57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ : इफ्फी 2026 मध्ये तमिळ आणि तेलुगू चित्रपटांची झलक

Posted On: 17 NOV 2026 8:53PMby PIB MumbaiRelease ID: 2337738Views: 18

गोवा, 17 नोव्‍हेंबर 2026

 

57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI)2026, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांचा प्रामुख्याने समावेश आहे. यात सामाजिक समस्या, कौटुंबिक संबंध, मानवी मूल्ये, वैयक्तिक संघर्ष आणि सांस्कृतिक परंपरांवर भाष्य करणाऱ्या विविध कथा मांडल्या आहेत. या निवडीमध्ये फिचर अर्थात कथा - आधारित चित्रपट आणि नॉन-फीचर (कथा बाह्य चित्रपट) अशा दोन्ही प्रकारांतील तमिळ आणि तेलुगू चित्रपटांचा समावेश आहे, जे तंत्रज्ञान, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, कौटुंबिक नातेसंबंध, वैयक्तिक आकांक्षा आणि राजकीय जीवन अशा विविध विषयांना स्पर्श करतात.

तमिळ चित्रपटांवर एक नजर

तमिळ भाषेतील  निवडीमध्ये समकालीन आणि पारंपरिक अशा दोन्ही सामाजिक पार्श्वभूमींवर आधारित कथांचा समावेश आहे. कन्नन एस. द्वारा दिग्दर्शित 'स्क्रोल' (Scroll) ही कथा अरविंद नावाच्या एका तरुणाची आहे, जो स्मार्टफोनच्या आहारी गेलेला आहे. 'डोपा रश' (Dopa Rush) नावाच्या एका ॲपच्या वापरामुळे त्याच्या आयुष्यात एक अस्वस्थ करणारा टप्पा येतो. हे ॲप वापरकर्त्यांना विविध प्रकारचे टास्क पूर्ण करायला लावून आणि बक्षिसे देऊन स्मार्टफोनच्या विळख्यातून बाहेर पडण्याचे आव्हान देते. मात्र, जसजशी ही आव्हाने अधिक विचित्र आणि त्रासदायक होत जातात, तसा हा खेळ सहभागी व्यक्तींच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवू लागतो. परिणामी, व्यसन सोडवण्याचा प्रयत्न एका भीतीदायक अनुभवात रूपांतरित होतो.

शिवकुमार मुरुगेसन दिग्दर्शित 'थाई किझावी' (गॉड मदर) या चित्रपटाचा मुख्य विषय कौटुंबिक संबंध आणि न सुटलेले वाद  हा आहे. ही कथा 70 वर्षांच्या पवुनुथाई नावाच्या एका खंबीर महिलेची आहे, जी एका छोट्या गावात आपल्या मुलीसोबत आणि नातवासोबत राहते. काही लोक तिला घाबरतात, तर काही तिचा आदर करतात. ती अनेक वर्षांपासून आपल्या तीन मुलांपासून दुरावलेली आहे. जेव्हा तिला अचानक गंभीर आजार होतो, तेव्हा तिची मुले घरी परततात; मात्र त्यांच्या येण्यासोबतच जुने, न सुटलेले कौटुंबिक वाद आणि वेदनादायी आठवणीही पुन्हा जाग्या होतात. जसा भूतकाळ समोर येतो, तसे एक दीर्घकाळ दडलेले रहस्य हळूहळू उघड होते, ज्यामुळे कुटुंबाचा आपापल्या संबंधांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो.

शिक्षण सहजरीत्या उपलब्ध नसणे ही समस्या मांडणारा, सत्यशिव यांनी दिग्दर्शित केलेला 'अरिवु' हा चित्रपट 1996 च्या पार्श्वभूमीवर घडतो. यात कथिर नावाच्या एका तरुण शिक्षकाची कथा आहे, ज्याची नियुक्ती पश्चिम घाटातील एका दुर्गम आदिवासी गावात होते. तिथे त्याला समजते की, मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते, कारण गावकऱ्यांचा असा समज आहे की मुलींना शिकवल्यास ग्रामदेवता कोपेल. ही परिस्थिती बदलण्याचा दृढनिश्चय करून, तो 13-14 वर्षे वयोगटातील मुलींच्या गटाला गुपचूप शिकवू लागतो, ज्या कधीही शाळेत गेलेल्या नव्हत्या. जशी परीक्षा जवळ येते, कथिर त्यांना भीती आणि सामाजिक बंधनांतून बाहेर पडण्यास मदत करतो, ज्यामुळे त्या शिक्षणाच्या दिशेने आपले पहिले पाऊल टाकू  शकतात.

