कृषी मंत्रालय
कोविड-19 चे अन्न सुरक्षा, सुरक्षितता आणि पोषणावर होणाऱ्या परिणामांच्या मुद्द्यावर जी-20 कृषीमंत्र्यांच्या असाधारण बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नरेंद्र सिंह तोमर यांचा सहभाग
लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्सिंगच्या निकषांचे पालन करून शेतीविषयक कामांना भारत सरकारने निर्बंधांमधून वगळल्याची तोमर यांची परिषदेत माहिती
जी-20 कृषीमंत्र्यांच्या जाहीरनाम्याचा स्वीकार, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे, अन्नाची नासाडी टाळण्याचे, सीमेपलीकडे अन्न पुरवठा साखळी सुरू ठेवण्याचे आवाहन
Posted On:
21 APR 2020 3:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 एप्रिल 2020
कोविड-19 चा अन्न सुरक्षा, सुरक्षितता आणि पोषणावर होणाऱ्या परिणामांचा विचार करण्यासाठी आयोजित केलेल्या जी-20 कृषीमंत्र्यांच्या असाधारण व्हर्चुअल बैठकीत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर मंगळवारी सहभागी झाले. लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्सिंग, आरोग्य आणि स्वच्छतेच्या निकषांचे पालन करून शेतीविषयक कामांना भारत सरकारने निर्बंधांमधून वगळल्याची माहिती तोमर यांनी या परिषदेत दिली. या आपत्तीला तोंड देण्यासाठी आणि विविध प्रकारच्या उपाययोजनांसाठी विविध देशांना पाठबळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अग्रभागी असल्याची आणि नागरिकांच्या गरजांची पूर्ततेसाठी कृषी क्षेत्र आपल्या प्रयत्नात सातत्य राखत असल्याची बाब तोमर यांनी अधोरेखित केली.
या आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह सुरक्षित राखण्यासह अन्न साखळीचे सातत्य टिकवण्यासंदर्भातील उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी सौदी अरेबियाच्या अध्यक्षांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले. सर्व जी-20 सदस्य देशांचे कृषीमंत्री आणि इतर काही अतिथी देश आणि आंतरराष्ट्रीय संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या. जी-20 देशांना एकत्र आणण्यासाठी सौदी अरेबियाने घेतलेल्या पुढाकाराचे तोमर यांनी स्वागत केले.
त्यानंतर जी-20 देशांच्या कृषीमंत्र्याचा एक जाहीरनामा बैठकीत स्वीकृत करण्यात आला. कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर अन्नाची नासाडी आणि नुकसान टाळण्याचा, सीमेपलीकडे अन्न साखळीमधील पुरवठ्यात सातत्य टिकवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. अन्न सुरक्षा आणि पोषणासाठी एकत्रितपणे काम करण्याचा, परस्परांमध्ये योग्य प्रकारच्या आचारविचारांची देवाणघेवाण करण्याचा, संशोधनाला प्रोत्साहन देण्याचा, जबाबदार गुंतवणूक , नवनिर्मिती आणि सुधारणांवर भर देण्याचा आणि शेती आणि अन्न प्रणालीची शाश्वती आणि प्रतिरोध यात सुधारणा करण्याचा संकल्पही या कृषीमंत्र्यांनी केला. प्राण्यांकडून मानवामध्ये संक्रमित होणाऱ्या रोगांच्या प्रतिबंधासाठी कठोर सुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भात विज्ञानाधारित आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांची निर्मिती करण्याबाबतही जी-20 देशांनी सहमती व्यक्त केली.
* * *
B.Gokhale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1617051)
Visitor Counter : 213