विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कोविड-19 वर उपचारात्मक प्रतिरोधके (अँटी बॉडीज) विकसित करण्यासाठी डीबीटी/ कोविड-रोधी संघाचे एकत्रित प्रयत्न सुरु

Posted On: 12 APR 2020 1:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 एप्रिल 2020

 

कोविड-19 हा संसर्गजन्य विषाणू नवीन सार्स कोरोना विषाणू-2 (SARS-CoV-2) मधून विकसित झालेला असून त्यामुळे जगभरात अनेक मृत्यू होत आहेत. मात्र, या आजारावर कोणतेही विशिष्ट उपचार नसतांना देखील अनेक रुग्ण त्यातून पूर्ण बरे होत आहेत. याचे कारण म्हणजे, रोगप्रतिकारशक्ती उत्तम असलेल्या रुग्णाच्या शरीरात नैसर्गिकरीत्या तयार होणारी प्रतीरोधके (अँटी बॉडीज) या विषाणूच्या आक्रमणाचा मुकाबला करतात.

गेल्या अनेक वर्षांपासून अशा गंभीर, संसर्गजन्य आजारावर उपचार सुरु असलेल्या  रुग्णांच्या प्लाज्मामधून निर्माण झालेली प्रतिरोधके विविध आजार जसे की अतिसार, धनुर्वात, रेबीज आणि इबोला सारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरली जात आहेत. आज डीएनए आधारित पुनःसंयुग तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रयोगशाळेत  अशी उपचारात्मक प्रतिरोधके विकसित केली जात आहेत. सध्या सार्स-कोविड-2 साठी अशी उपचारात्मक प्रतिरोधके विकसित करण्याचे काम जगभरात युद्धपातळीवर सुरु आहे.

भारतातही, दिल्ली विद्यापीठाच्या दक्षिण परिसरात-संसर्गजन्य आजार संशोधन, शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्रात(UDSC-CIIDRET),  प्राध्यापक विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आणि  जैवतंत्रज्ञान विभाग व विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयच्या पाठिंब्याने हे संशोधन सुरु आहे.

प्रा. चौधरी यांचा हा ग्रुप, प्रतिरोधके असलेल्याले गुणसूत्रे वेगळी काढून त्यांचे एन्कोडिंग करण्याचा प्रयत्न करत आहे. ही गुणसूत्रे सार्स-कोविड चे विषाणू निष्प्रभ करू शकतात. यासाठी संस्थेमधील अँटी बॉडीज चा संग्रह तसेच कोविड-19 च्या आजारातून बरे झालेल्या रुग्णांच्या पेशींमधून काढलेल्या अँटी बॉडीजचे अध्ययन केले जात आहे.

ही प्रतिरोधक गुणसूत्रे वापरुन पुनःसंयुग तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रयोगशाळेत कृत्रिम संयुगीत गुणसूत्रे तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यात, यश आले तर, त्यातून हा विषाणू निष्प्रभ करणे शक्य होईल.

प्रा. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या कोविड-रोधी संशोधनाचाचा हा भाग असून, त्यात राष्ट्रीय रोगप्रतिकारकता संस्थेचे डॉ अमूल्य पांडे आणि पुण्याच्या जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल लिमिटेडचे डॉ संजय सिंग यांचाही सहभाग आहे.

 

[संपर्क: प्रा.विजय के. चौधरी, ई-मेल: vkchaudhary@south.du.ac.in]

 

 U.Ujgare/R.Aghor/P.Malandkar

 



(Release ID: 1613551) Visitor Counter : 288