57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

पूर्वजांच्या मुळांपासून ते मानवी नातेसंबंधांपर्यंत, 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अर्थात इफ्फीमध्ये 12 गोमंतकीय चित्रपटांच्या माध्यमातून जागतिक व्यासपीठावर उलगडणार स्थानिक कथा


कोंकणी आणि मराठी चित्रपटांमधून ओळख, कुटुंब, सामाजिक वास्तव आणि दैनंदिन जीवनातील गुंतागुंतीचा वेध

Posted On: 20 NOV 2026 7:54PMby PIB MumbaiRelease ID: 2339397Views: 10

गोवा, 20 नोव्‍हेंबर 2026

 

आपल्या समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य, बहारदार विविधरंगी समृद्ध वारसा आणि ज्याला  तोडच नाही,  असे आदरातिथ्य; यासाठी जगभरात नावाजल्या गेलेल्या गोव्याची, आणखी एक वेगळी बाजूही आहे. या त्याची दखल घेतली गेलीच पाहीजे. गोव्याचे हे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे,  गोव्याच्या कथा आणि या कथांमागची माणसे. 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI - International Film Festival of India) एका विशेष विभागाच्या माध्यमातून गोव्याची ही बाजू पडद्यावर आणली जात आहे. या विभागातील कथांमधून स्थानिक पातळीशी घट्टपणे जोडलेल्या आणि तरीही वैश्विक पातळीवरही तितक्याच समर्पक वाटणाऱ्या जीवनप्रवासांचा, नातेसंबंधांचा, स्मृतींचा आणि अनुभवांचा वेध घेतला जाणार आहे.

पणजीमधील आयनॉक्समध्ये 21 ते 28 नोव्हेंबर दरम्यान या विभागातील चित्रपट दाखवले जाणार आहेत. या विभागातील चित्रपटसंग्रहातून प्रेक्षकांना एका समृद्ध भावनिक विश्वाची सफरच घडून येणार आहे. आपल्या सद्सद्विवेकबुद्धीसोबतच द्वंद्वात अडकलेली एक वृद्ध महिला, त्‍याबरोबरच  ज्‍याचा भूतकाळ पुन्हा समोर येतो असा एक विस्मरणात गेलेला स्थानिक नायक, आपल्या कुटुंबाशी पुन्हा नाते जोडू पाहणारी एक मुलगी आणि आपल्या वडिलोपार्जित घराचे रक्षण करणारा एक वृद्ध गावकरी अशा वैविध्यपूर्ण कथांच्या माध्यमामधून, चित्रपटांमधून उलगडणाऱ्या मानवी अनुभवांच्या वैविध्यतेचे दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे.

या विभागातील चित्रपट हे कोकणी आणि मराठी भाषांमधील आहे. यात पूर्ण लांबीच्या कथात्मक चित्रपटांसह लघुपटांचाही समावेश आहे. या सर्व चित्रपटांमधून कौटुंबिक नातेसंबंध, सामाजिक वास्तव, वैयक्तिक संघर्ष, ओळख, बालपण, एकटेपणा आणि आत्मशोध यांसारख्या व्यापक भावना आणि विषयांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अत्यंत वैयक्तिक पातळीवरील कथानकांपासून ते मिश्किल विनोदी चित्रपट आणि विचार करायला भाग पाडणाऱ्या नाट्यमय चित्रपटांपर्यंत, अशा व्यापक शैलीतले हे चित्रपट आहेत. यातून प्रेक्षकांना गोव्यातील चित्रपट निर्मितीच्या बदलत्या प्रवाहाची एक चित्ताकर्षक झलक अनुभवायला मिळणार आहे.

