ग्रामीण विकास मंत्रालय

देशातील कोविड-19 परिस्थितीचा मुकाबला करण्यात राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील बचत गटाच्या महिलांचा पुढाकार


कोविड-19 विषयी जागरूकता निर्माण करून या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बचत गटांच्या महिलांव्दारे संवाद आणि विचार परिवर्तन कौशल्याचा वापर

Posted On: 12 APR 2020 6:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 एप्रिल 2020

 

कोविड-19 महामारीमुळे जगभरात अभूतपूर्व आरोग्यविषयक आणीबाणीची परिस्थिती उद्भवली आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर या आजाराची शक्यता असलेल्या लोकांची चाचणी करून त्यांचे विलगीकरण करणे किंवा बाधितांवर उपचार करणे सुरु आहे. या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी त्याची लक्षणे, तो होण्याची कारणे लक्षात घेऊन त्यानुसार योग्य त्या आरोग्यविषयक सवयी लावून घेणे सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करणे ही सध्याच्या काळाची गरज आहे.

ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत दीनदयाल अंत्योदय योजनेच्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील (डीएवाय-एनआरएलएम),सुमारे 63 लाख स्वयंसहायता बचत गटाच्या (एसएचजी) उत्साही, कर्तव्यतत्पर अशा सुमारे 690 लाख महिलांनी सामुदायिक स्तरावर निर्माण झालेल्या आर्थिक आणि सामाजिक गरजा भागविण्यासाठी नेहमीच हातभार लावला आहे. या महिला नैसर्गिक आपत्तीच्या वेळी प्रतिसाद देत असून रोजीरोटीच्या कामांमध्ये, सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी जागरुकतेच्या कामात आणि आघाडीच्या चळवळींमध्ये व्यस्त आहेत. कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्याच्या सध्याच्या लढ्यातही या बचत गटातील महिला लढवय्याची भूमिका बजावीत आहेत.

आरोग्य मंत्रालयाने दृक-श्राव्य (ऑडिओ व्हिज्युअल (एव्ही)) साधनांद्वारे आणि सर्व राज्य सरकारच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला वितरित केलेल्या मार्गदर्शक सूचनांद्वारे वैयक्तिक स्वच्छता, सामाजिक अंतर राखणे इत्यादींसह देशभरातील बचत गटांना या आजाराच्या विविध बाबींविषयी जागरूक केले आहे. राज्य सरकारांनी विकसित केलेल्या साहित्यासह अशा सर्व माहितीचा उपयोग राज्य सरकारच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे (एसआरएलएमद्वारे) आवश्यक काळजी घेण्याबाबत योग्य संदेश समुदायापर्यंत पोहोचतोय की नाही याची खात्री केली जाईल. एसआरएलएम कर्मचारी आणि बचत गट सदस्य दूरध्वनी कॉल, भिंत लेखन, पत्रके वाटणे इत्यादी माध्यमातून स्थानिक समाजात जागरूकता निर्माण करीत आहेत. समाज माध्यमांचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.

बाजाराच्या ठिकाणी, शिधावाटप दुकानात लोक सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करतायत कि नाही यावर या बचत गटातील महिला स्वयंसेविका लक्ष ठेवतात. तामिळनाडूमध्ये, प्रत्येक शिधावाटप  दुकानात बचत गटांचे दोन स्वयंसेवक नियुक्त केले जातात. त्यांना ग्लोव्ज, मास्क आणि सॅनिटायझर्स प्रदान केले जातात आणि ते सुनिश्चित करतात की रांगेत असलेले लोक पुरेसे अंतर पाळतात.

विविध एसआरएलएमनी केलेले आणखी काही महत्त्वपूर्ण योगदान याप्रमाणे आहे:

  • कोविड -19 आजार जागतिक महामारी म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर, बिहारचे ग्रामीण जीवनोन्नती अभियान (जीविका) सक्रिय झाले आणि या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करण्यासाठी माहिती, शिक्षण आणि संवाद (आयईसी) सामग्रीवर काम करण्यास त्यांनी सुरवात केली. जीविका आपल्या 1.4 लाख बचत गटांमार्फत जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत पद्धतशीरपणे पोहोचण्याचा आणि हँडवॉश, स्वच्छता, अलग ठेवणे आणि अलगाव आणि सामाजिक-अंतर यांसारख्या विषयांवर जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहे. जीविकाने आत्तापर्यंत 1,00,000 हून अधिक लोकांचे मोबाइल नंबर संकलित केले आहेत आणि कोविड -19 विषयी जागृतीपर व्हॉईस मेसेज सोडण्यासाठी मोबाइल वाणी प्लॅटफॉर्मचा उपयोग करीत आहे आणि त्याद्वारे नागरिकांच्या शंकांचे निरसन करीत आहे.

जागृतीसाठी रांगोळ्या:- उत्तरप्रदेश एसआरएलएमच्या ‘प्रेरणा’ मधील बचत गटाच्या महिलांनी आपल्या सर्जनशीलतेचा वापर रांगोळ्या काढण्यासाठी केला आहे आणि 'सामाजिक अंतराची गरज अधोरेखित करण्यासाठी रेषा आणि वर्तुळाचा वापर रांगोळीत केला आहे. त्यांच्या समाजात कोविड प्रतिबंधाविषयीचे प्रभावी संदेश देण्यासाठी त्या वॉल पेंटिंग्ज देखील बनवित आहेत.

दीदी हेल्पलाइन: झारखंड एसआरएलएमने सुरू केलेली दूरध्वनी हेल्पलाइन, स्थलांतरित मजुरांना सत्यापित माहिती देण्यासाठी 24 तास खुली आहे. विविध राज्यात स्थलांतरीत झालेल्या मजुरांना पुन्हा झारखंडमध्ये परत आणण्यासाठी वेगवेगळ्या राज्याच्या प्राधिकरणांना माहिती पुरविण्याचे काम या हेल्पलाइनमुळे सुकर होत आहे.

बनावट बातम्या दूर करण्याचा प्रयत्न: केरळमधील कुडुंबश्रीच्या महिलांनी समाजात घबराट पसरविणाऱ्या व्यापक प्रमाणावरील बनावट बातम्या नष्ट करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले आहेत.

कुडुंबश्री त्यांच्या 1,16,396सदस्य असलेल्या व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून,समुदायापर्यंत केवळ योग्य माहितीचा प्रचार करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्वरित खात्रीशीर माहिती देणे आणि कोविड-19 विषयी अद्ययावत माहिती आणि प्रतिबंधात्मक उपायांविषयी या मंचाचा प्रामुख्याने वापर करण्यात येत आहे.

आपापल्या समाजातील सुरक्षित स्वच्छतेच्या प्रथांना प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक प्रतिसादात्मक योगदानाद्वारे त्यांचे जीवनमान उंचावत या बचत गटातील स्त्रिया अत्यंत समर्पण वृत्तीने आणि निष्ठेने कोविड -19 विरुद्धच्या लढ्यात योगदान देत आहेत. देशभरात आयोजित अशा अनेक जबाबदार सामूहिक कृतींच्या माध्यमातून या समाजातील अल्पभूधारक आणि असुरक्षित महिलांनी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होताना कोरोना विषाणू  विरूद्धच्या युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

G.Chippalkatti/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1613690) Visitor Counter : 342