विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

राष्ट्रीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन मंडळाच्या हैदराबाद येथील पेशी आणि रेणुजीवशास्त्र प्रयोगशाळेचा कोविड-19 विरोधी लढ्यात विविधस्तरीय सहभाग

Posted On: 12 APR 2020 3:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 एप्रिल 2020

 

सीएसआयआर अर्थात राष्ट्रीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन मंडळाच्या हैदराबाद येथील सीसीएमबी अर्थात पेशी आणि रेणुजीवशास्त्र  प्रयोगशाळेने कोविड-19 विरोधी लढ्यात उल्लेखनीय सहभाग नोंदवत विविध पातळ्यांवर काम सुरु केले आहे. त्यापैकी महत्त्वाचे उपक्रम खाली दिले आहेत:

रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी

सीसीएमबी हे कोविड-19 संसर्ग निश्चितीसाठीचे अधिकृत चाचणी केंद्र आहे. सध्या तेलंगणा राज्याच्या 33 जिल्ह्यांमधील सरकारी रुग्णालयांमधून SARS-CoV-2 या विषाणूचा संसर्ग शोधण्यासाठीची चाचणी करण्यासाठी रुग्णांचे नमुने या केंद्राकडे पाठविले जात आहेत. या  केंद्रात प्रतिदिन सुमारे 350 नमुने तपासले जातात.

कोविड-19 च्या संदिग्ध रुग्णांचे नमुने तपासण्याच्या पद्धतीचे प्रशिक्षण

सीसीएमबी ने पाच सरकारी रुग्णालयांमध्ये कार्यरत डॉक्टर्स, तंत्रज्ञ कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना कोविड-19 विषाणू संसर्गाचा संशय असलेल्या  रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्याबाबतचे विशेष प्रशिक्षण दिले आहे. या सर्व प्रशिक्षित कर्मचारी वर्गाला त्यांच्या संबंधित रुग्णालयांमध्ये  कोविड-१९ चे नमुने तपासण्याचे काम देण्यात आले आहे. सीएसआयआर- सीसीएमबीने रुग्णांचे नमुने तपासताना घेण्याच्या काळजीचे प्रशिक्षण देणारे व्हिडिओ सुद्धा तयार केले आहेत. त्यासाठी director@ccmb.res.in येथे संपर्क साधता येईल.

SARS-CoV-2 या विषाणूच्या गुणसूत्रांच्या रचनेचा शोध

सीएसआयआर प्रयोगशाळेतील संशोधक कोरोना विषाणूंच्या गुणसूत्रांची रचना शोधण्यासाठी प्रयत्न करीत आहे तर सीसीएमबीतील शास्त्रज्ञ  SARS-CoV-2 विषाणूंच्या गुणसूत्रांच्या रचनेचा शोध लावण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रयोग करीत आहेत.

वापरात असलेली तसेच नवीन औषधे यांच्या परिणामकारकतेच्या तपासणीसाठी SARS-CoV-2 विषाणूंची प्रयोगशाळेत जोपासना

वापरात असलेल्या तसेच नव्याने शोधलेल्या औषधांचा विषाणूंवर होणारा परिणाम तपासण्यासाठी विषाणूंच्या नमुन्याची अनुपलब्धता हा शास्त्रीय संशोधन आणि विकास कार्यात मोठा अडथळा आहे. यावर मात करण्यासाठी सीएसआयआर- सीसीएमबीने SARS-CoV-2 विषाणूची प्रयोगशाळेत जोपासना करण्यासाठीची यंत्रणा उभारली आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सीसीएमबीने सध्याच्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने घ्यावयाच्या काळजीबाबत आणि सावधानतेच्या उपायांबाबत जनजागृती करणारे स्थानिक भाषेतील संदेश समाज माध्यमांवरून मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे.

कोरोना नमुन्यांची चाचणी

आरटी-पीसीआर

 

U.Ujgare/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 



(Release ID: 1613599) Visitor Counter : 128