तमिळ भाषेतील या निवडीमध्ये स्थानिक ज्ञान आणि पारंपरिक प्रथांचाही आढावा घेण्यात आला आहे. विजेश मणी द्वारा दिग्दर्शित 'अट्टाप्पाडी' हा चित्रपट केरळमधील पश्चिम घाटात राहणाऱ्या आदिवासी समुदायांच्या पारंपरिक उपचार पद्धतींचा शोध घेतो. या चित्रपटात सुलतान अहमद अल महमुदी हा अरेबिया येथून अट्टाप्पाडीमध्ये तेथील रहिवाशांनी जपलेले औषधी ज्ञान आणि वन-परंपरेचा शोध घेण्यासाठी येतो. चित्रपट निर्माते विजेश मणी यांच्या मार्गदर्शनाखाली, तो तिथल्या पारंपरिक वैद्यांना आणि ज्येष्ठांना भेटतो आणि निसर्गाशी, जंगलाशी असलेल्या त्यांच्या घनिष्ठ संबंधांबद्दल जाणून घेतो. औषधी ज्ञानाच्या शोधातून सुरू झालेला हा प्रवास हळूहळू त्या समुदायाची जीवनशैली आणि वारसा जाणून  घेण्याच्या एका व्यापक प्रवासात रूपांतरित होतो.

जॉयल विजय यांनी दिग्दर्शित केलेल्या 'कूडू' (घरटे) या चित्रपटात पर्यावरण संवर्धन आणि सामुदायिक सहभाग केंद्रस्थानी ठेवला आहे. तमिळनाडूतील 'वचाथी' गावात, वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर गावातील एका ट्रान्सफॉर्मरमध्ये चिमणीचे घरटे आणि त्यात अंडी असल्याचे दिसून येते. ग्राम प्रमुख अगथियन यांच्या मार्गदर्शनाखाली, कृषी पदवीधर कथिर आणि गावकरी या पक्ष्यांच्या संरक्षणासाठी 35 दिवस विजेशिवाय राहण्याचा निर्णय घेतात. मात्र, स्थानिक अधिकारी (VAO) आणि लिंगम, ज्यांच्या मनात वैयक्तिक द्वेष  आहे, ते या निर्णयाला तीव्र विरोध करतात आणि तो हाणून पाडण्याचा प्रयत्न करतात. या आव्हानांना न जुमानता, कथिर आणि गावकरी घरटे सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक गोष्टींचा कठोरपणे त्याग करतात.

तेलगू चित्रपटांवर एक नजर

तेलगू चित्रपट निवडीमध्ये समाविष्ट कथांमध्ये पर्यावरणविषयक समस्या, कौटुंबिक संबंध, प्रेम, वैयक्तिक आकांक्षा, मानवी मूल्ये आणि राजकारण यांसारख्या विषयांवरील कथा मांडण्यात आल्या आहेत. सिंगीथम श्रीनिवास राव दिग्दर्शित 'सिंग गीथम' (गाणे गा) हा चित्रपट प्रताप मन्नेम याची कथा आहे. तो आपल्या वडिलांच्या मालकीच्या सुवर्णखाणींमधील आपला हिस्सा मिळवण्यासाठी 'कुबेरपुरम' या खाणकाम करणाऱ्या गावात परततो. तिथे त्याला  एका माजी व्यावसायिक भागीदाराला सामोरे जावे लागते, ज्याच्या विस्तार योजनांमुळे गावातील शेवटचे झाडही नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो. लोभ आणि संघर्ष वाढत असताना, प्रतापला आपल्या कुटुंबाच्या भूतकाळातील सत्य उलगडते आणि तो स्वतःमध्ये बदल घडवून आणू लागतो. अखेरीस, गावकऱ्यांना एकता, त्याग आणि निसर्ग संवर्धनाचे महत्त्व उमजते.

अनिल रविपुडी दिग्दर्शित 'माना शंकर वरप्रसाद गारू' या चित्रपटात कौटुंबिक संबंध, दुरावा आणि पुन्हा एकत्र येण्याचा प्रवास मांडला आहे. हे कौटुंबिक नाट्य शंकर वरप्रसाद या एका निष्ठावान राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्याभोवती केंद्रित आहे, जो आपल्या कुटुंबापेक्षा कर्तव्याला प्राधान्य देतो; परिणामी, तो आपल्या पत्नी आणि मुलांपासून दुरावतो. सहा वर्षांनंतर, तो आपल्या मुलांच्या शाळेत नोकरी स्वीकारून त्यांच्याशी असलेले नाते पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा त्याच्या कुटुंबावर एक गंभीर संकट घोंघावते, तेव्हा त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावरच सोपवली जाते. धोक्याचे मूळ शोधून काढताना, त्याला आपल्या भूतकाळाचा सामना करावा लागतो, आपल्या प्रियजनांचे रक्षण करावे लागते आणि त्यांचा विश्वास पुन्हा जिंकावा लागतो.