या विभागातील गोमंतकीय चित्रपटांची एक झलक:

अन्सेसाओ

दिग्दर्शक : मंगेश जे. बांदोडकर, भाषा: कोंकणी, कालावधी: 30 मिनिटे

या चित्रपटातले कथानक गोव्यातील एका शांत गावाच्या पार्श्वभूमीवर घडते. ‘अन्सेसाओ’ या चित्रपटातून दिग्दर्शकाने एकट्या राहणाऱ्या एका वृद्ध महिलेचा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. ही वृद्ध महिला इतरांबद्दलच्या गप्पांच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील शांतता भरून काढत असते. ती स्वतःच्या दुःखाचा सामना करण्यास असमर्थ आहे. आणि अखेरीस आपण इतरांबद्दल करत असलेली चर्चा म्हणजे, न भरलेल्या जखमेवरून लक्ष विचलित करण्याचा एक मार्ग असल्याची जाणिव तिला  होते. आणि ज्यावेळी  तीची सद्सद्विवेकबुद्धी तिला स्वतःत बदल करण्यास प्रवृत्त करू लागते, त्यावेळी ती स्वतःच्या वागण्यात सुधारणा करण्याचा निर्धार करते, मात्र हा बदल अल्पकाळ टिकणाराच ठरतो.

शकुंतला

दिग्दर्शक: प्रसाद एम. नाईक | भाषा: कोकणी | कालावधी: ११ मिनिटे

प्रेम, ओळख आणि परंपरा यांचा वेध घेणारा  शकुंतला  हा एक हृदयस्पर्शी कौटुंबिक चित्रपट आहे. आपल्या शेजारी राहणाऱ्या ख्रिश्चन तरुणाशी विवाह केल्यामुळे सनातनी विचारांच्या आपल्या कुटुंबापासून दुरावलेल्या शकुंतलेची ही कथा आहे.

काही वर्षांनंतर वडिलांचे निधन झाल्यानंतर तिला त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची संधीही नाकारली जाते. वडिलांच्या निधनानंतरच्या बाराव्या दिवसाच्या विधीची वेळ जवळ येत असताना, शकुंतला धैर्य एकवटून आपल्या बालपणीच्या घरी परतण्याचा निर्णय घेते. या प्रवासात तिला दडपून ठेवलेल्या कौटुंबिक संघर्षांना आणि समाजाच्या पूर्वग्रहांना सामोरे जावे लागते.तिचा हा प्रवास केवळ एक विधी पूर्ण करण्यासाठी नसून, एक मुलगी म्हणून आपले स्थान परत मिळवण्यासाठी आणि प्रेम परंपरेच्या पलीकडे जाऊ शकते का, हा प्रश्न  उपस्थित करण्याचा आहे.

पूर्णता

दिग्दर्शक : श्रावण काणकोणकर | भाषा: कोकणी | कालावधी: 25 मिनिटे

मोगऱ्याच्या फुलांची माळ  ‘झायो’च्या प्रवासातून ‘पूर्णता’ ही कलाकृती तिच्या संपर्कात येणाऱ्या अनेक व्यक्तींच्या जीवनातील विविध पैलू उलगडते. सुख-दुःखाच्या प्रसंगांतून प्रवास करताना ही माळ अनेकांच्या आयुष्यात दिलासा, आशा आणि आनंदाचे क्षण घेऊन येते. कालांतराने फुले कोमेजली तरी ती आयुष्य सुंदर बनवण्याचे कार्य करतच  राहतात. हा चित्रपट जीवन आणि जीवनाचे कारण यांच्यातील सातत्य दर्शवतो आणि जरी एका आयुष्याचा प्रवास संपला  तरी दुसरे जीवन तो प्रवास पुढे चालू ठेवते हे यात प्रभावीपणे मांडतो.

नॉईस

दिग्दर्शक : सुविधा तोरगल बखले | भाषा: कोकणी | कालावधी: 16 मिनिटे

मानवी वर्तन आणि नातेसंबंधांचा यांचा एक अतिशय हृदयस्पर्शी वेध वेध घेणाऱ्या नॉईस या चित्रपटात तारा या तरुणीची कथा मांडली आहे. एका त्रासदायक नात्यातून बाहेर पडण्यासाठी आणि वारंवार मानसिक क्लेश देणाऱ्या जुन्या चक्रातून मुक्त होण्यासाठी ती संघर्ष करत असते.  स्वतःला त्या बंधनांतून मुक्त करण्याची धडपड करत असताना ती वारंवार तिथेच ओढली जाते. जुन्या पंख्याची चित्रपटात वारंवार दिसणारी उपस्थिती ही मानवी वर्तनातील पुनरावृत्ती होणाऱ्या चक्रांचे प्रतीक ठरते. बदलाची गरज जाणवत असूनही स्वतःमध्ये बदल घडवून आणणे किती कठीण असते, या चित्रपटाच्या मध्यवर्ती विचाराचे प्रतिबिंब या जुन्या पंख्याच्या प्रतिमेतून प्रभावीपणे उमटते.

