आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 व्यवस्थापनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी डॉ. हर्ष वर्धन यांनी लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला दिली भेट

Posted On: 03 MAY 2020 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3  मे 2020

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज कोविड-19 स्थितीचा आढावा घेण्यासाठी भारतातील सर्वात जुन्या आणि प्रस्थापित लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालयाला (एलएचएमसी) भेट दिली. रुग्णालयातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन एलएचएमसी आणि सहयोगी रुग्णालये-श्रीमती सुचेता कृपलानी रुग्णालय (एसएसकेएच) आणि कलावती सरण मुलांचे रुग्णालय (केएससीएच) पुरेसे अलगीकरण वॉर्ड आणि बेडसह समर्पित 30-बेडचे कोविड-19 रुग्णालय म्हणून कार्यरत आहे.

रुग्णालयाला भेट देण्यापूर्वी एलएचएमसीचे संचालक डॉ. (प्रा.) एन. एन. माथुर यांनी केंद्रीय मंत्र्यांना एलएचएमसी आणि सहयोगी रुग्णालयांमध्ये कोविड-19 रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या स्थितीबाबत सविस्तर माहिती दिली. समर्पित कोविड सुविधेमध्ये 24 अलगीकरण बेड आणि ५ आयसीयु बेड असल्याची माहिती देण्यात आली. संशयित रुग्णांसाठी एसएसकेएच आणि केएससीएच रुग्णालयात अनुक्रमे 40 आणि 41 बेडची सुविधा उपलब्ध आहे.

रुग्णालय भेटी दरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी रुग्णालय आपत्कालीन विभाग, ओपीडी, नमुना केंद्र, कोविड ब्लॉकचे महत्वपूर्ण क्षेत्र आणि डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीच्या पीपीई सूट आणि कपडे बदलायच्या कक्षाला भेट दिली. नमुना संकलन सुविधा केंद्रात काम करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या विशेष अंघोळ, कपडे बदलणे आणि त्यांना निर्जंतुक करण्यासाठी फवारणी सुविधा, ऑन्कोलॉजी इमारतीत विशेष कोविड-19 सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे हे पाहून त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीचा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात येण्याचे टाळण्यासाठी या कर्मचाऱ्यांची राहण्याची आणि जेवणाची सुविधा जवळच्या काही हॉटेलमध्ये करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांना देण्यात आली. त्यांना यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन (वायएमसीए) इमारतीबद्दल देखील माहिती देण्यात आली, जी सध्या एलएचएमसी डॉक्टर आणि परिचारिका यांच्याद्वारे व्यवस्थापित कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतरित झाली आहे आणि सध्या कोविड-बाधित लक्षणरहित 70 रुग्ण आपले कर्तव्य बजावताना किंवा इतर कोणत्या परिस्थितीत कोविडचा संसर्ग झालेल्या एलएचएमसीच्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

मंत्र्यांनी कोविड ब्लॉकमध्ये, एलएचएमसी मध्ये रुग्णांवर उपचार करत असताना कोविड-19 चा संसर्ग झालेल्या आणि नंतर उपचारासाठी तिथेच दाखल करण्यात आलेल्या दोन इंटर्न डॉक्टरांसोबत व्हिडीओ कॉलवरून संवाद साधला. मंत्र्यांनी कोविड वॉर्डमधील 2 रुग्णांशी देखील व्हिडीओ कॉलवरून संवाद साधला आणि त्यांनी कोविड वॉर्डमधील सुविधांविषयी मंत्र्यांना माहिती दिली. मंत्री म्हणाले की, ते सर्व तंदुरुस्त आणि आनंदी आहेतआणि रुग्णालयात उपचार घेत त्यांची तब्येत सुधारत आहे हे बघून मला आनंद झाला. विशेषत: दाखल झालेल्या इंटर्न डॉक्टरांसाठी, कोविड ग्रस्त असूनही त्यांचे उच्च मनोबल पाहणे माझ्यासाठी खूप प्रोत्साहनदायक आहे.

रुग्णालयातील विविध वॉर्ड आणि परिसराचा विस्तृत आढावा आणि पाहणी केल्यानंतर, त्यांनी विविध युनिटच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले: गेल्या काही दिवसांमध्ये मी कोविड-19 च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एम्स (दिल्ली), एलएनजेपी, आरएमएल, सफदरजंग, एम्स झज्जर, राजीव गांधी सुपर स्पेशलिटी आणि आता एलएचएमसी अशा विविध रुग्णालयांना भेट दिली आहे आणि या उद्‌भवलेल्या आव्हानाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी या रुग्णालयांनी जी व्यवस्था केली आहे टी पाहून मी समाधानी आहे.

