ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नई चेतना 5.0 चा शुभारंभ 25 नोव्हेंबर रोजी होणार


महिला आणि बालविकास, तसेच संबंधित विषयांवर कार्यरत असलेल्या 15 मंत्रालये आणि विभागांच्या संयुक्त आंतरमंत्रालयीन सल्लागार सूचनेचे तसेच हिंसाचार मुक्त गाव उपक्रमासाठी स्वाक्षरी करण्यात आलेल्या चतुर्पक्षीय सामंजस्य कराराचे देखील अनावरण

Posted On: 23 NOV 2026 3:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2026

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे राष्ट्रीय स्तरावरील लिंगभाव समानता मोहिमेच्या नवीन जाणीव  - बदलाच्या दिशेने पुढाकार अर्थात ‘नई चेतना – पहल बदलाव की’ या पाचव्या आवृत्तीचा शुभारंभ 25 नोव्हेंबर 2026 रोजी करण्यात येणार आहे. महिलांवरील हिंसाचार निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून या मोहिमेचा प्रारंभ होणार आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत राबवण्यात येणारी ही मोहीम एक महिन्याची असून संपूर्ण देशभरात 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2026 या कालावधीत राबवण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे ग्रामीण भागात लिंगभाव समानता, महिलांचे सक्षमीकरण आणि महिलांवरील हिंसाचाराबाबत जनजागृती करण्यावर भर दिला जाणार आहे.

केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी आणि  शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते या राष्ट्रीय मोहिमेचे उद्घाटन होणार असून केंद्रीय महिला आणि  बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांची प्रमुख उपस्थिती असेल. तसेच, केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेश पासवान, सहभागी मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी, राज्य सरकारांचे प्रतिनिधी, विकास क्षेत्रातील भागीदार आणि देशभरातील सामुदायिक संस्थांशी संबंधित महिला नेत्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन सोहळा  दुपारी 2:00 वाजता भारतरत्न सी. सुब्रमण्यम सभागृह, एनएएससी  कॉम्प्लेक्स, देव प्रकाश शास्त्री मार्ग, पुसा, नवी दिल्ली – 110012 येथे होईल.

नई चेतना 5.0' ची संकल्पना, “प्रवेशापासून कर्तृत्वापर्यंत: एका विकसनशील भारतासाठी उपजीविका आणि समान संधींद्वारे महिलांचे सक्षमीकरण,” अशी आहे. या संकल्पनेतून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, उपजीविकेतील सहभाग आणि स्वतंत्र निर्णयक्षमता यांसाठी महिलांचा प्रवेश आणि गतिशीलता हे महत्त्वपूर्ण घटक असल्याचे अधोरेखित होते.

चार परस्परसंबंधित प्राधान्यक्षेत्रे

नई चेतना 5.0 उपक्रमामध्ये  महिलांचे आर्थिक सक्षमीकरण केंद्रस्थानी असून यासह चार परस्पर संबंधित प्राधान्य क्षेत्रे आहेत: महिलांना आर्थिक योगदान देणाऱ्या म्हणून मान्यता मिळवून देणे, महिलांचा  मालमत्तेमध्ये हक्क आणि नियंत्रण मजबूत करणे, सुरक्षित गतिशीलतेला प्रोत्साहन देणे आणि विनामोबदला काळजीच्या कामाचे पुनर्वितरण करणे. याशिवाय उपजीविकेच्या संधी, वित्तीय सेवा, सार्वजनिक ठिकाणे आणि आवश्यक सेवांमधील महिलांचा प्रवेश नियंत्रित करणाऱ्या अडथळ्यांना दूर करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच, महिलांना मुक्तपणे, सुरक्षितपणे आणि स्वावलंबीपणे वावरता यावे, यासाठी आवश्यक उपाययोजना आणि जनजागृती करण्यावरही विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

या कार्यक्रमातील प्रमुख वैशिष्ट्ये

15 मंत्रालये/विभागांचा समावेश असलेली संयुक्त आंतर मंत्रालयीन सल्लागार सूचना

या राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे 15 मंत्रालये आणि विभागांचा सहभाग असलेल्या संयुक्त आंतरमंत्रालयीन मार्गदर्शक सूचनेचे  प्रकाशन हे असेल.  या मार्गदर्शक सूचनेतून  ‘नई चेतना 5.0’ मोहिमेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये समन्वय साधून एकत्रितपणे कार्य करण्याची सामूहिक बांधिलकी अधोरेखित केली जाणार आहे. यामुळे मंत्रालये आणि विभागांना अभियानाच्या उद्दिष्टांशी सुसंगतपणे  त्यांचे उपक्रम, संस्थात्मक यंत्रणा आणि आघाडीचे नेटवर्क यांची सांगड घालता येईल. तसेच या माध्यमातून राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि सामुदायिक स्तरावर समन्वित उपक्रम राबवले जातील, यामध्ये विशेषतः महिलांना उपजीविकेच्या संधी, मालमत्ता, आर्थिक सेवा, सुरक्षित प्रवासाच्या सुविधा, अत्यावश्यक सेवा आणि संस्थात्मक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी समन्वित प्रयत्नांना प्राधान्य दिले जाणार आहे.

