला प्रवृत्त करण्याचे काम करण्याच्या सूचनाही त्यांनी रेड क्रॉसला दिल्या. ऐच्छिक रक्तदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांना लेखी सूचना केल्याचे तसेच व्हिडिओ कॉन्फरन्स घेतल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सध्याच्या देशातील परिस्थितीबद्दल बोलताना केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं की नियमित रक्ताची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांसाठी आवश्यक रक्त साठा राखणे covid-19 च्या कठीण काळातही शक्य होत आहे. ऐच्छिक रक्तदानाला चालना मिळावी म्हणून रेड क्रॉस अधिकाऱ्यांची आपण बैठक घेतल्याचे, तसेच रेड क्रॉस सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना आणि रक्त संकलनासाठीच्या वाहनांना 30,000 अनुमती पत्रे मिळण्याची सोय केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
ऐच्छिक रक्तदात्यांचा गौरव करीत केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं की सर्वात श्रेष्ठ मानव सेवा म्हणजे जीवन दान होय. निरोगी व्यक्ती वयाच्या 65 वयापर्यंत दर तीन महिन्यांनी म्हणजेच वर्षातून चार वेळा रक्तदान करू शकते. रक्तदानाचे अनेक फायदेही आहेत . रक्तदान करणाऱ्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहतो, रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी मर्यादित राहते, हृदयविकारापासून संरक्षण मिळते, लठ्ठपणावर नियंत्रण राहते. म्हणजेच रक्तदान ही फक्त मानव सेवाच नाही तर स्वतःच्या आरोग्याची घेतलेली काळजीही आहे अशी पुस्ती त्यांनी जोडली. नियमित रक्तदाता म्हणून आपण आत्तापर्यंत शंभराहून जास्त वेळा रक्तदान केल्याचही त्यांनी सांगितलं. आपण पहिल्यांदा 1971 मध्ये रक्तदान केले, तर ऑक्टोबर 2019 पर्यंत नियमित रक्तदान केल्याचे त्यांनी सांगितले. स्वत:चा किंवा लग्नाचा वाढदिवस यासारखे दिवस खऱ्या अर्थाने संस्मरणीय बनवण्यासाठी रक्तदान करा असे आवाहन त्यांनी केले.
भारतीय रेड क्रॉस सोसायटी ही सेवाभावी संस्था असून त्यांच्या देशभर असलेल्या अकराशे पेक्षा जास्त शाखा दुर्घटना किंवा कोणत्याही आपत्ती काळात आरोग्य आणि मानव सेवेसाठी नेहमीच तत्पर असल्याचा त्यांनी यावेळी नमूद केलं. सोसायटीच्या अश्या प्रकारच्या नेटवर्कमुळे covid-19 प्रकल्पासारख्या परीक्षेच्या घडीलाही आपण रक्तसाठा नियमित ठेवू शकू अशी खात्री त्यांनी यावेळी व्यक्त केली.
घातक विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी भारतानं वेळेवर लॉकडाऊन केल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी सांगितले. लॉकडाऊन-3 चं कसोशीने पालन करायचं आवाहन त्यांनी केलं. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन हीच यावरची लस आहे असं ते म्हणाले. covid-19 साठी रुग्णालये, स्वसंरक्षण पोशाख, N95 मास्क आणि औषधे भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्याचा निर्वाळा त्यांनी यावेळी दिला. आपण जगापेक्षा अतिशय चांगल्या तयारीनिशी या आघाडीवर लढत आहोत असं ते म्हणाले. covid-19 शी लढताना भारतीय रेड क्रॉस सोसायटी निभावत असलेला बंधुभाव अतिशय महत्त्वाचा आहे असं ते म्हणाले. भारतीय रेड क्रॉस सोसायटीने उपकरणे सॅनीटायझर्स, अन्न, स्वसंरक्षक पोषाख आणि N95 मास्क अनेक रुग्णालयांना उपलब्ध करून दिले आहेत असेही त्यांनी सांगितले.
समारोप करताना हर्षवर्धन यांनी रक्तदान शिबिरात रक्तदानासाठी आलेल्या रक्तदात्यांचे आभार मानले. रक्तदानासाठी दोनशेपेक्षा जास्त जणांनी आगाऊ नोंदणी केल्याची माहिती त्यांनी दिली. हे शिबिर चार वाजेपर्यंत चालणार असून त्यात याहून जास्त जण रक्तदान करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रक्तदान करत असलेल्यांची हर्षवर्धन यांनी वैयक्तिकरित्या भेट घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले. शिबिरात उपस्थित असलेल्या दिल्ली पोलीस कर्मचाऱ्यांपैकी काही जणांनी यावेळी स्वतःहून रक्तदान केले.
ईशान्य दिल्लीचे खासदार मनोज तिवारी, IRCS सचिन आर के जैन, तसेच श्याम जाजू, सुनील यादव यासारखे अनेक समाज सेवक यावेळी उपस्थित होते
* * *
M.Jaitly/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1620938)
Visitor Counter : 3559