दर्या

दिग्दर्शक : किशोर अर्जुन, भाषा: मराठी, कालावधी: 25 मिनिटे

दर्या ही कथा सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रस्त आकाश या एका दृष्टिहीन मुलाची कथा असून या मुलाने आतापर्यंत कधीच समुद्र पाहिलेला नाही तर केवळ कथांमधून, आवाजातून आणि कल्पनाविश्वातूनच त्याने समुद्राची कल्पना केलेली आहे.  जेव्हा त्याचे आजोबा त्याला अनपेक्षितपणे समुद्र किनारी घेऊन जातात तेव्हा आकाश एका अशा जगात प्रवेश करतो ज्याची त्याने आतापर्यंत केवळ कल्पनाच केलेली असते. समुद्राचा प्रथमच अनुभव घेण्याच्या गहन भावविश्वाचा वेध हा चित्रपट घेतो. तसेच, एखादी गोष्ट खऱ्या अर्थाने अनुभवण्यासाठी केवळ डोळ्यांनी पाहणेच आवश्यक नसते, तर तिची अनुभूती घेणेही तितकेच महत्त्वाचे असते, याची जाणीव करून देतो.

परफेक्ट शॉट

दिग्दर्शक : संकल्प साईनाथ परब | भाषा: कोकणी | कालावधी: 14 मिनिटे

चित्रपट निर्मितीचे  शिक्षण घेणाऱ्या  वसुधा या युवतीसाठी   'सुवर्ण गुणोत्तर' (Golden Ratio), 'सममिती' (Symmetry) आणि 'रूल ऑफ थर्ड्स' (Rule of Thirds) यांनी प्रभावित झालेला परिपूर्ण सिनेमॅटिक फ्रेमचा शोध एक ध्यास बनतो. त्याचवेळी, वसुंधरा आपल्या दिवंगत वडिलांबद्दलच्या  तिच्या मनोविश्वातील अपूर्ण भावना आणि दुःखाशी झुंजत असते. वडिलांनी आपल्यासाठी कोणतीही मोलाची गोष्ट मागे ठेवली नाही, असा तिचा समज असतो. जसजशा आठवणी पुन्हा जागृत होतात, तसतसा तिचा दृश्यात्मक परिपूर्णतेचा ध्यास एका वैयक्तिक आत्मशोधाच्या प्रवासात बदलतो. नातेसंबंध आपल्या दृष्टिकोनाला आणि सर्जनशीलतेला कसे आकार देतात, हे हा चित्रपट दाखवतो; तसेच अर्थपूर्ण कथाकथन हे सिनेमाच्या तांत्रिक नियमांच्या पलीकडे जाते, हेही तो स्पष्ट करतो.

बापो काळे 

दिग्दर्शक: कृष्णा राउळ / भाषा: कोंकणी / अवधी: 24 मिनिटे

मौक्षी गावाच्या पार्श्वभूमीवर घडणारा बापो काळे हा चित्रपट एका वृध्द माणसाची कहाणी सांगतो जो आपत्कालीन स्थलांतराच्या सरावाचा उपक्रम त्याच्या दाराशी पोहोचतो तेव्हा तो त्याच्या पूर्वजांचे मातीचे घर सोडून जायला नकार देतो. नियमित सरावाच्या स्वरुपात सुरु झालेला हा उपक्रम बापोच्या मनात विस्थापित झाल्याच्या, गमावलेल्या घरांच्या आणि बदललेल्या गावांच्या आठवणी जाग्या करतो. बापो आणि त्याची पत्नी भागी त्या तणावाच्या रात्री अधिकाऱ्यांना विरोध करत असताना, त्यांचे घर स्वतःची ओळख, प्रतिष्ठा, आठवणी आणि जमिनीशी चिरकाल असणारे नाते यांचे सशक्त प्रतीक म्हणून ठळकपणे समोर येते.

