सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

कोविड-19 लॉकडाऊननंतर उद्योग पुन्हा सुरू करताना सरकारकडून पूर्ण पाठबळ देण्याचे गडकरी यांचे उद्योग प्रतिनिधींना आश्वासन


विपरित परिस्थितीचे संधीमध्ये रुपांतर करण्यासाठी सर्व क्षेत्रांनी एकजुटीने काम करण्यावर भर

Posted On: 14 APR 2020 7:35PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 14 एप्रिल 2020

 

कोविड-19 ची आपत्ती दूर झाल्यानंतर आणि लॉकडाऊन मागे घेतल्यावर उद्योगधंदे पुन्हा सुरू करताना सरकारकडून संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नीतीन गडकरी यांनी उद्योगांना दिले आहे.

ते आज एका वेब सेमिनारमध्ये फिक्कीच्या प्रतिनिधींशी चर्चा करत होते. या संदर्भात सरकारने घेतलेल्या विविध आर्थिक निर्णयांची त्यांनी यावेळी माहिती दिली.

कर्जाची आणि खेळत्या भांडवल सुविधांची पुनर्रचना करायला रिझर्व बँकेने परवानगी दिली असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांविषयी बोलताना गडकरी यांनी सांगितले की, त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची सरकारला कल्पना आहे आणि अर्थव्यवस्थेतील त्यांचे महत्त्व जाणून आहे. उद्योग क्षेत्राने सरकार आणि बँकिंग क्षेत्रासोबत मिळून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सर्व क्षेत्रांनी भक्कम राहणे प्रत्येकाच्याच हिताचे आहे. एमएसएमईना सध्याच्या एक लाख कोटी रुपयांच्या पातळीवरून पाच लाख कोटी रुपयांच्या पातळीपर्यंतची कर्ज हमी देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि  वित्तीय संस्थांनी मंजुर केलेल्या आगाऊ रकमेच्या 75 टक्के रकमेची हमी सरकारच्या कर्ज हमी योजनेंतर्गत देण्यात येते, असे गडकरी यांनी सांगितले. उद्योग क्षेत्राने विशेषतः एमएसएमई क्षेत्राने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर संबधित मंत्रालये आणि विभागांशी चर्चा करणार असल्याची हमी त्यांनी दिली.

सध्या निर्माण झालेल्या आपत्तीकडे एक आव्हान म्हणून आणि संधी म्हणून पाहावे असे सुचवताना त्यांनी अनेक देश त्यांची गुंतवणूक चीनमधून काढून घेऊन दुसरा पर्याय शोधत असताना त्यांच्यासाठी भारत हाच सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो याकडे लक्ष वेधले.

2019-20 या वर्षात महामार्गांचे विक्रमी बांधकाम झाले, येत्या काही वर्षात पायाभूत सुविधा क्षेत्रांच्या गरजांमध्ये होणारी वाढ पाहाता, महामार्ग बांधणीमध्ये दोन ते तीन पट वाढ होण्याची अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली.

संभाव्य विलंब टाळण्यासाठी निर्णय घेण्याचा कालावधी कमी करण्यावर भर देत एन.एच.ए.आय अर्थात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला कोणत्याही प्रकरणाचा निपटारा तीन महिन्यांच्या आत करण्याची सूचना केल्याचं त्यांनी सांगितले. यासाठी अशा संस्थांच्या अध्यक्षांना सध्या पाच ऐवजी सात वाजेपर्यंत काम करण्याची विनंती केली आहे, असे ते म्हणाले. मंत्रालयाने या संदर्भात आधीपासूनच काम सुरू केले असून त्यामुळे अतिशय कमी वेळेत 280 प्रकरणांचा निपटारा झाला आहे.

भारताने या आपत्तीचे रुपांतर संधी मध्ये केले पाहिजे, कोरोना विरोधातील ही लढाई जिंकण्यासाठी आर्थिक वृद्धी साध्य करण्यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती दिली पाहिजे. भारतीय उद्योगाने सध्याच्या स्थितीकडे इष्टापत्ती म्हणून पाहिले पाहिजे आणि आपल्या निर्यातीच्या क्षमतेत वाढ केली पाहिजे, अशी सूचना गडकरी यांनी केली.

2020-21 मध्ये रस्ते आणि महामार्ग उभारणीचा वेग दुप्पट करण्यासाठी आपले मंत्रालय युद्धपातळीवर काम करत असून हा लढा देण्यासाठी आणि त्यात विजय मिळवण्यासाठी वचनबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रस्ते क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी विविध ठिकाणी प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची मंत्रालयाची तयारी आहे आणि कोरोना विषाणूचा फैलाव होणार नाही याची काळजी घेऊन हे प्रकल्प सुरू करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

 

B.Gokhale/ S.Patil/P.Kor



(Release ID: 1614473) Visitor Counter : 161