आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्रिमंडळाने आसाम मध्ये सिलचर येथील डोलू येथे 2,014 कोटी रुपये खर्चाच्या ग्रीनफिल्ड विमानतळाच्या विकासाला दिली मंजुरी

Posted On: 25 NOV 2026 7:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2026

सिलचर येथील विद्यमान विमानतळाच्या ठिकाणी संरक्षण विभागाच्या भूवेष्टित नागरी परिसरात येणारे परिचालन अडथळे आणि जागेच्या मर्यादांवर मात करण्यासाठी तसेच प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने भारतीय विमानतळ प्राधिकरणाला आसाम मध्ये सिलचर येथील डोलू येथे ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करायला मंजुरी दिली आहे.या प्रकल्पासाठी अंदाजे 2,014 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

आसाम मधील कचार जिल्ह्यात वसलेले डोलू हे बराक व्हॅलीचे सामरिक केंद्र आहे - हा भूप्रदेश चहाच्या विस्तीर्ण बागा , कृषी आधारित उद्योग आणि पर्यावरणपूरक आणि सांस्कृतिक पर्यटनाच्या दृष्टीने विपुल क्षमता असलेला भाग आहे.

ही प्रस्तावित टर्मिनल इमारत एकूण 12,351 चौरस मीटर क्षेत्रफळावर असेल असा अंदाज असून येथे गर्दीच्या वेळी 800 प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असेल. तसेच आधुनिक प्रवासी सुविधा, शाश्वत हरित इमारत तत्त्वे आणि गरजेप्रमाणे विस्तारण्याची  क्षमता उपलब्ध असेल. 

तसेच या प्रकल्पाअंतर्गत A-320 प्रकारच्या विमानांच्या उड्डाणासाठी आणि उतरविण्यासाठी योग्य 2,705 मीटर x 45 मीटर लांबी-रुंदीच्या , कोड -4C मानकांनुसार धावपट्टीचा विकास केला जाणार आहे याशिवाय, या प्रकल्पामध्ये नवीन एप्रन (Apron) बांधण्यात येणार असून, त्यावर एकाच वेळी 6  A-320 विमानांच्या पार्किंगची सुविधा असेल. विमानतळावर स्वतंत्र आयसोलेशन बे (Isolation Bay) उभारण्यात येणार आहे.

अत्यंत मोक्याचा प्रकल्प म्हणून, डोलू ग्रीनफिल्ड विमानतळ दक्षिण आसाम मधील आणि शेजारील राज्यांच्या लगतच्या भागांमधील हवाई वाहतुकीची वाढती मागणी पूर्ण करेल. यामुळे सध्याच्या विमानतळावर येणारा पायाभूत सुविधांवरील ताण कमी होईल, व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळेल आणि साहजिकच प्रादेशिक आर्थिक क्षमतांचा विस्तार होईल आणि ईशान्य भारताला व्यापक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विकास मार्गांशी जोडणारे एक जागतिक दर्जाचे प्रवेशद्वार उपलब्ध होईल.

शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2341546) अभ्यागत कक्ष : 3