57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

‘इगो वुई रीच ऑल’ या चित्रपटात घाना देशात रस्त्यांवर वाढणाऱ्या मुलांचे बालपण, ओळख आणि चिकाटीचे दर्शन; संभाव्य आंतरराष्ट्रीय सहकार्यावर चित्रपट निर्मात्यांचा भर

Posted On: 25 NOV 2026 7:01PMby PIB MumbaiRelease ID: 2341630Views: 10

गोवा, 25 नोव्‍हेंबर 2026

 

घाना, फ्रान्स आणि सौदी अरेबिया यांची सहनिर्मिती असलेल्या ‘इगो वुई रीच ऑल (अवर टाईम विल कम)’ या चित्रपटाच्या चमूने आज गोव्यात पणजी इथे 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फीच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागांतर्गत प्रदर्शित झालेल्या या 104 मिनिटांच्या चित्रपटाचे आशियातील पहिले प्रदर्शन या महोत्सवात होत आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक अमारतेई आर्मार आणि निर्माते येमो इके यांनी चित्रपटाच्या निर्मितीच्या प्रवासाविषयी, घानामधील रस्त्यांवर जगणाऱ्या मुलांचे बालपण आणि जगण्यासाठीची धडपड यांचे चित्रण करण्याविषयी तसेच स्थानिक मातीशी जोडलेल्या कथा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महत्त्व या विषयांवर आपले अनुभव आणि विचार मांडले.

चित्रपटाच्या विषयामागील प्रेरणेविषयी बोलताना दिग्दर्शक अमारतेई आर्मार म्हणाले की, घानामधील रस्त्यांवर वाढणाऱ्या मुलांचे बालपण आणि समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहून जीवन जगणाऱ्या तरुणाईच्या कथा यांविषयी त्यांना दीर्घकाळापासून कुतूहल वाटत आले आहे. समाजात अनेकदा दुर्लक्षित असलेल्या या घटकांच्या कथा व्यापक राष्ट्रीय आणि चित्रपटविषयक चर्चेचा भाग कशा बनू शकतात, याचा शोध घेण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे, असे त्यांनी सांगितले. विविध प्रकारच्या परिस्थितीत वाढणारी तरुणाई हीदेखील देशाचा आणि त्याच्या भविष्याचा तितकीच अविभाज्य भाग आहे, हे या कथानकाच्या माध्यमातून अधोरेखित करण्याचा चित्रपट निर्मात्यांचा प्रयत्न आहे.

यावेळी आर्मर यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातील आपल्या प्रवासाचा आणि घानाशी असलेल्या आपल्या आजवरच्या संबंधांचा उल्लेख  केला.  चित्रपट निर्मात्यांनी स्वतःच्या कथा स्वतः मांडण्याची जबाबदारी स्वीकारावी आणि आपले विचार व भूमिका प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवाव्यात, असे आर्मर यांनी सांगितले. स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांना अनेकदा आर्थिक मर्यादांचा सामना करावा लागतो. त्यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि चित्रपट उद्योग अधिक सक्षम करण्यासाठी, चित्रपटांचा दर्जा आणि त्यातील कथाकथनाची क्षमता अधोरेखित करणारे चित्रपट निर्माण करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारत आणि घाना यांच्यात सांस्कृतिक देवाणघेवाण होण्यास मोठा वाव असल्याचे सांगताना, दोन्ही देशांच्या चित्रपटसृष्टीत अनेक बाबतींत साम्य असल्याचे चित्रपट निर्मात्यांनी नमूद केले. भारतातील बॉलीवूडप्रमाणेच घानामध्ये घॅलीवूड ही चित्रपटसृष्टी आहे. दोन्ही देशांतील काही सांस्कृतिक अनुभव आणि सामाजिक परिस्थिती सारखी असल्यामुळे, एका देशातील प्रेक्षकांना दुसऱ्या देशातील चित्रपटांमधील कथांशी सहज जोडून घेता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

भारत आणि घानामधील चित्रपट निर्मात्यांनी परस्पर सहकार्य वाढवण्याची इच्छाही व्यक्त केली. घानातील कलावंत, त्यांच्या कथा आणि चित्रपट निर्मितीचे अनुभव भारतात आणणे, तसेच भारतीय कलावंत आणि चित्रपट घानापर्यंत पोहोचवणे, अशा विविध संधींचा शोध घेण्याची तयारी त्यांनी दर्शवली. अशा सहकार्यामुळे दोन्ही देशांमधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होतील, चित्रपट निर्मात्यांना नव्या संधी उपलब्ध होतील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आफ्रिकन चित्रपटांना अधिक ओळख मिळेल, असे त्यांनी सांगितले. 

या वार्ताहर परिषदेचे सूत्रसंचालन मनन सिंह यांनी केले.

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

 

* * *

पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्‍पलकट्टी/रेश्मा बेडेकर/राज दळेकर/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2341630
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026