57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

पावेल पावलिकोव्स्की यांच्या फादरलँड चित्रपटाच्या भारतातील प्रीमियरने 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीचा प्रारंभ, चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आणली महायुद्धोत्तर विभाजित जर्मनी


फादरलँड या चित्रपटातून यंदाच्या इफ्फीचे सीमाविरहित कथा हे घोषवाक्य प्रतिबिंबीत होते : निर्मात्या इवा पुश्चिंस्का

संस्कृती हा भारत आणि पोलंडमधील मैत्रीचा सर्वात भक्क पाया : प्योत्र अँटोनी स्विटाल्स्की

Posted On: 20 NOV 2026 4:44PMby PIB MumbaiRelease ID: 2339221Views: 20

गोवा, 20 नोव्‍हेंबर 2026

 

युद्धाने होरपळलेल्या, विचारसरणीमुळे विभाजीत झालेल्या आणि आपल्या भूतकाळाच्या ओझ्याशी झुंज देत असलेल्या एका युरोपीय देशाच्या प्रवासाच्या कथेने आज गोव्यात 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीचे (IFFI - International Film Festival of India) उद्घाटन झाले. प्रतिष्ठित चित्रपटकर्मी पावेल पावलिकोव्स्की यांच्या फादरलँड या चित्रपटाच्या भारतातील प्रीमियरने या नऊ दिवसांच्या महोत्सवाचा प्रारंभ झाला. शीतयुद्धाची सुरुवात होत असतानाच्या काळातील युद्धोत्तर जर्मनीचे एक हृदयला भिडणारे चित्र या चित्रपटाने प्रेक्षकांसमोर उभे केले.

पावेल पावलिकोव्स्की ऑस्कर विजेत्या चित्रपटकर्मीने दिग्दर्शित केलेल्या या कृष्णधवल नाट्यमय चित्रपटात, नोबेल पारितोषिक विजेते जर्मन लेखक थॉमस मान आणि त्यांची कन्या एरिका यांची कथा मांडली आहे. या कथेच्या माध्यमातून इतिहास, कौटुंबिक नातेसंबंध आणि विभाजित मातृभूमीशी जोडलेले गुंतागुंतीच्या पदरांची वीण दिग्दर्शकाने गुंफली आहे. आयनॉक्सच्या सर्व चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद लाभला. या चित्रपटाच्या खेळाने या नऊ दिवसांच्या महोत्सवाला अत्यंत उत्साहवर्धक सुरुवात झाली.

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी फादरलँडच्या निर्मात्या इवा पुश्चिंस्का, नवी दिल्लीतील पोलंड दूतावासाचे मिशन प्रमुख प्योत्र अँटोनी स्विटाल्स्की आणि नवी दिल्लीतील पोलिश इन्स्टिट्यूट या  संस्थेच्या संचालक मालगोर्जाता वेयसिस गोलेबियाक यांचे पणजीत आयनॉक्समध्ये रेड कार्पेटवर आगमन झाले.

यावेळी निर्मात्या इवा पुश्चिंस्का यांनी या चित्रपटाबद्दलच्या भावना उपस्थितांसमोर व्यक्त केल्या. या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेतून यंदाच्या इफ्फीच्या संकल्पनेचा गाभा प्रतिबिंबीत होतो असे त्या म्हणाल्या. फादरलँड या चित्रपटातून एका जर्मन लेखकाची आणि जर्मन लोकांची कथा जर्मन भाषेतून मांडलेली असली, तरी या चित्रपटाची संपूर्ण निर्मिती ही पोलिश अंतःकरणाने आणि पॉलिश हातांनी केली आहे, असे त्या म्हणाल्या. चित्रपटाच्या या निर्मितीप्रक्रियेतूनच यंदाच्या महोत्सवाचे सीमाविरहित कथा हे घोषवाक्य प्रतिबिंबित होते, असे त्यांनी सांगितले.

नवी दिल्लीतील पोलंड दूतावासाचे मिशन प्रमुख प्योत्र अँटोनी स्विटाल्स्की यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. विविध पातळ्यांवर भारत आणि पोलंड मधील मैत्री वाढते आहे, मात्र संस्कृती हाच या मैत्रीचा सर्वात मजबूत पाया राहिला आहे, असे प्योत्र अँटोनी स्विटाल्स्की यांनी सांगितले. पावेल पावलिकोव्स्की यांनी पारंपरिक पोलिश चित्रपट निर्मिती शैलीला एक नवा आयाम आणि दृष्टीकोन दिला असल्याचे ते म्हणाले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी या खेळासाठी उपस्थित पाहुण्यांचा सत्कार केला. पोलंड आणि भारतामधील सर्जनशील संबंधाचा गौरव करण्याची एक विशेष संधी फादरलँड या चित्रपटाने उपलब्ध करून दिली आहे, असे ते म्हणाले. यावेळी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर, भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (NFDC) अध्यक्ष जी. कृष्णकुमार आणि महोत्सवाचे कला संचालक पंकज सक्सेना हे देखील उपस्थित होते.

विभाजित जर्मनीतून वडील आणि मुलीचा प्रवास

फादरलँड या चित्रपटातले कथानक 1949 च्या उन्हाळ्याच्या हंगामात, शीतयुद्धाला सुरुवात होत असतानाची पार्श्वभूमीवर घडते. थॉमस मान आणि त्यांची कन्या एरिका अमेरिकेतील 16 वर्षांच्या वनवासानंतर जर्मनीत परत येतात. त्यांच्या या परतीच्या प्रवासाच्या मागोवा घेण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने या चित्रपटातून केला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या विध्वंसाच्या खुणा अजूनही अंगावर बाळगणाऱ्या देशातून ते दोघेही काळ्या रंगाच्या ब्यूइक मोटारीतून प्रवास करतात. वडील आणि मुलीची ही जोडी अमेरिकेच्या प्रशासनाखालील फ्रँकफर्टपासून सोव्हिएतच्या नियंत्रणाखालील वायमारपर्यंतचा प्रवास करते.

या चित्रपटात थॉमस मान यांच्यासाठी या परतण्याचा अर्थ निव्वळ मायदेशी परतण्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. त्यांच्यासाठी हे परतणे म्हणजे युद्धामुळे बदललेल्या आणि परस्परविरोधी राजकीय विचारसरणींमुळे दुभंगलेल्या मातृभूमीशी झालेली एक भेट आहे. चित्रपटात त्या दोघांचा हा प्रवास जसा जसा पुढे सरकतो, तसतसे देशातील विभाजनाचे पडसाद मान कुटुंबामधील गुंतागुंतीच्या नात्यांमधूनही उमटू लागतात. या गुंतागुंतीतूनच आपण कुठले, आपली ओळख काय, स्मृती आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याशी जोडलेले प्रश्न समोर उभे ठाकतात.

सँड्रा हुलर आणि हॅन्स झिश्लर यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. पडद्यावर 82 मिनिटांचा काळ व्यापणारा हा चित्रपट पोलंड, जर्मनी, इटली आणि फ्रान्स या देशांची सहनिर्मिती आहे. यंदाच्या कान, सॅन सेबॅस्टियन आणि टेल्युराइड यांसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवला गेला. या चित्रपटासाठी पावलिकोव्स्की यांना कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कारही मिळाला आहे.

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

 

 

* * *

पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्‍पलकट्टी/तुषार पवार/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2339221
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026