Posted On:
16 NOV 2026 6:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2026
केंद्रीय माहिती आणि प्रसारण, रेल्वे तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीतल्या आकाशवाणी भवनाच्या रंगभवन सभागृहात ‘प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया’ने आयोजित केलेल्या राष्ट्रीय पत्रकारिता दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित केले.

लोकशाही बळकट करण्यात प्रसारमाध्यमांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करताना त्यांनी प्रसारमाध्यम क्षेत्रातल्या व्यावसायिकांना वेगाने बदल होत असलेल्या माध्यमविश्वाशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेण्याचे आवाहन केले. जबाबदार पत्रकारितेची मूल्ये जपण्याचे आणि समाजाविषयी प्रसारमाध्यमांची जबाबदारी पार पाडण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमाला ‘प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्ष न्यायमूर्ती (निवृत्त) रंजना प्रकाश देसाई, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार, प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध पत्रकार रजत शर्मा आणि ‘प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया’चे सदस्य खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी उपस्थित होते.
यंदाच्या कार्यक्रमाची संकल्पना ‘पत्रकारिता : लोकप्रियतावादी की जबाबदार?’ अशी होती. माहितीचा वेगाने प्रसार होत असलेल्या आणि डिजिटल माध्यमांचा प्रभाव वाढत असलेल्या काळात पत्रकारितेची बदलती भूमिका या संकल्पनेतून अधोरेखित करण्यात आली.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नागरिकांना सक्षम करण्यासाठी तसेच समाजाला मजबूत करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचे आवाहन केले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अश्विनी वैष्णव यांनी तांत्रिक बदलांचा अभूतपूर्व वेग अधोरेखित करत, या आधीच्या दोन दशकांमध्ये अनुभवले त्यापेक्षा अधिक बदल येत्या पाच वर्षांत अनुभवायला मिळणार आहेत असे निरीक्षण नोंदवले. बदल स्वीकारून आपापली कौशल्ये सतत अद्ययावत करण्यासाठी त्यांनी तरुण पत्रकारांना प्रोत्साहित केले.

डिजिटल मंचांच्या जबाबदारीवर अधिक भर देत त्यांनी चुकीची माहिती मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे, डीपफेक्स, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, डिजिटल अटक तसेच मुलांवर परिणाम करणारी हानिकारक सामग्री यांच्या पार्श्वभूमीवर सामुदायिक मागर्दर्शक तत्वे पुरेशी आहेत का; असा प्रश्न उपस्थित केला. नागरिकांना सक्षम करण्यासाठी तसेच नव्याने उदयाला येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी बदलत्या प्रसारमाध्यम परिदृष्याचे नियमन कसे करता येईल, यावर विचारविनिमय करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
सनसनाटीपणा आणि जबाबदारी यांच्यात पुसट रेषा - रजत शर्मा
या कार्यक्रमात बीजभाषण करताना सुप्रसिध्द पत्रकार रजत शर्मा यांनी सनसनाटीपणा आणि जबाबदारी यांच्या दरम्यान एक अत्यंत पुसट रेषा असते हे ठळकपणे नमूद केले आणि संपादकीय निर्णय तसेच जबाबदार वार्तांकनाचे महत्त्व अधोरेखित केले. आणीबाणी, मुंबईवर 26/11 ला झालेला दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यांसारख्या महत्त्वाच्या घटनांच्या वेळी आलेल्या अनुभवांचे स्मरण करत शर्मा यांनी खास करून राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विषयांचे वार्तांकन करताना संयम, पडताळणी तसेच संवेदनशीलता राखण्याची गरज अधोरेखित केली. डिजिटल माध्यमांच्या परिसंस्थेत अधिक जबाबदारीचे भाग बाळगण्याचे आवाहन करत रजत शर्मा यांनी पत्रकारांकडे सनसनाटीपणापेक्षा अचूकतेला अधिक प्राधान्य देण्याचा आग्रह धरुन, “कमी गोंगाट, अधिक वृत्त; कमी सनसनाटीपणा, अधिक जबाबदारी” स्वीकारण्याच्या संदेशासह त्यांचे भाषण संपवले.