'हिंसाचार -मुक्त गाव' उपक्रमाबाबत चतुष्पक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी

या कार्यक्रमात 'हिंसाचार -मुक्त गाव' उपक्रमासंबंधी चतुष्पक्षीय सामंजस्य करार जारी केला  जाईल. हा करार ग्रामीण विकास मंत्रालय, महिला व बाल विकास मंत्रालय, न्याय विभाग आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्यात करण्यात आला आहे. हा सामंजस्य करार सामुदायिक स्तरावर लिंग-आधारित हिंसाचार रोखण्यासाठी आणि त्याविरोधात कारवाई करण्यासाठी एक समन्वित संस्थात्मक आराखडा प्रदान करेल. याचा उद्देश सामुदायिक संस्था, विधी सेवा प्राधिकरणे आणि संबंधित सरकारी यंत्रणा यांच्यातील ताळमेळ अधिक मजबूत करणे हा आहे. यामध्ये कायदेशीर अधिकारांबाबत जागरूकता निर्माण करणे, न्याय मिळवून देणे, संस्थात्मक सहाय्य पुरवणे आणि हिंसामुक्त गावे उभारण्यासाठी सामूहिक कृती करणे या  बाबींचा समावेश असेल.

सामुदायिक संस्था आणि महिला नेतृत्व मजबूत करणे

'नयी चेतना  5.0' च्या अंमलबजावणीमध्ये 'DAY-NRLM' अंतर्गत असलेले स्वयं-सहायता गट , ग्राम संघटना , क्लस्टर-स्तरीय महासंघ , 'जेंडर रिसोर्स सेंटर्स'  आणि अन्य सामुदायिक संस्थांचे व्यापक जाळे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल. या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी, नवीन 'जेंडर रिसोर्स सेंटर्स'चे उद्घाटन केले जाईल. ही केंद्रे सामुदायिक स्तरावरील व्यासपीठे म्हणून काम करतील, ज्याद्वारे विविध सेवा, हक्क, सहाय्य  प्रणाली आणि तक्रार निवारण यंत्रणांपर्यंत पोहोचणे सुलभ होईल. विविध राज्यांच्या स्वयं-सहायता गटांमधील महिला नेत्या, महिलांचे सामूहिक प्रयत्न  आणि नेतृत्व  बळकट करण्याबाबतचे आपले अनुभव, अभिनव विचार  आणि दृष्टिकोन सामायिक करतील.

या कार्यक्रमात दिवसभरात दोन पॅनल चर्चा देखील होणार आहेत.  पहिली पॅनल चर्चा, “जेंडर रिसोर्स सेंटर्स (GRCs), वन स्टॉप सेंटर्स (OSCs), कायदेशीर सेवा प्राधिकरण (लीगल सर्विसेज अथॉरिटी ) आणि आरोग्य प्रणाली यांच्या माध्यमातून मंत्रालयांमधील  समन्वयाला चालना देणे,” यावर होईल, ज्यात महिलांशी संबंधित समस्यांवर समन्वय आणि समन्वित प्रतिसाद मजबूत करण्यावर विचारविनिमय करण्यासाठी संबंधित मंत्रालये आणि संस्थांचे प्रतिनिधी एकत्र येतील. दुसरी पॅनल चर्चा, “तळागाळातील महिला नेतृत्व : अनुभव, नवोन्मेष आणि पुढील वाटचाल,” यावर असेल, जे तळागाळातील महिला नेत्यांना त्यांचे अनुभव आणि शिफारसी सामायिक करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देईल.

नयी चेतना 4.0 मूल्यांकन अहवाल

'नयी चेतना  4.0 मूल्यांकन अहवाल राष्ट्रीय स्तरावरील शुभारंभ प्रसंगी जारी केला जाईल. या अहवालात मागील आवृत्तीचे मूल्यांकन आणि त्यातून मिळालेले महत्त्वाचे धडे मांडले जातील, ज्याचा उपयोग भविष्यातील अभियान आणि उपक्रमांना अधिक प्रभावी आणि बळकट करण्यासाठी केला जाईल.

या कार्यक्रमात राज्यस्तरीय व्हिडिओचे स्क्रीनिंग  आणि उत्तम कार्य पद्धतींचे सादरीकरण केले जाईल, ज्यामध्ये लिंगसमानतेच्या दिशेने समुदायाच्या नेतृत्वाखालील उपक्रम आणि दृष्टिकोन अधोरेखित केले जातील. तसेच, या अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या व्हिडिओ संसाधनांचेही अनावरण केले जाईल.

ग्रामीण विकास मंत्रालयाच्या DAY-NRLM च्या पुढाकाराने, 2022 मध्ये स्थापन झाल्यापासून 'नयी चेतना' ही मोहीम लिंग-आधारित हिंसाचाराला आळा घालणे , भेदभावपूर्ण सामाजिक रूढींना आव्हान देणे आणि लैंगिक समानतेला चालना देण्यासाठी एक देशव्यापी सामूहिक चळवळ म्हणून विकसित झाली आहे. 'नयी चेतना 5.0' च्या माध्यमातून, मंत्रालय विविध मंत्रालये, राज्य सरकारे, सामुदायिक संस्था आणि इतर हितधारकांमध्ये सामूहिक प्रयत्नांना गती दिली जाईल  , जेणेकरून महिलांच्या आर्थिक सहभाग, सुरक्षितता आणि स्वायत्ततेसाठी पोषक वातावरण निर्माण होईल. ही मोहीम  भेदभावपूर्ण सामाजिक रूढींना आव्हान देणे आणि समानता व सामायिक जबाबदारी पार पाडण्यासाठी  पुरुष, मुले आणि युवकांच्या  सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देईल.


नेहा कुलकर्णी/भक्ती सोनटक्के/सुषमा काणे/प्रिती मालंडकर 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2340335) अभ्यागत कक्ष : 19