संरक्षण मंत्रालय

कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात सुमारे 2,000 एनसीसी प्रशिक्षणार्थी आणि 50,000 हून अधिक स्वयंसेवक कार्यरत

Posted On: 11 APR 2020 6:10PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 11 एप्रिल 2020

 

कोविड-19 महामारीविरुद्धच्या लढ्यात 1 एप्रिल 2020 पासून राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रशिक्षणार्थी  (एनसीसी) स्वयंसेवक, 'एनसीसी योगदान' या उपक्रमाअंतर्गत नागरी, संरक्षण आणि पोलिस कर्मचार्‍यांच्या खांद्याला खांदा लावून नागरी प्रशासनास मदत करीत आहेत. सुमारे 2,000 प्रशिक्षणार्थींची याआधीच 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नेमणूक करण्यात आली आहे, ज्यात  तामिळनाडूमध्ये जास्तीत जास्त तैनात असून त्यातील 306 प्रशिक्षणार्थी विविध कर्तव्ये पार पाडत आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

लॉकडाऊन चालूच असल्याने अधिकाधिक राज्ये विविध कामांसाठी एनसीसी स्वयंसेवकांची मागणी करीत आहे. राष्ट्रीय छात्र सेनेच्या मुख्यालयाचे महासंचालक या प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांच्या संख्येवर लक्ष  ठेवून आहेत.  'एनसीसी योगदान' या उपक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत सुमारे 50,000 स्वयंसेवकांनी स्वेच्छेने काम केले आहे.

या कर्तव्यपूर्तीसाठी 18 वर्षांवरील वरिष्ठ विभागातील मुले आणि  मुलींना स्वयंसेवक म्हणून नेमले जाते.  हे प्रशिक्षणार्थी स्वेच्छेने कार्यात योगदान देत आहेत. तैनात करण्यापूर्वी हे प्रशिक्षणार्थी  प्रशिक्षित असल्याची आणि त्यांना सोपविल्या जाणाऱ्या कामाबद्दल ते अवगत असल्याची खातरजमा केली जाते.

सर्व प्रशिक्षणार्थीना त्यांच्या तैनातीच्या वेळी मास्क, ग्लोव्ज इत्यादी योग्य ती सुरक्षा उपकरणे पुरविली जात असल्याची खात्री राज्य यंत्रणा करुन घेत आहे. प्रशिक्षणार्थींच्या सुरक्षिततेसाठी अधिकारी, कनिष्ठ आयुक्त अधिकारी, कायमस्वरूपी मार्गदर्शक कर्मचारी आणि एनसीसीचे सहाय्यक अधिकारी यांच्या देखरेखीखाली या प्रशिक्षणार्थींची नेमणूक केली जात आहे. ज्या राज्यांनी एखादा विभाग सील केला असेल किंवा हॉटस्पॉट म्हणून घोषित केला असेल अशा ठिकाणी या प्रशिक्षणार्थींची नेमणूक केली जात नाही.

वाहतूक व्यवस्थापन, पुरवठा साखळी व्यवस्थापन, खाद्यपदार्थांची तयारी व पॅकेजिंग, अन्न व आवश्यक वस्तूंचे वितरण, रांग व्यवस्थापन, सामाजिक अंतर, नियंत्रण केंद्रांचे व्यवस्थापन आणि सीसीटीव्ही कंट्रोल रूम अशा विविध कर्तव्यासाठी हे प्रशिक्षणार्थी तैनात आहेत. याशिवाय एनसीसी प्रशिक्षणार्थी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप इत्यादी समाज माध्यमांवर संदेश पाठवून कोविड -19 विरुद्धच्या लढ्यात नागरिकांना जागरूक करीत आहेत.

या देशाला सर्वात मोठी गरज असताना एनसीसी पुन्हा एकदा आपला बिनदिक्कत पाठिंबा देऊन चर्चेत आली आहे. आज संपूर्ण देशभरात 14 लाख लोक तैनात असून 29 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेशांमध्ये एनसीसीची 17 संचालनालय आहेत. या संचालनालयाचे पुढे 99 गट आणि 66 युनिटमध्ये विभागणी झाली आहे, जेणेकरून सर्व राज्यांत जिल्हा प्रशासनाकडे प्रशिक्षणार्थींची उपलब्धता सुनिश्चित होईल. सूचना व पुरवठा साखळी व्यवस्थापन कर्तव्यांसाठी प्रशिक्षणार्थींच्या वापराबाबतच्या  सूचना विविध जिल्हा मुख्यालयात पोहोचल्या असल्याने जिल्हा प्रशासनाकडून एनसीसी संचालकांकडून त्यांच्या मागणीविषयी पाठपुरावा केला जात आहे.

*****

B.Gokhale/V.Joshi/P.Kor



(Release ID: 1613360) Visitor Counter : 278