रवी वर्मा नंबुरी दिग्दर्शित चेन्नई लव्ह स्टोरी हा चित्रपट प्रेम आणि विरह या विषयांवर आधारित आहे. हा चित्रपट निवी नावाच्या मुलीची कथा सांगतो, जी तिच्या भूतकाळातील नात्याच्या वेदनेतून सावरण्याचा प्रयत्न करत असते. तिची भेट स्टीव्हन नावाच्या एका अनाथ मुलाशी होते, ज्याचे प्रेम आणि दयाळूपणा हळूहळू तिच्या आयुष्यात पुन्हा आनंद घेऊन येतात. त्यांच्यातील मतभेद असूनही, ते एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि लग्न करण्याचा निर्णय घेतात. मात्र, त्यांच्या लग्नाच्या दिवशीच एका अपघातात स्टीव्हनचा मृत्यू होतो. त्याचे अचानक झालेले निधन स्वीकारू न शकल्याने, निवी दुःख आणि रागाने व्याकूळ होते. आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन देऊनही त्याने तिला का सोडून जावे लागले, हे समजून घेण्यासाठी ती धडपडत असते.

धनुष दांडू दिग्दर्शित व्हाय, वाणी? या चित्रपटाचा केंद्रबिंदू वैयक्तिक आकांक्षांचा पाठपुरावा हा आहे. हा चित्रपट हैदराबादमधील वाणी नावाच्या एका तरुण संपादकाची कथा सांगतो, जिला तिच्या करिअरमध्ये अपूर्णतेची भावना जाणवते. जेव्हा तिला मुंबईत एका माहितीपटावर काम करण्याची संधी मिळते, तेव्हा ती चित्रपट निर्मितीचे आपले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेते. मात्र, तिच्या या निर्णयामुळे तिचा प्रियकर अरुण आणि चित्रपट निर्माता साहित यांच्यासोबतच्या तिच्या नात्यात आव्हाने निर्माण होतात, कारण या प्रकल्पावरील त्यांच्या तडजोडी त्यांच्या स्वतःच्या भीतीचे प्रतिबिंब असतात. कौटुंबिक अपेक्षा आणि अपराधीपणाच्या भावनेशी झगडत, वाणीला अखेरीस तिच्या निवडींची नवी समज येते आणि ती तिच्या स्वप्नाचा पाठपुरावा करते.

प्रवीण दिग्दर्शित ‘विन’ हा चित्रपट बुद्धिबळाच्या खेळाच्या माध्यमातून दृष्टिकोन आणि आत्मशिस्तीचे महत्त्व उलगडतो. हा चित्रपट नेपोलियन नावाच्या 18 वर्षांच्या मुलावर केंद्रित आहे, ज्याला त्याच्या आईने वर्षानुवर्षे दिलेल्या कठोर प्रशिक्षणानंतर बुद्धिबळाचा प्रत्येक डाव जिंकायचा असतो. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून तो एका मोठ्या बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेतो, पण गायत्री नावाच्या शांत स्वभावाच्या दहा वर्षांच्या मुलीकडून हरतो. पराभव न स्वीकारता तो तिला पुन्हा आव्हान देतो. त्यांच्या संभाषणातून, गायत्री त्याला हे समजण्यास मदत करते की जिंकण्यापेक्षा चांगला खेळ करणे अधिक महत्त्वाचे आहे. ती त्याला भगवद्गीतेच्या शिकवणीची ओळख करून देते आणि निकालाशी संलग्न न होता आपले कर्तव्य पार पाडण्यास प्रोत्साहित करते. नेपोलियन हळूहळू आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवायला आणि बुद्धिबळाकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला शिकतो.

