57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

IFFI 2026 मध्ये 'सर्वोत्कृष्ट वेब सीरिज' पुरस्कारासाठी पाच वेब सीरिजना नामांकन


शिक्षण, लोककथा, उद्योजकता, राजकारण आणि मानवी संबंधांवर आधारित वैविध्यपूर्ण कथा भारताच्या ओटीटी उद्योगाची सर्जनशील क्षमता दर्शवतात

Posted On: 18 NOV 2026 2:40PMby PIB MumbaiRelease ID: 2338122Views: 17

गोवा, 18 नोव्‍हेंबर 2026

 

गोव्यामध्ये 20 ते 28 नोव्हेंबर 2026 दरम्यान आयोजित होणाऱ्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) भारतीय डिजिटल मनोरंजन उद्योगाचे बदलते परिदृश्य हे प्रमुख आकर्षण असेल. या महोत्सवांतर्गत 'ओटीटी पुरस्कार' श्रेणीमध्ये 'सर्वोत्कृष्ट वेब सीरिज' पुरस्कारासाठी पाच विशेष वेब सीरिजना नामांकन मिळाले आहे. सामाजिक वास्तव, सांस्कृतिक परंपरा, ऐतिहासिक टप्पे आणि मानवी संबंधांवर आधारित या कथा, भारतातील विस्तारणाऱ्या ओटीटी परिसंस्थेतील विविधता आणि सर्जनशील महत्त्वाकांक्षेचे दर्शन घडवतात.

नामांकन-प्राप्त वेब सीरिजवर एक दृष्टिक्षेप:

आदर्श बाल विद्यालय

हिमांक गौर द्वारा दिग्दर्शित 'आदर्श बाल विद्यालय' भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेतील वास्तवावर विनोदी आणि सामाजिक टिप्पणीच्या माध्यमातून भाष्य करते. दिल्लीतील एका सरकारी शाळेच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा मुख्याध्यापक ज्ञानेश्वर त्रिपाठी यांच्याभोवती फिरते. केंब्रिजला जाण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणे आवश्यक असते. मात्र, अभ्यासात रस नसलेले विद्यार्थी, संस्थात्मक त्रुटी आणि आव्हानात्मक शैक्षणिक वातावरण त्यांच्या मार्गात अडथळे ठरतात. अशातच, एका आदर्शवादी शिक्षकाचे आगमन शाळेत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी नवी उमेद जागवते.

विनोद आणि शिक्षण क्षेत्रातील आव्हानांचे गांभीर्य यांचा मेळ घालणारी ही वेब सीरीज , समर्पित शिक्षकांची भूमिका आणि सार्वजनिक शिक्षण संस्थांमध्ये बदल घडवून आणण्याची शक्यता अधोरेखित करते.

 

देवखेल

लोककथा आणि पारंपरिक समजुतींतून प्रेरणा घेऊन, चंद्रकांत लता गायकवाड यांनी दिग्दर्शित केलेला 'देवखेल' प्रेक्षकांना 'देवताली' नावाच्या एका रहस्यमय गावात घेऊन जातो. या गावात दरवर्षी होळीच्या रात्री एका व्यक्तीचा मृत्यू होतो. गावकरी या घटनांमागे 'शंकासुर' नावाच्या एका पौराणिक राक्षसाचा हात असल्याचे मानतात, ज्याचा उल्लेख स्थानिक परंपरांमध्ये आढळतो. जेव्हा पुन्हा एकदा असाच एक रहस्यमय मृत्यू घडतो, तेव्हा इन्स्पेक्टर विश्वास या धक्कादायक घटनाक्रमामागचे सत्य शोधण्यासाठी तपस सुरु करतात. तपास जसजसा पुढे सरकतो, तसतशी गावातील गुपिते, लोकांचे छुपे हेतू आणि श्रद्धेशी संबंधित प्रश्न समोर येऊ लागतात.

गुन्हेगारी, रहस्य आणि लोककथांचे मिश्रण असलेली ही वेबसीरिज अंधश्रद्धा, परंपरा आणि वास्तव यांच्यातील नाजूक संबंधांचा शोध घेते.

 

मेड इन इंडिया: अ टायटन स्टोरी

रॉबी ग्रेवाल द्वारा दिग्दर्शित 'मेड इन इंडिया: अ टायटन स्टोरी' भारतातील सर्वाधिक ओळखल्या जाणाऱ्या स्वदेशी ब्रँड्सपैकी एकाच्या निर्मितीमागील उद्योजकीय दूरदृष्टीचा प्रवास मांडते. उदारीकरणापूर्वीच्या काळातील ही कथा झेरक्सेस देसाई आणि एक जागतिक दर्जाचा भारतीय घड्याळ ब्रँड उभा करण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नांची कथा आहे, त्यावेळी परदेशी उत्पादने आणि तस्करी करून आणलेल्या घड्याळांचे वर्चस्व बाजारपेठेत होते . जे.आर.डी. टाटा यांचे मार्गदर्शन आणि एका समर्पित टीमच्या पाठिंब्यामुळे, देसाई यांनी नोकरशाहीतील अडथळे, आर्थिक अडचणी आणि तांत्रिक आव्हानांवर मात केली.

ही कथा त्या दृढनिश्चयाला, नवोन्मेष आणि अग्रणी भावना अधोरेखित करते, जिने एका महत्त्वाकांक्षी औद्योगिक दृष्टिकोनाला भारतीय कॉर्पोरेट इतिहासातील एक महत्त्वपूर्ण अध्याय बनवले.

 

मयसभा: द राईज ऑफ द टायटन्स

1970 च्या दशकात आंध्रप्रदेशाच्या राजकीयदृष्ट्या तणावाच्या वातावरणाच्या पार्शवभूमीवर घडणारी, देवा कट्टा यांनी दिग्दर्शित केलेली मयसभा: द राईज ऑफ द टायटन्स ही मालिका, एक आदर्शवादी विद्यार्थी नेता असलेला काकर्ला कृष्णमा नायडू (केकेएन) आणि एका प्रस्थापित कुटुंबातील तरुण एम.एस.रामीरेड्डी यांच्या प्रवासाची कहाणी सांगते.

वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे असूनही सुरुवातीला एकमेकांचे जवळचे मित्र असलेले हे दोघे सामाजिक आणि राजकीय बदल घडवून आणण्याची आकांक्षा बाळगून असतात. पण जातीभेद, पैसा, भ्रष्टाचार, सत्तेसाठीचा संघर्ष आणि बदलत्या आयामांसह राजकीय जीवनातील कठोर वास्तवाला सामोरे जाताना त्यांच्यातील नाते हळूहळू दुरावू लागते. आधीचे सहकारी ते राजकीय प्रतिस्पर्धी असा या दोघांचा प्रवास या मालिकेच्या केंद्रस्थानी आहे आणि त्यातून राजकीय वर्तुळात दिसून येणारे राजकीय डावपेच, बदलत्या निष्ठा तसेच मानवी नात्यांमधील गुंतागुंत यांचे प्रभावी चित्रण बघायला मिळते.

 

मुसाफिर कॅफे

कथाकथनासाठी अधिक जवळीक साधणारा दृष्टीकोन स्वीकारत, रुचिर अरुण दिग्दर्शित 'मुसाफिर कॅफे' ही मालिका प्रेम, साहचर्य आणि स्व-शोधाच्या अनेक पैलूंचा शोध घेते. चंदर मोहन शर्मा या प्रमुख पात्राचे सुधा आणि प्रीती यांच्याशी असलेले नाते हा या मालिकेचा केंद्रबिंदू आहे. ही मालिका बदलती परिस्थिती, व्यक्तिगत निवड आणि मानवी संबंधांच्या गुंतागुंतीमधून चंदर मोहनच्या भावनिक प्रवासाचा वेध घेते. भोपाळ आणि मसुरी या निसर्गरम्य परिसरांच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा, प्रेम, हुकलेल्या संधी, स्वीकार आणि एखाद्याच्या जीवनाला आकार देणारी अनपेक्षित वळणे यांचे दर्शन घडवते. ही मालिका नातेसंबंधांना विकास आणि शोधाच्या अशा प्रवासाच्या रुपात मांडते जिथे प्रत्येक भेट मानवी अनुभवावर स्वतःची छाप सोडते.

एकत्रितरीत्या, ही पाच नामांकने भारताच्या ओटीटी परिदृष्यातील विस्तारत्या सर्जनशील शक्यतांचे दर्शन घडवतात, जेथे विविध प्रदेश, संस्कृती आणि सामाजिक संदर्भातील कथांना डिजिटल माध्यमाद्वारे व्यक्त होण्याची संधी मिळाली आहे. सरकारी शाळांच्या वर्गांतील आव्हाने आणि ग्रामीण लोककथांमधील रहस्यमय गोष्टींपासून भारताचा उद्योजकीय प्रवास, राजकीय स्पर्धा आणि प्रेमातील सूक्ष्म बारकाव्यांपर्यंत या सर्व नामनिर्देशित मालिकांतून समकालीन भारतीय कथाकथनाद्वारे विस्तृत श्रेणीतील विषयांचा शोध सुरु असल्याचे दिसून येते.

20 ते 28 नोव्हेंबर, 2026 या कालावधीत गोव्यात आयोजित 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वोत्कृष्ट वेब मालिका (ओटीटी) पारितोषिक अस्सल वेब-आधारित कार्यक्रमांतील उत्कृष्टतेचा सन्मान करते आणि भारताच्या डिजिटल मनोरंजन उद्योगाला आकार देणारे लेखक, दिग्दर्शक, सर्जक, कलाकार आणि निर्मिती पथकांची सर्जनशील दूरदृष्टी आणि योगदानाचा उत्सव साजरा करते. ही नामांकने, नाविन्यपूर्ण कथाकथन तसेच चित्रपटीय अभिव्यक्तीसाठीचे एक महत्त्वाचे माध्यम म्हणून ओटीटी मंचांचे महत्त्व अधोरेखित करतात.

 

* * *

पीआयबी मुंबई | माधुरी पांगे/सुषमा काणे/संजना चिटणीस/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2338122
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026