श्रम आणि रोजगार मंत्रालय
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने 15 दिवसात 10.02 लाख दावे काढले निकाली; पीएमजीकेवाय अंतर्गत 6.06 लाख कोविड-19 दाव्यांचा समावेश
Posted On:
22 APR 2020 8:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 एप्रिल 2020
श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने कामकाजाच्या 15 दिवसात एकूण 10.02 लाख दावे निकाली काढले असून प्रधान मंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत 6.06 लाख कोविड-19 दाव्यांचा यात समावेशआहे.
एकूण 3600 कोटी रुपये वितरीत करण्यात आले असून प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना पॅकेज अंतर्गत 1954 कोटी रुपयांच्या कोविड दाव्यांचा यात समावेशआहे.
लॉक डाऊनमुळे केवळ एक तृतीयांश कर्मचारी काम करत असूनही कामकाजाच्या केवळ तीन दिवसात कोविड-19 शी संबंधित 90% दाव्यांचा निपटारा, दावे वेगाने निकाली काढण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या विशेष सॉफ्ट वेअरच्या मदतीने करत सेवा देण्याचा नवा मापदंड निर्माण केला.
कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने 26-3-2020 ला प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना सुरु केली.कोविड-19 शी मुकाबला करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह योजनेतून रक्कम काढण्याची तरतूद केंद्र सरकारने केली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेत 68 एल (3)हा परिच्छेद समाविष्ट करणारी तातडीची अधिसूचना काढण्यात आली. त्यानुसार परत न करण्याची आणि मूळ वेतन आणि महागाई भत्याच्या तीन महिने किंवा सदस्याच्या कर्मचारी भविष्य निधीत जमा रकमेच्या 75% यापैकी कमी असेल ती रक्कम काढण्याची सुविधा याद्वारे देण्यात आली आहे.कोविड-19 संदर्भातले दावे ऑनलाईन दाखल करण्याची सुविधाही कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने दिली आहे. इतर सेवे बरोबरच मोबाईल फोन द्वारे उमंग ऐपवरही हे दावे दाखल करता येतात.
संकटाच्या या काळात आपल्या सदस्यांच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने केला आहे. या संकटावर मात करण्यासाठी सदस्यांना मदत करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची कार्यालये कार्यरत आहेत.
* * *
U.Ujgare/N.Chitale/D.Rane
(Release ID: 1617275)
Visitor Counter : 231