गोवा, 20 नोव्हेंबर 2026
57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) पार्श्वभूमीवर आज पणजी, गोवा येथील पत्र सूचना कार्यालयाच्या (PIB) माध्यम केंद्रात एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी 'इफ्फी' 57 चे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (NFDC) व्यवस्थापकीय संचालक धीरज सिंह उपस्थित होते. पत्र सूचना कार्यालयाच्या (PIB) पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी या पत्र-परिषदेचे सूत्रसंचालन केले.
माध्यमांशी संवाद साधताना आशुतोष गोवारीकर यांनी 'सीमाविरहित कथा' (Stories Without Borders) या संकल्पनेवर आधारित 'इफ्फी'च्या 57 व्या पर्वाची आपली रूपरेषा आणि दृष्टिकोन मांडला. ही संकल्पना केवळ भौगोलिक आणि प्रादेशिक सीमांपुरती मर्यादित नसून, जात, सामाजिक भेदभाव आणि इतर सामाजिक-सांस्कृतिक वास्तवांमुळे कुटुंबांमध्ये आणि समाजामध्ये निर्माण होणाऱ्या दरीचाही वेध घेते, असे त्यांनी स्पष्ट केले. अशा सीमा ओलांडून जाणाऱ्या आणि विविध संस्कृतींमधील सामायिक मानवी अनुभवांचे प्रतिबिंब दाखवणाऱ्या कथा एकत्र आणण्याचा या महोत्सवाचा प्रयत्न आहे.

महोत्सवातील वैविध्यपूर्ण चित्रपट सादरीकरणावर प्रकाश टाकताना गोवारीकर यांनी यंदा ॲनिमेशन, माहितीपट आणि 'चित्रपटांवरील चित्रपट' या 3 नवीन विभागांचा समावेश करण्यात आल्याची घोषणा केली. त्यांनी माहितीपटांचे वाढते महत्त्व आणि माहितीपट निर्मात्यांना अधिक व्यापक प्रसिद्धी व संधी उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित केली. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, अलीकडेच आयोजित झालेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील विजेत्यांच्या चित्रपटांचे एक विशेष 'गाला सादरीकरण' (gala presentation) 'इफ्फी'मध्ये आयोजित केले जाणार आहे.
महोत्सवातील वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की, सिंहावलोकन, विशेष निवडक सादरीकरणे आणि विशेष स्क्रिनिंग यांसह प्रत्येक विभाग चित्रपटांची समृद्धी आणि विविधता सादर करण्यात मोलाचे योगदान देत आहे. माध्यम व्यावसायिकांनी चित्रपटविषयक आपल्या वैयक्तिक पसंतीच्या पलीकडे जाऊन महोत्सवाची अनुभूती घ्यावी आणि 'गाला स्क्रीनिंग्ज', रेड-कार्पेट सोहळे, आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदा आणि 'पॅनोरमा' संवाद सत्रांना उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. अशा प्रकारच्या सहभागामुळे चित्रपट निर्माते आणि परदेशातून आलेल्या प्रतिनिधींना आपले काम सादर करण्याची संधी मिळते, तसेच प्रेक्षकांनाही विविध चित्रपटविषयक दृष्टिकोनांची माहिती करून घेता येते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महोत्सवाची व्याप्ती वाढवण्यामध्ये माध्यमांची भूमिका अधोरेखित करताना गोवारीकर यांनी माध्यम प्रतिनिधींना आवाहन केले की, त्यांनी आपला स्वतंत्र विचार आणि चिकित्सक दृष्टिकोन कायम ठेवून सिंहावलोकन विभागासह विविध विभागांतील चित्रपट पाहावेत आणि त्यांचे वार्तांकन करावे. 'इफ्फी'मधील कथा आणि चित्रपटविषयक सादरीकरणे देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात माध्यमांचा सहभाग महत्त्वाची भूमिका बजावतो, यावर त्यांनी भर दिला.
_20261120150349_80476f.jpeg)
संपूर्ण महोत्सवाच्या काळात महोत्सव समिती आणि माध्यम प्रतिनिधी यांच्यात अर्थपूर्ण व अनौपचारिक संवाद घडवून आणण्यासाठी सुविधा करून देण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. माध्यमकर्मींच्या व्यावसायिक बांधिलकीची दखल घेत ते म्हणाले की, महोत्सवातील उपक्रमांच्या वार्तांकनासाठी अधिक लवचिकता आणि पुरेसा वेळ मिळावा यासाठी संवादांच्या वेळापत्रकात आवश्यक बदल करण्यात आले आहेत.
या पत्रकार परिषदेदरम्यान आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अधिकृत माहितीपुस्तिकेचे अनावरणही करण्यात आले.
या माध्यम संवादातून महोत्सवाचा दृष्टिकोन आणि कार्यक्रमांच्या प्राधान्यक्रमांचा आढावा घेण्यात आला, तसेच चित्रपट आणि आंतरसांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ म्हणून 'इफ्फी'ला अधिक बळकटी देण्यासाठी माध्यमांचा सहभाग आणि सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्पलकट्टी/शैलेश पाटील/दर्शना राणे