रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेचे डबे बांधणीचे काम पूर्ववत सुरु
कपूरथला येथील रेल्वे डबे बांधणी कारखान्याची उत्पादन प्रक्रिया 23.04.2020 पासून पूर्ववत
राज्यातील लॉकडाऊन आदेशानुसार राज्य सरकारांकडून मंजुरी मिळताच इतरांनी उत्पादन सुरू करावे
मालवाहतूक वाढविण्यासाठी रेल्वे डबे बांधणी कारखान्याने गेल्या दोन दिवसात तयार केले 2 मालवाहतूक डबे
Posted On:
25 APR 2020 6:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2020
भारतीय रेल्वेचा उत्पादन विभाग रेल कोच फॅक्टरी (आरसीएफ) कपूरथलाने 28 दिवसांच्या राष्ट्रीय टाळेबंदीनंतर 23.04.2020 रोजी उत्पादन प्रक्रिया पुन्हा सुरू केली. कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार आणि स्थानिक प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्व सुरक्षा उपाययोजनांचे पालन करीत कारखाना सुरू करण्यात आला आहे. या कारखान्याच्या परिसरात राहणाऱ्या एकूण 3744 कर्मचार्यांना या कामात सहभागी व्हायला परवानगी देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि राज्य सरकारच्या सल्ल्यानुसार, भारतीय रेल्वेचे इतर उत्पादन विभाग त्यांना आदेश मिळताच पुन्हा उत्पादन सुरू करतील.
कमी मनुष्यबळातही आरसीएफ कपूरथलाने दोन दिवसात दोन डब्यांची बांधणी केली आहे. 23.04.2020 आणि 24.04.2020 या दोन दिवसात या कारखान्याने अनुक्रमे एक एलएचबी उच्च क्षमता पार्सल व्हॅन आणि एक लगेज कम जनरेटर कार तयार केली आहे.
लॉक डाऊननंतर कामावर रुजू झालेल्या सर्व कर्मचार्यांना मास्क, सॅनिटायझर बाटली आणि साबण असलेले सुरक्षा किट देण्यात आले आहे. डबे बांधणी कामात परवानगी असलेल्या कर्मचार्यांना बोलाविण्यात आले आहे. प्रशासकीय कार्यालयांमध्ये सर्व अधिकारी कार्यालयात दाखल झाले असून दररोज 33% कर्मचाऱ्यांना आळीपाळीने कामावर बोलाविण्यात येत आहे. कार्यशाळा, कार्यालये आणि निवासी परिसरातील प्रमुख ठिकाणी कोव्हीड विषयी जागरूकता निर्माण करणारी पोस्टर्स आणि सुरक्षा विषयक नियम दर्शविले आहेत. सर्व कामगारांनी नियमितपणे कामाच्या ठिकाणी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करण्यासाठी त्यांच्या पर्यवेक्षकाद्वारे आणि अधिकार्यांकडून त्यांचे समुपदेशन केले जात आहे. कर्मचार्यांना कार्यालयात हँड्स फ्री लिक्विड साबण डिस्पेंसर आणि वॉश बेसिन पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
कामगारांना वेगवेगळ्या वेळी तीन शिफ्टमध्ये कामावर बोलावले जात आहे. तिन्ही शिफ्टसाठी कामावर येण्याची वेळ, दुपारच्या जेवणाची वेळ आणि शिफ्ट संपण्याच्या वेळेत अंतर ठेवण्यात आले आहे. प्रत्येक कर्मचार्याच्या शरीराचे तापमान बघण्यासाठी थर्मल स्कॅनरद्वारे प्रवेशद्वारांवर तपासणी केली जात आहे. आरसीएफच्या आवारात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची प्रवेशद्वारात पुरविण्यात आलेल्या मिस्ट सॅनिटायझर टनेलद्वारे स्वच्छता करण्यात येत आहे. सर्व कामगार परस्परातील सुरक्षित अंतर राखण्याच्या नियमांचे पालन करीत आहेत आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि सर्व स्वच्छता मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करीत आहेत. आरसीएफ परिसरातील लाला लाजपत रेल्वे रुग्णालयाने कोविद-19 संसर्गाची लक्षणे असलेल्या रूग्णांसाठी स्वतंत्र काउंटर आणि बाह्य रुग्ण विभाग कक्ष उपलब्ध करून दिले आहेत. आरसीएफ परिसरात आसलेली 24 खाटांची विलगीकरण सुविधा आणि लाला लाजपत रेल्वे रुग्णालयातील 8 खाटांची अलगीकरण कक्ष सुविधा कोविडशी संबंधित कोणतीही बाब हाताळण्यासाठी सज्ज आहे.
राज्यातील लॉकडाऊन आदेशानुसार राज्य सरकारांकडून मंजुरी मिळताच इतरांनी उत्पादन सुरू करावे.
* * *
B.Gokhale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1618226)
Visitor Counter : 263