57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

ऑस्कर पुरस्कारांची प्रक्रिया उलगडताना: 57व्या इफ्फीमध्ये नताली वेड यांनी चित्रपट निर्मात्यांना अकादमी पुरस्कारांसाठी चित्रपट सादर करण्याची प्रक्रिया आणि जागतिक संधींबद्दल केले मार्गदर्शन

Posted On: 26 NOV 2026 7:43PMby PIB MumbaiRelease ID: 2342347Views: 4

गोवा, 26 नोव्‍हेंबर 2026

 

गोव्यात सुरू असलेल्या 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) निमित्ताने आज कला अकादमीमध्ये आयोजित 'डिकोडिंग अकादमी अवॉर्ड्स' या मास्टरक्लासमध्ये चित्रपट निर्माते, विद्यार्थी आणि चित्रपटप्रेमींना अकादमी पुरस्कारांसाठी चित्रपट सादर करण्याची प्रक्रिया, पात्रतेचे निकष, प्रचारमोहीम आणि उदयोन्मुख कलाकारांसाठीच्या संधींबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.

'अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस'च्या मेंबर  रिलेशन अँड अवॉर्ड अ‍ॅडमिनीस्ट्रेशन  विभागाच्या उपाध्यक्ष नताली वेड यांनी हा मास्टरक्लास घेतला. याप्रसंगी इफ्फी महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

अकादमी पुरस्कारांसाठी चित्रपट सादर करण्याच्या विस्तृत प्रक्रियेबद्दल चित्रपट निर्मात्यांना अनेकदा माहिती नसते, असे निरीक्षण नोंदवत नताली वेड यांनी सांगितले. ही प्रक्रिया सोपी करून सांगणे आणि सुरुवातीच्या सादरीकरणापासून ते पुरस्कारांच्या अंतिम टप्प्यापर्यंतच्या औपचारिक कार्यपद्धती, नियम आणि आवश्यकतांशी चित्रपट निर्मात्यांना परिचित करणे हा या या मास्टरक्लासचा उद्देश होता. 'द एलिफंट व्हिस्परर्स' सारख्या भारतीय चित्रपटाला मिळालेल्या जागतिक मान्यतेचा संदर्भ देत, त्यांनी यावर प्रकाश टाकला की चित्रपट हे भौगोलिक सीमा ओलांडणारे माध्यम असून अकादमी भारतासह जगभरातील चित्रपट निर्माते आणि चित्रपट व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करते.

नताली वेड यांनी आपल्या सादरीकरणात, सर्वसाधारण प्रवेश (General Entry) आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट (Best Picture) पुरस्कारांसाठीच्या पात्रतेचे निकष आणि प्रक्रिया स्पष्ट केली. त्यांनी चित्रपटगृहांमधील प्रदर्शनाच्या आवश्यकता यासंदर्भातील  रूपरेषा दिली. यामध्ये अमेरिकेतील सहा निर्धारित महानगरीय क्षेत्रांपैकी किमान एकामध्ये सात दिवस सलग चित्रपट प्रदर्शित करण्याची पात्रता तसेच अभिनय, छायाचित्रण, दिग्दर्शन, संपादन, संगीत, ध्वनी, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि लेखन यांसारख्या विविध श्रेणींमधील पात्रता निकषांवर त्यांनी चर्चा केली.

आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म, माहितीपट आणि लघुपट या विभागांसाठी चित्रपट सादर करण्यासाठीच्या आवश्यकताही त्यांनी स्पष्ट केल्या. मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधील सहभागाच्या माध्यमातून पात्रता कशी मिळवता येते, याची माहिती ही त्यांनी दिली. या सत्रात त्यांनी अकादमी स्क्रीनिंग रूम या व्यासपीठाचाही परिचय करून दिला. या व्यासपीठाच्या माध्यमातून अकादमीच्या सदस्यांना चित्रपट पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले जातात. तसेच चित्रपट सादरीकरणासाठीच्या आवश्यकता , तांत्रिक निकष आणि लागू असलेली शुल्क यांची माहितीही या सत्रात देण्यात आली.

अकादमीच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक पुरस्कारांवर प्रकाश टाकत, नताली यांनी चित्रपट निर्मिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीला चालना देणाऱ्या नवकल्पनांना या पुरस्कारांद्वारे कशाप्रकारे गौरवण्यात येते हे स्पष्ट केले. त्यांनी अकादमीच्या जागतिक प्रतिभा विकास कार्यक्रमांचीही ओळख करून दिली. यात स्टुडंट अकादमी अवॉर्ड्स, पटकथालेखनातील निकोल फेलोशिप्स आणि महिलांसाठी अकादमी गोल्ड फेलोशिप यांचा समावेश आहे. हे कार्यक्रम उदयोन्मुख चित्रपट निर्माते आणि पटकथा लेखकांना मार्गदर्शन आणि व्यावसायिक संधी प्रदान करतात.

मास्टरक्लासचा समारोप एका संवादात्मक सत्राने झाला. यावेळी नताली वेड यांनी चित्रपटांची पात्रता, आंतरराष्ट्रीय प्रवेशिका, चित्रपट महोत्सवांच्या माध्यमातून पात्रता मिळवण्याची प्रक्रिया  आणि तांत्रिक आवश्यकता यांवरील प्रश्नांची उत्तरे दिली. चित्रपट निर्मात्यांनी मार्गदर्शनासाठी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले. अकादमीचे प्रतिनिधी आणि स्थानिक संपर्क प्रतिनिधी चित्रपट निर्मात्यांना सादरीकरणाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी मदत करू शकतात, असे त्यांनी सांगितले. 

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2342347
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026