विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
कोविड-19, एन्फ्लुएन्झा सारख्या विषाणूचा फैलाव रोखणारे बहुउपयोगी लेपन विकसित
Posted On:
06 APR 2020 4:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 एप्रिल 2020
बंगळुरू इथल्या जवाहरलाल नेहरू प्रगत वैज्ञानिक संशोधन केंद्राने (JNCASR) एक नवीन सूक्ष्मजीव रोधक पदार्थ शोधून काढला असून या पदार्थाचा लेप इन्फ्ल्यूएन्झाच्या घातक विषाणूंना निष्प्रभ करतो असे सिद्ध झाले आहे. JNCASR ही विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत काम करणारी एक स्वायत्त संस्था आहे. श्वसन मार्गाच्या संसर्गसाठी कारणीभूत असलेल्या या विषाणूला रोखणारे हे लेपन कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी प्रभावीपणे वापरले जाऊ शकते. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत काम करणारे विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन मंडळ या संशोधनासाठी पुढील मदत करणार आहे.
या लेपनाशी संपर्क आल्यावर एन्फ्लुएन्झाचा विषाणू 100% नष्ट होतो हे सिद्ध झाले आहे. एन्फ्लुएन्झाचा विषाणू एका आवरणाने झाकलेला असतो, कोविड-19 चा विषाणू ही तशाच आवरणाने झाकलेला असतो. त्यामुळे या एन्फ्लुएन्झाच्या विषाणू प्रमाणेच कोविड-19 चा विषाणू देखील या लेपनाच्या संपर्कात आल्यास नष्ट होईल, असे संशोधकांचे निष्कर्ष सांगतात. हे लेपन तंत्रज्ञान सुलभ असून, त्यासाठी कुशल कारागिरांची गरज नसेल. कोविड-19 विषाणूवर त्याची चाचणी लवकरच घेतली जाणार आहे.
ही चाचणी यशस्वी ठरल्यास डॉक्टर व नर्सेसनी वापरण्याचे विविध संरक्षक पोषाख , म्हणजेच, गाऊन ,हात मोजे, चेहरा झाकण्याचे आवरण, यामध्ये या लेपनाचा उपयोग होईल. यामुळे वैद्यकीय क्षेत्रातल्या सर्वांना विषाणूपासून अतिरिक्त संरक्षण मिळेल आणि कोविड-19 विरोधात चाललेल्या लढयाला आणखी बळ मिळेल.
आपल्या देशातल्या सर्वोत्तम संशोधन संस्था त्यांच्या मूलभूत विज्ञान संशोधनासाठी जगभरातून लौकिक मिळवतात. आता या संस्था आपल्या ज्ञानाचा देशात असलेल्या आव्हानात्मक परिस्थितीत उपयोग करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. JNCASR ने शोधून काढलेले हे नवे लेपन म्हणजे त्याचेच उदाहरण आहे. आपण अशा प्रकारची अनेक संशोधने उद्योग क्षेत्राच्या सक्रीय मदतीमुळे यशस्वीपणे वापरात आणू शकू, असे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रोफेसर आशुतोष शर्मा यांनी म्हटले आहे.
JNCASR चे प्रो जयंत हलदर, श्रेयन घोष, डॉ रिया मुखर्जी आणि डॉ देबज्योति बसक या संशोधकांच्या चमूने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. लेपनासाठी विकसित केलेले हे विषाणूरोधी संमिश्र पाणी, इथेनॉल, मिथेनॉल आणि क्लोरोफॉर्म यामध्ये विद्राव्य आहे. या संमिश्राच्या जलीय तसेच सेंद्रिय द्रावणांचा लेप किंवा थर कापड, प्लास्टिक, पीव्हीसी, पॉलीयुरेथिन किंवा पॉलिस्टायरिनने बनलेल्या वैद्यकीय साहित्यावर अथवा सामान्य वापराच्या वस्तूंवर देऊ शकतो. या लेपनाच्या संपर्कात हा विषाणू आल्यास तीस मिनिटात तो पूर्ण नष्ट होतो. हे लेपन जिवाणूंच्या संरक्षक आवरणाचादेखील भेद करून त्यांना नष्ट करते. औषधांना दाद न देणारे अनेक जीवाणू व बुरशी या लेपनाच्या संपर्कात आल्यास संपूर्ण मृत झाल्याचे संशोधनात आढळून आले आहे. यात मेथिसिलीन औषधाला दाद न देणाऱ्या एस ओरिअस तसेच फ्लुकोनाझोल औषधाला दाद न देणाऱ्या सी अलबिकन्स या जीवाणूंचा समावेश आहे. यासाठी 40 ते 45 मिनिटांचा संपर्क पुरेसा असतो. या औषधी लेपनाने थर दिलेल्या सुती कापडामुळे 10 लाख जिवाणू पेशी मृत झाल्याचे दिसून आले. तीन ते चार प्रक्रियांमध्ये हे विषाणू रोधी संमिश्र अनेक प्रकारच्या द्रावांमध्ये विरघळू शकते. तयार झालेल्या द्रावणाचा लेप अनेक प्रकारच्या पृष्ठभागांवर सहजगत्या देता येतो. त्यासाठी विशेष कुशल कारागिरांची गरज नसल्यामुळे ही लेपन प्रक्रिया सुलभ आणि वेगाने घडू शकते.
U.Ujgare/U.Raikar/P.Malandkar
(Release ID: 1611816)
Visitor Counter : 320