वुडवर्म (रोटो)

दिग्दर्शक: अखिल लोटलीकर / भाषा: कोंकणी / अवधी: 22 मिनिटे

वुडवर्म (रोटो) ही दवाखान्यात स्वागतिका असलेल्या अशा एका जिद्दी मुलीची कहाणी सांगते जी तिच्या बहिणीला शाळेतील स्पर्धा जिंकण्यासाठी मदत करत असतानाच तिच्या कुटुंबातील अत्यंत गोंधळलेल्या परिस्थितीचा सामना करते. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि तिच्या बहिणीच्या आकांक्षा यांच्यात समतोल साधण्यासाठी झगडत असतानाच, एक अनपेक्षित धोका तिला विळखा घालू लागतो.

चियर्स!

दिग्दर्शक: अनुराग वर्देकर / भाषा: कोंकणी / अवधी: 19 मिनिटे

नित्यक्रमातील तोचतोचपणाचा कंटाळा आल्यामुळे दोन युवक अशाच एका बसमध्ये चढतात आणि प्रौढांच्या अनोळखी जगाकडे जाणाऱ्या निरुद्देश प्रवासाला निघतात. त्यांचे हे साहस त्यांना एका जुन्या किल्ल्याकडे, नदीतील होडीतून पलीकडे घेऊन जाते आणि शेवटी एका निर्जन धबधब्याकडे घेऊन जाते, जिथे ते अचानक मद्यपानासाठी पहिले पेय विकत घेण्याचा निर्णय घेतात. आपापली वये लपवण्याचा त्यांचा अयशस्वी प्रयत्न त्यांची असुरक्षितता उघड करतो आणि प्रौढांचे जग कल्पनेपेक्षा कितीतरी गुंतागुंतीचे आहे याची त्यांना जाणीव करून देतो. हे युवक घरी परततात तेव्हा त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा सूक्ष्मपणे बदललेला असतो हे दाखवतानाच चियर्स! हा चित्रपट त्यांची उत्सुकता, निरागसपणा तसेच मोठे होण्यातील अनिश्चितता यांचे दर्शन घडवतो.

मिडीयम पीस 

दिग्दर्शक: जय अमोणकर / भाषा: मराठी / अवधी: 23 मिनिटे

ग्रामीण भागातील एका गावात खाटकाच्या दुकानातून निसटलेली कोंबडी घटनांच्या एका असामान्य साखळीला कशी जन्म देते हे या कडु-गोड विनोदी-नाट्यमय चित्रपटात बघायला मिळते. वारंवार कोंबड्या हरवल्याबद्दल दोष दिला गेलेला खाटिक एक अपारंपरिक उपाय करतो: कोंबड्यांच्या मनोरंजनासाठी दूरचित्रवाणी संच बसवणे. पण, लवकरच त्याला स्वतःलाच त्या संचाचे व्यसन लागते, त्यामुळे त्याच्या वागण्यावर, जबाबदाऱ्यांवर तसेच त्याच्या बायकोशी असलेल्या त्याच्या नात्यावर परिणाम होतो. जेव्हा तो संच बिघडतो आणि त्याच्या सर्वच कोंबड्या निसटून जातात तेव्हा त्या खाटकाला त्याच्या मालकाकडून शिक्षा तर घरुन नकार मिळतो. कैद आणि सुटकेची इच्छा यांच्यात अडकलेल्या माणसाच्या या विचित्र कथेच्या माध्यमातून, मिडीयम पीस हा चित्रपट एकटेपणा, आधुनिक जगातील  चित्त विचलित करणाऱ्या गोष्टी  आणि दैनंदिन जगण्यातून सुटकेसाठीच्या प्रयत्नांचे अनपेक्षित परिणाम यांचा शोध घेतो.

