57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

तिची दृष्टी, तिचा वारसा, तिचे स्वातंत्र्य: 57 व्या इफ्फीमध्ये जागतिक चित्रपटांमधील कथांना पुनर्परिभाषित करण्यासंदर्भात महिला चित्रपटनिर्मात्यांनी मांडले विचार

Posted On: 24 NOV 2026 4:55PMby PIB MumbaiRelease ID: 2340890Views: 8

गोवा, 24 नोव्‍हेंबर 2026

 

गोव्यात सध्या सुरु असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या ‘तिची दृष्टी, तिचा वारसा, तिचे स्वातंत्र्य:जागतिक चित्रपटविश्वाला आकार देणाऱ्या महिला’ या विषयावरील गटचर्चेमध्ये वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीतून आलेल्या महिला चित्रपटनिर्मात्यांनी ओळख, सांस्कृतिक वारसा तसेच सर्जनशीलतेचे स्वातंत्र्य या विषयांबाबत आपापले अनुभव तसेच दृष्टीकोन समायिक केले. या चर्चेमध्ये किर्गिज लेखिका-दिग्दर्शक नार्घिझा दोतिएवा, रोमानियातील रोमा अभिनेत्री आणि चित्रपट निर्मात्या अलिना सर्बन तसेच मेक्सिकन-अमेरिकन लेखिका-दिग्दर्शक सुझॅन अंड्रू्यज कोरिया यांनी भाग घेतला. या चर्चेचे सूत्रसंचालन चित्रपटनिर्माते अभिषेक जैन यांनी केले.

या चर्चेची सुरुवात करताना, जैन यांनी गटातील मान्यवरांना त्यांचा या क्षेत्रातील वैयक्तिक प्रवास आणि त्यांच्या चित्रपटीय दृष्टीकोनांना घडवणाऱ्या सांस्कृतिक प्रभावांबद्दल विचार मांडण्यासाठी आमंत्रित केले. किर्गीझस्तानमध्ये जन्मलेल्या आणि तळ्याच्या काठावर वसलेल्या एका छोट्या मच्छिमार गावात मोठ्या झालेल्या नार्घिझा दोतिएवा यांनी पारंपरिक किर्गिज मौखिक कवितांचे त्यांच्या आजोबांनी केलेलं पाठांतर त्यांच्या कथाकथनाच्या आवडीला कसे कारणीभूत ठरले ते सांगितले. जाहिरात क्षेत्रात कारकीर्द घडवल्यानंतर, त्यांनी स्वतःच्या पैशातून सुरुवातीचे चित्रपट निर्मिती प्रकल्प पूर्ण केले. या प्रकल्पांसाठी त्यांना किर्गीझीस्तानच्या - ज्यामध्ये मानस या महाकाव्याचा देखील समावेश आहे अशा - साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशापासून प्रेरणा मिळाली.

रोमानियातील बुखारेस्टमध्ये स्थायिक रोमा कुटुंबात जन्मलेल्या अलिना सर्बन यांनी इफ्फीमधील त्यांच्या सहभागाला, त्यांच्या पूर्वजांच्या मायभूमीकडे भावनिक पुनरागमन, असे संबोधले. भारतीय मूळ असलेल्या रोमा भाषेतील शब्दांच्या समावेशासह, रोमा समुदाय आणि राजस्थान यांच्या दरम्यान असलेल्या ऐतिहासिक दुव्याचा त्यांनी उल्लेख केला. बुखारेस्टमोठे होताना पूर्वग्रह तसेच सामाजिक उपेक्षिततेचा अनुभव घेतलेल्या सर्बन रूढीवादाला आव्हान देण्यासाठी नाटक आणि चित्रपट विश्वाकडे वळल्या. त्यांच्या ‘आय मॅटर’या दिग्दर्शक क्षेत्रातील पदार्पणाच्या फिचर चित्रपटासह इतर निर्मितीमधून रोमा समुदायातील कथांना त्यांचा अधिकार पुन्हा मिळवून देण्याचा तसेच त्यामधील लवचिकता आणि प्रतिष्ठेच्या कथांना उजेडात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

मेक्सिकन-अमेरिकन चित्रपट दिग्दर्शिका सूझन अँड्र्यूज कोरिया यांनी ‘ला कासादोरा’ अर्थात ‘द हंट्रेस’ या आपल्या पहिल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाच्या दशकभराच्या प्रवासाविषयी आपले अनुभव सांगितले. मेक्सिकोतल्या सियुदाद हुआरेझ या शहराच्या पार्श्वभूमीवर घडणारा हा चित्रपट, स्त्रियांच्या हत्यांच्या आणि त्यांच्यासंबंधी हिंसाचाराच्या सत्य घटनांपासून प्रेरित झालेला आहे. सुरुवातीला संताप आणि सहानुभावाची जाणीव व्यक्त करण्याच्या निकडीतून सुरू झालेला हा चित्रपट पुढे निराशा, जगण्यासाठीचा संघर्ष आणि स्त्रियांची स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता यांचा सहानुभूतीपूर्वक वेध घेणाऱ्या कलाकृतीत विकसित झाला.  

स्वतंत्र चित्रपटकर्त्यांना भेडसावणारी निधीची मर्यादा, लिंगभेद आणि ठराविक साच्यांमध्ये अडकवणारी चित्रणपद्धती यांसारख्या संरचनात्मक आव्हानांवरही या चर्चेत विचारमंथन झाले. अनेकदा निर्माते गुंतागुंतीचे आणि अस्वस्थ करणारे विषय स्वीकारायला कचरतात, असे कोरिया यांनी सांगितले. त्याऐवजी व्यावसायिकदृष्ट्या अधिक सुरक्षित ठरणाऱ्या कथांना प्राधान्य दिले जाते, हे त्यांनी नमूद केले. महिला दिग्दर्शकांना मात्र आपली क्षमता आणि पात्रता सिद्ध करण्यासाठी वारंवार प्रयत्न करावे लागतात, असेही त्या म्हणाल्या. आपल्या पटकथा रोमा समुदायाच्या साचेबद्ध चित्रणाशी जुळत नसल्यामुळे त्यांना अनेकदा निधी नाकारण्यात आला असे शेरबान यांनी सांगितले. 

केवळ प्रतिनिधित्वाच्या औपचारिकतेपोटी नव्हे, तर कलात्मक गुणवत्तेच्या आधारावर आपली दखल घेतली जाणे महत्त्वाचे असल्याचे या दोघींनी अधोरेखित केले. उपेक्षित प्रदेशांतल्या वैविध्यपूर्ण आणि त्या त्या संस्कृतीच्या मुळांशी जोडलेल्या कथांना प्रोत्साहन देण्यात प्रेक्षक आणि चित्रपट महोत्सवांची भूमिका महत्त्वाची आहे, असे दोतिएव्हा यांनी सांगितले.

आपापल्या सर्जनशील प्रवासातले अनुभव सांगताना, या चर्चेत सहभागी चित्रपट दिग्दर्शिकांनी नवोदित दिग्दर्शकांना आपल्या भावनिक आणि सांस्कृतिक मुळांशी प्रामाणिक राहण्याचे आवाहन केले. स्थानिक जगण्यातून आलेल्या अस्सल कथा जगभरातल्या प्रेक्षकांच्या मनाला भिडू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

 

* * *

पीआयबी मुंबई | राधिका अघोर/संजना चिटणीस/निखिलेश चित्रे/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2340890
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026