माहिती आणि प्रसारण मंत्रालय
18 व्या मिफ्फ मध्ये ‘वेब सिरीज/ओटीटी प्लॅटफॉर्म्स – माहितीपटांसाठी आभासी व्यासपीठ’, या विषयावरील उद्बोधक चर्चासत्राचे आयोजन
माहितीपट आणि मुख्य प्रवाहातील चित्रपट ओटीटी च्या मदतीने एकत्र राहू शकतात - दिग्दर्शक शाजी एन करुण
ओटीटी म्हणजे मनोरंजनाची सुलभता, चला, या व्यासपीठाचा आनंद घेऊया : प्रा केजी सुरेश
ओटीटी ने माहितीपट निर्मात्यांना समान संधी द्यायला हवी : माहितीपट निर्माता सुब्बैया नल्लमुथु
प्रविष्टि तिथि:
19 JUN 2024 8:12PM by PIB Mumbai
मुंबई, 19 जून 2024
18 व्या मिफ्फ, म्हणजेच मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ्फ-2024) आज ‘वेब सिरीज/ओटीटी प्लॅटफॉर्म्स – माहितीपटांसाठी आभासी व्यासपीठ’, या विषयावरील उद्बोधक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्रात माहितीपट निर्मात्यांचा संघर्ष आणि त्यांच्या समोरील आव्हानांचा आढावा घेण्यात आला आणि माहितीपट निर्मात्यांना संधी प्रदान करण्यात ओटीटी प्लॅटफॉर्म बजावत असलेल्या भूमिकेवर प्रकाश टाकण्यात आला.

पॅनल सदस्यांमध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त, राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर आणि केरळ राज्य चित्रपट विकास महामंडळाचे अध्यक्ष शाजी एन करुण, भोपाल मधल्या माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रा.के.जी. सुरेश, राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शक आणि निर्माता सुब्बैया नल्लमुथु, आणि सॉफ्टवेअर विपणन आणि विकास तज्ञ आणि सार्वजनिक धोरण कार्यकर्ते रतन शारदा, यांचा समावेश होता. भारतीय माहितीपट निर्माता संघटनेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ माहितीपट निर्माते संस्कार देसाई यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.

दिग्दर्शक शाजी एन करुण यांनी यावर भर दिला की सिनेमा आणि माहितीपट वेगवेगळ्या जॉनरचे (धाटणी) असल्याने ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकत्र राहू शकतात. “ओटीटी या दोन्हीना सामावून घेऊ शकते. माहितीपट निर्मात्यांनी त्यांचे काम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्यासपीठाचा वापर करावा,” केरळमधील ओटीटी बरोबरच अनुभव सांगताना ते म्हणाले.

प्रा.के.जी. सुरेश यांनी ओटीटीद्वारे आशयसंपन्न सामुग्रीचे लोकशाहीकरण आणि विकेंद्रीकरण झाल्याचे नमूद करून, ही मनोरंजनातील क्रांती असल्याचे सांगितले. "ओटीटी हे केवळ आशयसंपन्न सामग्रीचे लोकशाहीकरण आणि विकेंद्रीकरण नाही, तर मनोरंजनाची सुलभता देखील आहे. या व्यासपीठाचा स्वीकार करूया,” असे सांगताना, त्यांनी तंत्रज्ञानातील बदलांचा सकारात्मक परिणाम स्पष्ट करण्यासाठी सायकल रिक्षांच्या आधुनिकीकरणाचे उदाहरण दिले.

चित्रपट निर्माते आणि 18 व्या मिफ्फ मधील व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार विजेते, सुब्बैया नल्लमुथु यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मबरोबरचा माहितीपट निर्मात्यांचा संघर्ष आणि त्यांच्यापुढील आव्हाने सांगितली. "जेव्हा ओटीटी आला तेव्हा माहितीपट निर्मात्यांना वाटले की ही एक मोठी संधी आहे. पण आता, 4-5 वर्षांनंतर, त्यांना कठोर वास्तवाचा सामना करावा लागतो. ओटीटी वर क्वचितच एखादा भारतीय माहितीपट असेल. व्यापारीकरणामुळे, ओटीटी प्लॅटफॉर्म माहितीपट, अगदी पुरस्कार विजेता माहितीपट देखील खरेदी करायला तयार नाहीत," असे नमूद करून, डॉक्युमेंटरी निर्मात्यांना या व्यासपीठांवर समान संधी मिळावी असे आवाहन त्यांनी केले.

रतन शारदा यांनी काही ओटीटी प्लॅटफॉर्म केवळ व्यावसायीकीकरणावर भर देत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. काही ओटीटी प्लॅटफॉर्म केवळ पैसे कमवण्याचा आणि प्रेक्षकांचा विचार करतात. त्यांनी त्यांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवायला हवी,” ते म्हणाले. शारदा यांनी असेही सुचवले की सरकारने माहितीपटांसाठी एक समर्पित व्यासपीठ तयार करण्याची योजना आखावी, जी या उद्योगात कोणतीही ओळख नसलेल्या नवोदितांसाठी फायद्याची ठरेल.
मिफ्फ -2024 मधील पॅनेल चर्चेने माहितीपट निर्मात्यांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मची क्षमता आणि आव्हाने अधोरेखित केली, तसेच माहितीपटांसाठी अधिक समावेशक आणि अनुकूल वातावरणाचा पुरस्कार केला.

* * *
PIB Team MIFF | N.Chitale/R.Agashe/D.Rane | 44
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2026722)
आगंतुक पटल : 111