57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

दुभंगलेल्या मायभूमीतला प्रवास: पावेल पावलीकोव्स्की यांच्या 'फादरलँड' (Fatherland)  या चित्रपटाने गोव्यामध्ये आयोजित जागतिक चित्रपट महोत्सवाची होणार सुरुवात

Posted On: 14 NOV 2026 6:46PMby PIB MumbaiRelease ID: 2336334Views: 26

काही प्रवास भूप्रदेश ओलांडतात, तर काही स्मृती, ओळख आणि आपलेपणाची गुंतागुंत उलगडतात. इतिहास आणि अत्यंत वैयक्तिक नातेसंबंधांचा मेळ घालणाऱ्या, ख्यातनाम पोलिश चित्रपट निर्माते पावेल पावलिकोव्स्की दिग्दर्शित 'फादरलँड' (Ojczyzna) या चित्रपटाची गोव्यामध्ये आयोजित 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) उद्घाटनपर  चित्रपट म्हणून निवड झाली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाबरोबर, नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची वातावरण निर्मिती होईल. 

1949 च्या उन्हाळ्यात, शीतयुद्ध ऐन भरात असताना घडणारी 'फादरलँड' (Fatherland) ही कलाकृती, नोबेल पारितोषिक विजेते जर्मन लेखक थॉमस मान आणि अभिनेत्री, लेखिका आणि रॅली ड्रायव्हर असलेली त्यांची मुलगी एरिका, यांच्यातील नाते संबंधांचा वेध घेते. अमेरिकेतील सोळा वर्षांच्या वनवासानंतर जर्मनीला परतताना, थॉमस मान, आपल्या मुलीबरोबर काळ्या ब्युइक (Buick) कारमधून एका आव्हानात्मक रोड ट्रिपला निघतात. त्यांचा प्रवास अमेरिकेच्या वर्चस्वाखालील फ्रँकफर्टपासून ते सोव्हिएत नियंत्रणाखालील वायमारपर्यंतच्या युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या प्रदेशातून होतो.

वडील आणि मुलगी जेव्हा विभाजित जर्मनीतून प्रवास करतात, तेव्हा त्यांना संघर्षाने उध्वस्त झालेल्या राष्ट्राच्या केवळ दृश्य जखमा नव्हे, तर त्याहूनही अधिक काही अनुभवायला मिळते. हा प्रवास त्यांना आपल्याच कुटुंबाच्या दुभंगलेपणाचीही जाणीव करून देतो. भावनिक पदर असलेल्या या कथानकाच्या माध्यमातून, हा चित्रपट वैयक्तिक नातेसंबंध, इतिहास आणि घर या संकल्पनेच्या परस्परसंबंधांचा शोध घेतो.

सँड्रा हुलर आणि हान्स झिशलर यांची मुख्य भूमिका असलेला हा 82 मिनिटांचा नाट्यपट पोलंड, जर्मनी, इटली आणि फ्रान्स यांच्या संयुक्त निर्मितीतून साकारला आहे. ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपातील हा चित्रपट 57 व्या इफ्फीमध्ये (IFFI ) मध्ये भारतात पहिल्यांदाच प्रदर्शित (इंडिया प्रीमियर) होत आहे.

‘फादरलँड’ च्या प्रदर्शनाबरोबर, 57 व्या इफ्फी महोत्सवात भौगोलिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडणाऱ्या कथा-विश्वाचा प्रवास सुरु होईल. चित्रपट हे वैविध्यपूर्ण जग आणि दृष्टीकोन यांना जोडणारे माध्यम आहे, त्याचप्रमाणे यंदाच्या इफ्फी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी प्रदर्शित होणारा हा चित्रपट ‘सीमा नसलेल्या कथा’ (Stories Without Borders) या यंदाच्या संकल्पनेची समर्पक सुरुवात असेल.

***

राधिका अघोर/राजश्री आगाशे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2336334
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026