हेल्थ सेंटर

दिग्दर्शक - अनुप सरदेसाई,  भाषा – कोकणी, अवधी - 2 तास 7 मिनिटे

सरकारी आरोग्य केंद्रातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर घडणारा ‘हेल्थ सेंटर’ हा चित्रपट या केंद्रातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर कामत यांच्या भोवती फिरतो. बलात्कारपीडिता सुरभी नावाच्या तरुणीने  आरोपी अजय विरोधात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी भ्रष्ट राजकारणी आणि पोलीस तिच्यावर दबाव आणतात. त्यामुळे डॉ. कामत यांच्यासमोर गंभीर नैतिक पेच निर्माण होतो. त्याचवेळी, आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना, ते कोमामध्ये गेलेल्या एका रुग्णावर उपचार सुरू ठेवण्यासाठीही संघर्ष करत असतात. या रुग्णाची मुलगी मनीषा ही रुग्णालयाच्या मर्यादित साधनसामग्रीवर अवलंबून असते. त्यातच सुरभी दबावाला बळी पडते. त्यानंतर मात्र डॉ. कामत स्वतःच न्याय हातात घेण्याचा निर्णय घेतात. ते गुपचूप अजयला प्राणघातक इंजेक्शन देतात आणि त्यानंतर परिस्थितीच्या निषेधार्थ आपल्या पदाचा राजीनामा देतात. मात्र, कोमातील रुग्णाला कृत्रिम जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्याची व्यवस्था ते कायम ठेवतात. दहा वर्षांनंतर, डॉ. कामत यांचा वारसा पुन्हा समोर येतो. त्यांचा मुलगा राज एका नव्या आरोग्य केंद्रात रुजू होतो आणि तिथे त्याची ज्या वरिष्ठ डॉक्टरांशी भेट होते त्या डॉक्टर म्हणजेच सुरभी असल्याचे उघड होते.

2004 पासून गोवा हे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फीचे कायमस्वरूपी यजमान स्थळ बनले आहे. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये जगभरातील चित्रपट निर्माते, सिनेरसिक आणि सर्जनशील व्यक्तींचे इथे स्वागत केले जाते. 20 ते 28 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेला 57 वा महोत्सव ‘स्टोरीज् विदाऊट बॉर्डर्स’ या संकल्पनेवर आधारित आहे. भौगोलिक, भाषिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडण्याची तसेच समान मानवी अनुभवांद्वारे प्रेक्षकांना जोडून घेण्याची सिनेमाची क्षमता हा महोत्सव साजरा करतो.

गोव्यातील चित्रपटांची निवड या भावनेचे समर्पक प्रतिबिंब आहे. गोव्याच्या दैनंदिन जीवनाशी, सांस्कृतिक परंपरांशी आणि सामाजिक वास्तवाशी घट्ट जोडलेले हे बारा चित्रपट दाखवून देतात की एखाद्या विशिष्ट प्रदेशातून उलगडणाऱ्या कथा त्या प्रदेशाच्या सीमा ओलांडून दूरवरच्या प्रेक्षकांशीही संवाद साधू शकतात.

कौटुंबिक नातेसंबंध, अस्मितेचे प्रश्न, बालपण, एकाकीपणा किंवा सामाजिक जीवनातील गुंतागुंत अशा विविध विषयांचा वेध घेताना हे चित्रपट स्थानिक अनुभवांतून आकारलेले दृष्टिकोन मांडतात; मात्र त्यांना जोडणाऱ्या भावना वैश्विक असतात.

कोंकणी आणि मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देत इफ्फीच्या 57व्या आवृत्तीत या भाषांमधील कलाविष्कारांना त्यांच्या स्थानिक सांस्कृतिक आणि भाषिक संदर्भांच्या पलीकडे जाण्याची संधी मिळत आहे. यामुळे जगभरातील प्रेक्षकांना गोव्याची ओळख केवळ एक पर्यटनस्थळ म्हणून नव्हे, तर तिथले लोकजीवन, त्यांच्या आठवणी आणि कथांच्या माध्यमातूनही करून घेता येणार आहे. यंदाच्या महोत्सवाची संकल्पना ‘स्टोरीज् विदाऊट बॉर्डर्स’ या भावनेशी सुसंगत असलेली ही चित्रपटांची निवड आपल्याला याची आठवण करून देते की, कथा एखाद्या स्थानिक परिसरातून जन्माला येत असल्या; तरी मनाला स्पर्श करण्याची, माणसांना जोडण्याची आणि त्यांच्या मनात प्रतिध्वनी उमटवण्याची त्यांची क्षमता कोणत्याही सीमारेषांनी मर्यादित केलेली नसते.

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

 

* * *

पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/निलिमा चितळे/तुषार पवार/भक्‍ती सोनटक्‍के/संजना चिटणीस/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2339397
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026