आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोरोना विषाणू विरुद्धचा लढा आपण जिंकू शकतो आणि जिंकणारच -डॉ हर्ष वर्धन

Posted On: 15 APR 2020 10:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 एप्रिल 2020


केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतात करण्यात येणाऱ्या उपाय योजनाबाबत, जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ अधिकारी आणि क्षेत्र अधिकारी तसेच केंद्र आणि राज्य सरकारांच्या आरोग्य अधिकाऱ्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवादात्मक सत्र घेतले.

कठीण अशा काळात आपण संवाद साधत आहोत, पोलिओ आणि देवी या रोगांचे निर्मुलन केले त्याप्रमाणे या विषाणूचा  नायनाट करण्यासाठी आपणा सर्वाना एकत्र काम करावे लागेल, असे हर्ष वर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांना सांगितले. आपण या विषाणूवर विजय मिळवू शकतो आणि आपण नक्कीच विजयी ठरू असा विश्वास हर्ष वर्धन यांनी व्यक्त केला. कोविड विरुध्द क्षेत्रीय स्तरावर अधिक उपाय योजना आणि भागीदारी अधिक बळकट करण्यावर या बैठकीत चर्चा झाली. कोविड-19 विरोधातल्या लढ्यात जागतिक आरोग्य संघटना हा आमचा महत्वाचा भगीदार असल्याचे हर्ष वर्धन यांनी सांगितले. देशात कोविड-19 चा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने केलेले मार्गदर्शन आणि योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले.   

पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सरकारी किंवा जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉक्टरानी निर्धार केला होता. त्यांच्या मोलाच्या योगदानावाचून भारतासह दक्षिण पूर्व आशियातून पोलिओचे निर्मुलन होण्यासाठी दीर्घकाळ लागला असता. भारतात डॉक्टरांची क्षमता आणि निपुणता यांच्या बळावर पोलिओ निर्मुलन करता आले याची आठवण करून देत त्यांनी डॉक्टराना प्रोत्साहन दिले.  

कोविड-19 संदर्भात प्रतिसाद देण्यात भारत अग्रस्थानी होता असे सांगून, आपले कोरोना योद्धे कळकळीने सेवा करत असल्यामुळे जगाच्या इतर भागांपेक्षा भारतात स्थिती चांगली असल्याचे त्यांनी सांगितले. हा शत्रू कोण आणि कुठे आहे हे आपण जाणतो. समुदाय देखरेख, विविध सूचनावली, गतिमान धोरण याद्वारे आपण या शत्रूला रोखू शकतो असे ते म्हणाले.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करत, तज्ञांनी वेळोवेळी केलेल्या सूचनांचा पंतप्रधान स्वीकार करत असल्याचे सांगून यामुळे कोविड-19 ला आपण आटोक्यात ठेवू शकत असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना योध्यांची मानवतेची सेवा करण्याची वृत्ती आणि आशादायी दृष्टीकोन यांची त्यांनी प्रशंसा केली.

मोठी आणि बहुस्तरीय आव्हाने असूनही या महामारी विरोधातल्या लढ्यात भारत आपल्या दृढ कटीबद्धतेचे दर्शन घडवत आहे असे सांगून भारताच्या उपायांची जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशिया विभागाच्या प्रादेशिक संचालक डॉ पूनम खेत्रपाल यांनी प्रशंसा केली. कोविड-19 विरोधातल्या लढ्यात सहाय्य करण्याच्या सूचना आमच्या क्षेत्र कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचा चमू सरकार समवेत काम करत कोविड-19 विरोधातला लढा जिंकण्यासाठी मदत करेल असा विश्वास जागतिक आरोग्य संघटनेचे भारतासाठीचे प्रतिनिधी डॉ हेन्क बेकेडाम यांनी सांगितले.

या चर्चेतले मुख्य मुद्दे असे आहेत-

  • हॉट स्पॉट आणि दाटीवाटीच्या भागात सूक्ष्म आराखडा विकसित करण्यासाठी, मदत करणाऱ्या जिल्हा स्तरावरील जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांसमवेत तांत्रिक सहकार्य,
  • कोणत्या मार्गांनी प्रसार होऊ शकतो हे निश्चित करण्यासाठी, सध्याच्या रुग्णाबाबत विश्लेषण करण्यासाठी मदत करणे,
  • जिल्ह्यामधे देखरेख ठेवण्याचे धोरण तयार करण्यासाठी मदत करणे

महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहार या तीन राज्यातले अनुभव आणि रणनीती या बैठकीत सादर करण्यात आली. केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री अश्विनीकुमार चौबे, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे संचालक, आरोग्य सचिव यांच्यासह जागतिक आरोग्य संघटनेचे प्रादेशिक संचालक आणि इतर अधिकारी वर्ग बैठकीला उपस्थित होता.

 

 

U.Ujgare/N.Chitale/D.Rane


(Release ID: 1614972) Visitor Counter : 239