57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

57 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार ब्रिक्स  देशांतील 21 चित्रपटांचे सादरीकरण; जागतिक स्तरावरील विविध विषयांचा परामर्श घेणारे चित्रपट


लोकशाही, स्वातंत्र्य, ओळख, इतिहास आणि समकालीन जागतिक प्रश्नांवर आधारित वैविध्यपूर्ण चित्रपट मांडणी

Posted On: 14 NOV 2026 4:24PMby PIB MumbaiRelease ID: 2336327Views: 38

गोवा, 14 नोव्हेंबर 2026

57 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- इफ्फी 2026 मध्ये ब्रिक्स  देशांतील चित्रपटांचे विशेष दालन असणार आहे. या विभागामध्ये समाविष्ट चित्रपटांच्या विषयात, लोकशाही, स्वातंत्र्य, ओळख, इतिहास आणि समकालीन जागतिक प्रश्नांशी संबंधित चित्रपटांचे सादरीकरण केले जाईल. संबंधित देशांचा इतिहास, सामाजिक वास्तव आणि वैयक्तिक प्रवासावर आधारित हे चित्रपट, ज्या समाजांतून ते निर्माण झाले आहेत, त्या समाजांचा दृष्टिकोन मांडतात.

निवडलेल्या 21 चित्रपटांमध्ये विविध देश, भाषा आणि शैलींचा समावेश आहे. हे चित्रपट स्वातंत्र्य, ओळख, सामाजिक विषमता, कुटुंब, संघर्ष, विस्थापन आणि आपलेपणा यांसारख्या विषयांवर भाष्य करतात. यातील अनेक चित्रपट संघर्षाच्या आणि परिवर्तनाच्या महत्त्वाच्या टप्प्यांकडे पाहतात—मग ती लोकशाहीवादी चळवळ असो किंवा गुलामगिरी आणि वसाहतवादाविरुद्धचा लढा.

ब्राझीलचा अमादेओ अँड द हायपोथेटिकल न्यू वर्ल्ड  हा चित्रपट 1830 च्या दशकातील ब्राझीलमधील एका आफ्रिकन शोधकर्त्याची कथा मांडतो, ज्याचा शोध गुलामगिरीतून मुक्त होण्याच्या लढाईत मोलाची भूमिका बजावतो. इंडोनेशियाचा द सी स्पीक्स हिज नेम  हा चित्रपट 1998 च्या लोकशाहीवादी चळवळीदरम्यान बेपत्ता झालेल्या एका विद्यार्थी कार्यकर्त्याची आणि त्याच्या कुटुंबाने उत्तरांच्या शोधात केलेल्या संघर्षाची कथा सांगतो. दक्षिण आफ्रिकेचा द ट्रेक  प्रेक्षकांना 19 व्या शतकाच्या मध्यावर कलाहारी वाळवंटात घेऊन जातो, जिथे वसाहतवादी सीमाभागातील क्रूरतेचे दर्शन या कथेतून घडते.

समकालीन प्रश्नही या निवडीमध्ये समाविष्ट आहेत. युगांडा आणि युनायटेड किंगडमचा ड्रीमिंग ऑफ सेरेनाडा  हा माहितीपट, वडील-मुलीच्या नात्याच्या माध्यमातून हवामान बदल आणि पावसाळी जंगलांवर पुराचा होणारा परिणाम या विषयांचा वेध घेतो. इथिओपिया आणि अमेरिकेचा फाया दायी  हा चित्रपट, खात  पिकाची लागवड आणि वापराशी संबंधित समुदायांचे जीवन, सामाजिक वास्तव आणि तरुणांच्या आकांक्षांवर प्रकाश टाकतो. इराणचा पोल्ट्री फार्म हा चित्रपट इराकच्या एका अशा मुलाची कथा सांगतो, ज्याच्याकडे अधिकृत कागदपत्रे नाहीत; मात्र तरीही, आपल्या हरवलेल्या मित्राच्या शोधात, तो स्वतःचे आयुष्य धोक्यात घालतो.