देवा कट्टा दिग्दर्शित मायासाभा या चित्रपटाची पार्श्वभूमी राजकारण, विचारधारा आणि मैत्रीच्या नात्यांवर आधारित आहे. 1970 च्या दशकाच्या मध्यात आंध्र प्रदेशात घडणारी ही मालिका, काकरला कृष्णमा नायडू (केकेएन), एक आदर्शवादी विद्यार्थी नेता, आणि एम.एस. रामी रेड्डी (एमएसआर), एका शक्तिशाली कुटुंबातील तरुण, या दोन तरुणांभोवती फिरते. त्यांची पार्श्वभूमी भिन्न असूनही, ते मित्र बनतात आणि बदल घडवण्याच्या आशेने राजकारणात प्रवेश करतात. तथापि, लवकरच त्यांना जातीय विभागणी, भ्रष्टाचार, पैसा आणि सत्तेसाठीचा संघर्ष यांसारख्या राजकीय जीवनातील वास्तवाचा सामना करावा लागतो. जसजसा त्यांचा प्रभाव वाढतो, तसतशी त्यांच्या आदर्शांची कसोटी लागते आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षा त्यांच्या मैत्रीवर परिणाम करू लागतात. ही मालिका राजकारण, विचारधारा, सत्ता आणि एकाच पदासाठी स्पर्धा करताना दोन मित्र एकजूटीने राहू शकतात की नाही, या विषयांचा शोध घेते.

भक्त कन्नप्पा: सुवर्ण महोत्सवी सोहळा

तेलुगू चित्रपट निवडीमध्ये इफ्फी 2026 च्या सुवर्ण महोत्सवी विभागात एका विशेष सादरीकरणाचाही समावेश आहे. बापू दिग्दर्शित 'भक्त कन्नप्पा' हा चित्रपट 26 मे 1976 रोजी प्रदर्शित झाला होता आणि आता त्याला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. महोत्सवाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा भाग म्हणून या चित्रपटाची पुनर्स्थापित प्रत पुन्हा प्रदर्शित होत आहे.

हा चित्रपट प्रसिद्ध शैव भक्त कन्नप्पा नयनार यांची कथा पुन्हा सांगतो. अर्जुनाचा पुनर्जन्म थिन्नाडू या नावाने होतो, जो एक नास्तिक शिकारी असून एका आदिवासी प्रमुखाने त्याचे पालनपोषण केलेले असते. तो त्या प्रमुखाची मुलगी नीला हिच्याशी विवाह करतो, परंतु गावाच्या देवतेसमोर नतमस्तक होण्यास नकार दिल्यामुळे त्याला आपले लोक सोडून जावे लागते. जेव्हा तो भगवान शिवाला भेटतो तेव्हा त्याचे आयुष्य बदलते आणि हळूहळू त्याला भक्तीची खरी खोली कळते. चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये, तो शिवलिंगाचे रक्त थांबवण्यासाठी स्वतःचे डोळे देतो; हे कृत्य भक्तीला विधी आणि परंपरांच्या पलीकडे घेऊन जाते. मूळ कन्नडमध्ये चित्रित झालेल्या या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफीसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आणि तो त्याच्या भव्यतेसाठी व खुल्या मैदानातील चित्रीकरणासाठी ओळखला जातो.

एकत्रितपणे, या कथा या वर्षीच्या सीमाविरहित कथा या संकल्पनेच्या भावनेला पुन्हा एकदा दृढ करतात. तमिळ आणि तेलुगूमध्ये सांगितलेल्या या कथा, ज्या भाषिक आणि सांस्कृतिक विश्वात रुजलेल्या आहेत, त्याच्या पलीकडे जाऊन पोहोचतात. एका तरुण शिक्षकाचा संघर्ष, कौटुंबिक बंध, स्वप्नांचा पाठपुरावा, निसर्गाचे रक्षण, राजकीय जीवनातील गुंतागुंत किंवा भक्तीची कालातीत शक्ती यांसारख्या विषयांचा शोध घेणारे हे चित्रपट, जगभरातील प्रेक्षकांना आपलेसे वाटतील अशा अनुभवांना आणि भावनांना स्पर्श करतात. ते आपल्याला आठवण करून देतात की, जरी भाषा कथा सांगण्याच्या पद्धतीला आकार देत असली, तरी ती कथा कशी समजली जाईल किंवा कशी अनुभवली जाईल यावर मर्यादा घालू शकत नाही. या विविध चित्रपट आवाजांच्या माध्यमातून, इफ्फी भाषिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडण्याच्या सिनेमाच्या सामर्थ्याचा उत्सव साजरा करते, आणि वेगवेगळ्या जगांतील कथांना जगभरातील प्रेक्षकांच्या जवळ आणते.

 

* * *

पीआयबी मुंबई | नितीन फुल्लुके/सुषमा काणे/राजेश शिरभाते/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2337738
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026