कोविड-19 ची परिस्थिती हाताळताना परिचारिका, डॉक्टर आणि इतर आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांनी दाखविलेला लवचिकपणा, कठोर परिश्रम, समर्पण आणि वचनबद्धतेचे कौतुक करताना डॉ हर्ष वर्धन म्हणाले की, कोविड-19 रूग्णांच्या बरे होण्याचा दर सातत्याने वाढत आहे, जे असे दर्शविते की यातील अधिकाधिक रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परत जात आहेत. आतापर्यंत सुमारे 10,000 कोविड रूग्ण बरे झाले आहेत आणि त्यांनी त्यांचे सामान्य जीवन सुरु केले आहे. इतर रुग्णालयांमधील बहुतांश रुग्णही बरे होण्याच्या मार्गावर आहेत. हे आमच्या भारतातील आघाडीच्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांद्वारे पुरविण्यात येणारी गुणवत्तापूर्ण सेवा प्रतिबिंबित करते. त्यांच्या यशाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. या कठीण काळात तुम्ही दिलेल्या सेवांसाठी देश तुमचा आभारी आहे. या परीक्षेच्या काळात आमच्या आरोग्य सेवा योध्यांचे मनोधैर्य पाहून आनंद होतो.

डॉ. हर्ष वर्धन यांनी असेही नमूद केले की, कोविड-19 चा प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापन यांच्यावर राज्यांच्या सहकार्याने नियमित उच्च स्तरीय देखरेख केली जाते. ते म्हणाले की, नवीन प्रकरणांच्या वाढीचा दरही काही काळासाठी स्थिर झाला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, "लॉकडाउन 3.0 ला तार्किक समाप्तीपर्यंत नेण्यासाठी आपल्याला शारीरिक अंतर आणि मूलभूत स्वच्छतेच्या शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे."

हिरवे हरित, केशरी आणि लाल झोनमध्ये जिल्ह्यांची विभागणी केली आहे आणि त्यानुसार भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रतिबंध सुरू केले जातील.

ते म्हणाले की, आपण आतापर्यंत 10 लाख चाचण्या पूर्ण केल्या असून सध्या दिवसाला 74,000 चाचण्या करत आहोत. सरकारने संपूर्ण भारतभर अंदाजे 20 लाख पीपीई कीट वितरीत केल्या असून [हायड्रॉक्सीक्लोरोक्विन (एचसीक्यू) आणि पॅरासिटामोल (पीसीएम) सह] जगातील 100 पेक्षा जास्त देशांना औषधे पुरविली आहेत. इतर देशांची तुलना करता भारताची स्थिती चांगली आहे आणि संपूर्ण देशभरात 2.5 लाखांहून अधिक समर्पित रुग्णालये आणि समर्पित आरोग्यसेवा केंद्र कुठच्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहेत.

अडकलेल्या स्थलांतरित मजुरांविषयी ते म्हणाले की, सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्थलांतरीत मजुरांना योग्य ती सर्व खबरदारी घेऊन आणि शारीरिक अंतराच्या सर्व नियमांचे पालन करून बस आणि ट्रेनने त्यांच्या घरी परत जाण्यासाठी त्यांना मदत केली जात आहे.

विविध उपक्रम सुरु करण्याविषयी मंत्री म्हणाले की, हळूहळू आणि क्रमाक्रमाने एक-एक करून आर्थिक उपक्रम सुरु केले जातील. औषध, औषधनिर्माण इ. सारख्या विविध उद्योगांना लवकरात लवकर सामान्य स्थितीत परत आणायला मदत करण्यासाठी विस्तृत योजना तयार आहे.

डॉ हर्ष वर्धन यांनी लॉकडाऊनच्या  (17 मे 2020 पर्यंत) वाढलेल्या कालावधीचे काटेकोरपणे पालन करून कोविड-19 च्या संक्रमणाची साखळी तोडून टाकण्यासाठी याचा प्रभावी उपयोग करावा आवाहन केले. साबणाने व पाण्याने हात धुणे किंवा सॅनिटायझर वापरून हात स्वच्छ ठेवणे; सर्व वारंवार स्पर्श केलेल्या पृष्ठभागांचे निर्जंतुकीकरण करणे आणि नियमितपणे स्वच्छता बाळगणे महत्वाचे आहे. प्रत्येकाने योग्य मास्क किंवा चेहरा कव्हर घालावे; जोखमीच्या स्व-मूल्यांकनसाठी कोरोना ट्रॅकर अ‍ॅप आरोग्यसेतु डाउनलोड करा; आणि शारीरिक अंतर राखा. ते म्हणाले की लॉकडाउन 3.0 दरम्यान दररोजच्या जीवनात अनुशासन पाळल्यास कोविड-19 च्या विरोधात यश प्राप्त होईल. आम्ही यशाच्या मार्गावर आहोत आणि आपण हे कोविड-19 विरुद्धच युद्ध नक्की जिंकू.

कोविड-19 रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांना वाळीत टाकू नये आणि कोविड-19 च्या विरोधात लढाई जिंकलेल्या रूग्णांना हिणवू नये, असे आवाहन त्यांनी देशवासियांना केले. ते म्हणाले, ते आपले नायक आहेत आणि त्यांना योग्य सन्मान मिळणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की, आज भारतीय वायुसेना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून या योद्ध्यांना त्यांच्या कार्याची पोच पावती देत आहे. ते पुढे म्हणाले की, कोविड विरुद्धच्या भारताच्या लढाईचे केवळ डब्ल्यूएचओ नेच नाही तर संपूर्ण जगाने कौतुक केले आहे.

 

B.Gokhale/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1620777) Visitor Counter : 250