कुटुंब, ओळख आणि वैयक्तिक निवड, ही आणखी एक प्रबळ संकल्पना आहे. सौदी अरेबियाचा ‘हिज्रा’ (Hijra) हा चित्रपट एका तरुण मुलगी, तिची आजी आणि हरवलेल्या बहिणीचा प्रवास आहे, तो कुटुंबातील गुपिते आणि पिढ्यांमधील मतभेद उलगडतो. चीनची ‘एम्बर्स’ (Embers) ही कलाकृती मृतदेहांच्या अस्थींची अदलाबदल होऊन निर्माण झालेल्या परिस्थितीचा वेध घेते, नुकसान आणि नश्वरतेचे वास्तव अनुभवणाऱ्या दोन स्त्रियांची ही कथा आहे. ‘द कॉन्डोर डॉटर’ हा बोलिव्हिया-पेरू ची निर्मिती असलेला चित्रपट, अँडीज पर्वतातील मूळनिवासी समुदायातील तरुणीचे चित्रण करतो, वारसा हक्काने मिळालेली संगीताची परंपरा आणि आणि कलाकार बनण्याचा आपलं स्वप्नं, या द्विधा मनःस्थितीचा ती सामना करते. नायजेरिया-यूके निर्मित ‘लेडी’ ही लागोसमधील एका तरुण टॅक्सी ड्रायव्हरची कथा आहे, सेक्स वर्कर्सच्या गटाशी झालेली भेट तिला एकता आणि आत्म-शोधाकडे घेऊन जाते.

आदित्य धर दिग्दर्शित ‘आर्टिकल 370’ हा भारतीय चित्रपट 2016 च्या काश्मीरमधील अशांततेच्या पार्श्वभूमीवर आधारित असून, तो कलम 370 रद्द करण्याच्या मिशनवर आधारित आहे. या चित्रपटाला 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट संगीत या श्रेणींमध्ये तीन पुरस्कार मिळाले.

महोत्सवात प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या संपूर्ण सूचीमध्ये ‘किंडिक (द कॉर्ड)’ (कझाकस्तान), ‘बाराकोआ’ (क्युबा आणि इटली), ‘बो बो’ (रशियन फेडरेशन), ‘सेफ एक्झिट’ (इजिप्त, जर्मनी, लिबिया, कतार आणि ट्युनिशिया), ‘9 टेम्पल्स टू हेवन’ (थायलंड, सिंगापूर, फ्रान्स, नॉर्वे, चीन, हाँगकाँग, इंडोनेशिया आणि कतार), ‘कॉटन’ (उझबेकिस्तान), ‘बागा: टुमारो बिलॉन्ग्स टू नो वन’ (मलेशिया), ‘1982’ (व्हिएतनाम), ‘अँड द स्नो वॉज फॉलिंग’ (बेलारूस) आणि ‘बाब’ (संयुक्त अरब अमिराती) या चित्रपटांचा समावेश आहे.

हे 21 चित्रपट एकत्रितपणे, प्रेक्षकांना विविध सिनेमॅटिक दृष्टीकोन दाखवतील, यात स्वातंत्र्य, आपलेपणा, स्मृती, जगण्यातील चिवटपणा आणि बदल या सामायिक प्रश्नांना सामोरे जाताना राष्ट्रीय सीमांच्या पलीकडे घेऊन जाणाऱ्या कथा आहेत.

गोव्यात विविध ठिकाणी 20 ते 28 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 86 देशांचे 150 हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रदर्शित केले जातील. या महोत्सवात स्पर्धात्मक आणि बिगर-स्पर्धात्मक विभाग, निवडक संच, सिंहावलोकन, आदरांजली आणि संकल्पनांवर आधारित, विविध शैली, देश आणि भाषांमधील चित्रपट प्रदर्शित केले जातील, यामुळे सांस्कृतिक आदान-प्रदान आणि सिनेमॅटिक उत्कृष्टतेसाठी व्यासपीठ उपलब्ध होईल.

***

राधिका अघोर/राजेश शिरभाते/राजश्री आगाशे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2336327
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026