गोवा, 23 नोव्हेंबर 2026
पत्रसूचना कार्यालयाने आज गोव्यात सुरु असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते सूरज कुमार यांनी ‘निर्मांजली: द चंदीगड ऑफ मॅसिए नोविकी’ या त्यांच्या नॉन-फिचर माहितीपटाच्या माध्यमातून वास्तुरचनाकार मॅसिए नोविकी यांच्या फारसा कुणाला माहित नसलेल्या वारशावर प्रकाश टाकला. हा चित्रपट चंदीगड शहरात दिसणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण जाळीदार दर्शनी रचना, शेजारच्या बाजारपेठा तसेच शहरी परिदृश्य यांमधून प्रतीत होणाऱ्या या शहराच्या वास्तुकलाविषयक दृष्टीमध्ये नोविकी यांनी दिलेल्या योगदानाचा शोध घेतो.

शहरावर साचेबंद भव्य रचना लादण्याऐवजी, नोविकी यांच्या रचना भारतातील हवामान आणि समाज जीवन यांना प्रतिसाद देणाऱ्या होत्या. त्यांनी एका कृत्रिम जलाशयाची आखणी केली जो नंतरच्या काळात सुखना तलावात रुपांतरीत झाला. त्याबरोबरच त्यांनी शाळा, उद्याने, बाजारपेठा तसेच सामुदायिक जागांनी युक्त अशा स्वयंपूर्ण निवासी ‘सुपरब्लॉक्स’ची संकल्पना मांडली. मात्र, वर्ष 1950 मध्ये त्यांच्या या कल्पना अंमलात आणण्यासाठी भारतात परतण्याची तयारी करत असतानाच, इथे येण्याआधी त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. नोविकी यांच्या संकल्पचित्रांमधून त्यांनी मांडलेल्या कल्पना जिवंत राहिल्या ज्या स्विस वास्तुरचनाकार पिएर जेनरेट यांनी ओळखल्या आणि चंदीगड शहराच्या सेक्टर 7 आणि 8 च्या विकासामध्ये त्यांनी या कल्पनांचा समावेश केला.
सर्वांना फारशा ज्ञात नसलेल्या या इतिहासाची पुनर्बांधणी करण्यासाठी भारताबाहेर अभिलेखागार क्षेत्रात प्रचंड संशोधन करण्याची गरज होती. नोविकी यांच्या समग्र कार्यापैकी केवळ 20 ते 25 संकल्पना चंदीगडच्या वास्तुरचना संग्रहालयात जतन करून ठेवलेल्या होत्या. त्यामुळे सूरज कुमार यांनी द ट्रिब्युनच्या विंटेज आवृत्त्यांमधून अभिलेखागार साहित्याचा शोध घेतला आणि ज्या नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात नोविकी यांनी वास्तुरचना विभागप्रमुख म्हणून काम केले होते त्या विद्यापीठातील डिजिटलीकरण केलेल्या कल्पनाचित्रांच्या नोट्स शोधल्या. पोलंडचा दूतावास आणि पोलिश संस्थेने त्यांना या संशोधनाला मदत लेली आणि पोलंडच्या राजदूतांनी देखील महत्त्वाच्या सूचना केल्या.

पत्रकारांशी बोलताना कुमार म्हणाले की, नोविकीयांच्या 75 वर्षे जुन्या ब्लूप्रिंट्समधून उष्णतेचा मारा आणि शहरी विस्ताराचा ताण सहन करणाऱ्या सध्याच्या भारतीय शहरांसाठी मौल्यवान धडे मिळाले आहेत. आधुनिक वास्तुकलेने स्थानिक हवामान आणि मानवी गरजा यांना प्रतिसाद द्यायला हवा यावर त्यांनी अधिक भर दिला.
सूरज कुमार आणि डॉ. गरिमा सिंह यांच्या नेतृत्वाखाली जॉन्सन सूरज फिल्म्स इंटरनॅशनल (जेएसएफआय) कंपनीतर्फे निर्मित निर्मांजली या चित्रपटाची पटकथामुर्तझा आली खान यांनी लिहिली असून, छायाचित्रण राकेश राणा यांनी केले आहे, संकलन अमित रॉय यांनी केले तर संगीत सुभेन्द्र राव आणि सास्किया राव-दे हास यांचे आहे. ज्येष्ठ अभिनेते व्हिक्टर बॅनर्जी देखील या चित्रपटात अभिनय केला आहे. भारतीय मास कम्युनिकेशन संस्थेचे (आयआयएमसी) माजी विद्यार्थी असलेले सूरज यांच्याकडे 27 वर्षांचा माहितीपट आणि फिचर चित्रपटनिर्मितीचा अनुभव आहे. त्यांच्या यापूर्वी केलेल्या कामांमध्ये 500 हून अधिक माहितीपट आणि थिंकिंग ऑफ हिम आणि पीपलांत्री यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
आरुषी बब्बर यांनी या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन केले
पत्रकार परिषदेचा व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा:
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्पलकट्टी/संजना चिटणीस/दर्शना राणे