Posted On:
29 NOV 2026 7:47PM by PIB Mumbai
काशी तमिळ संगमम 5.0 (केटीएस 5.0) चा एक भाग म्हणून आज नमो घाट येथे कथाकथन, चित्रकला आणि प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. भारतीय राष्ट्रीय पुस्तक न्यासाने (एनबीटी) आयोजित केलेल्या या स्पर्धांमध्ये विविध शाळांमधील 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

केटीएसच्या पाचव्या आवृत्तीची ‘तिरुक्कुरळ पयिल्वोम – तिरुक्कुरळ अभ्यास करें’ ही संकल्पना या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना होती. कथाकथन स्पर्धेत तिरुक्कुरळवर आधारित कथांचे सादरीकरण करण्यात आले. त्यातून नैतिकता, सदाचरण, ज्ञान, करुणा आणि मानवता यांसारख्या मूल्यांवर प्रकाश टाकण्यात आला. चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी या साहित्यकृतीतून व्यक्त होणाऱ्या विचारांचे आणि संदेशांचे चित्रांच्या माध्यमातून दर्शन घडवले. प्रश्नमंजुषा स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांची तिरुक्कुरळ आणि त्यातील शिकवणुकीविषयीची समज तपासण्यात आली.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाने विद्यार्थ्यांना आपल्या साहित्यिक आणि शैक्षणिक उपक्रमांची माहिती देण्यासाठी परिचयात्मक सत्राचेही आयोजन केले. यावेळी विद्यार्थ्यांना 7,000 हून अधिक पुस्तकांचा संग्रह उपलब्ध करून देणाऱ्या ‘राष्ट्रीय ई-पुस्तकालय’ या डिजिटल ग्रंथालयाची माहिती देण्यात आली. या मंचाचा वापर करून वाचनाची सवय विकसित करण्यासाठी आणि ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले.
नमो घाट येथे 50 हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये हस्तकला, पारंपरिक उत्पादने तसेच काशी आणि तमिळनाडूच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवण्यात आले आहे. काशी आणि तमिळनाडूच्या विविध कलात्मक परंपरा अधोरेखित करणारे सांस्कृतिक कार्यक्रमही दररोज संध्याकाळी नमो घाट येथे आयोजित केले जात आहेत. आजच्या कार्यक्रमांमध्ये तिरुचिरापल्ली येथील तमिळ लोकनृत्य, वाराणसीतील कलाकाराने सादर केलेली भजने आणि चेन्नई येथील शास्त्रीय नृत्याचा समावेश होता.

काशी तमिळ संगमम 5.0 चा एक भाग म्हणून तमिळनाडूमधील 50 प्रशिक्षित शिक्षक 30 नोव्हेंबर 2026 पासून वाराणसी, प्रयागराज आणि अयोध्या येथील निवडक शाळांमध्ये इयत्ता 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना तिरुक्कुरळमधील शिकवण आणि मूल्यांचे शिक्षण देण्यास सुरुवात करतील. हा उपक्रम 10 दिवसांच्या कालावधीत राबवण्यात येणार आहे. यासाठी वाराणसी येथे 20, तर अयोध्या आणि प्रयागराज येथे प्रत्येकी 15 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज बनारस हिंदू विद्यापीठात या शिक्षकांसाठी परिचयात्मक सत्राचेही आयोजन करण्यात आले.
***
शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com