पत्रकारितेचे स्वातंत्र्य आणि मानके - पीसीआयच्या अध्यक्षांचा पुनरूच्चार
पीसीआयच्या अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांनी पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची आणि पत्रकारितेच्या मानकांमध्ये सुधारणा करण्याबाबतची वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली. माध्यमांच्या क्षेत्रात वेगाने होत असलेले बदल अधोरेखित करुन त्या म्हणाल्या की, तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आता काही क्षणांत लाखो लोकांपर्यंत माहिती पोहोचते. फोन आणि इंटरनेट हातात असलेली कोणीही व्यक्ती आता बातमी पोहोचवू शकते मात्र बातमी देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने प्रशिक्षण घेतलेले असते किंवा ती पत्रकारितेच्या नियमांशी बांधील असते असे नाही.

अचूकता, संपादकीय अनुमान आणि मानवी उत्तरदायित्व -चंचल कुमार
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी पत्रकारितेने सार्वजनिक जीवनातील सहभाग आणि विश्वासार्हता यामध्ये संतुलन साधणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. लोकप्रियता सत्यापेक्षा वरचढ असू नये अथवा ‘व्हायरल’ होणे सत्य पडताळणीपेक्षा महत्त्वाचे ठरू नये, असे मत त्यांनी नोंदवले. टीआरपी, क्लिक आणि डिजिटल सहभाग यांचा वाढता प्रभाव सांगताना त्यांनी संपादकीय अनुमान, सत्यता पडताळणी व बातमी आणि मत यातील फरक ओळखण्याचे महत्त्व विशद केले. एआय पत्रकारितेला सहायता करू शकते मात्र पत्रकाराची जबाबदारी स्वीकारू शकत नाही.
पीसीआयचे सदस्य आणि राज्यसभेतील खासदार डॉ. सुधांशु त्रिवेदी यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे कसून परीक्षण करण्याचे आवाहन केले. भारत विकासाच्या नव्या वाटेवर प्रगती करत असताना प्रामाणिकपणा व माहितीचे जबाबदार प्रसारण आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

पीसीआयच्यावतीने पत्रकारिता आचारसंहिता - 2026 च्या आवृत्तीचे प्रकाशन
प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या पत्रकारिता आचारसंहिता 2026 या आवृत्तीचे प्रकाशन हे या समारंभाचे ठळक वैशिष्ट्य होते. यातील सुधारित मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे -
- नैसर्गिक आपत्ती आणि संघर्षाच्या स्थितीतील वार्तांकन
- निदर्शने आणि मोर्चांचे वार्तांकन
- सेक्स वर्कर्स आणि दिव्यांग व्यक्तींबाबतच्या बातमीचे वार्तांकन
- बालकांच्या गोपनीय माहितीचे संरक्षण
- ऑनलाइन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन कायदा 2025 नुसार ऑनलाइन जुगाराशी संबंधित जाहिराती
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया
संसदेत मंजूर केलेल्या कायद्यानुसार प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संस्था 1966 मध्ये अर्ध न्यायिक संस्था म्हणून अस्तित्वात आली आणि 1979 मध्ये तिची पुनर्स्थापना करण्यात आली. मुद्रित माध्यमांमधील मुक्त आणि जबाबदार वार्तांकनासाठी अंतर्गत स्वयंनियामक यंत्रणा उभी करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना केली गेली. स्थापनेपासून आजपर्यंत कौन्सिलने सातत्याने माध्यमांच्या स्वातंत्र्याचे रक्षण व जतन करण्यासाठी काम केले आणि देशातील वृत्तपत्रे व वृत्त संस्थांचा दर्जा वाढवला.
सुवर्णा बेडेकर/निखिलेश चित्रे/संजना चिटणीस/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai