आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

निसर्गोपचार दिन 2026: वैज्ञानिक संशोधनामुळे भारताची निसर्ग-आधारित आरोग्य सेवा व्यवस्था अधिक बळकट


9वा राष्ट्रीय निसर्गोपचार दिन 18 नोव्हेंबर रोजी कर्नाटकातील नागमंगला येथे होणार साजरा, ‘प्राकृतिक चिकित्सा, स्वस्थ भारत’ या मुख्य संकल्पनेवर होणार आयोजन

Posted On: 12 NOV 2026 12:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 नोव्‍हेंबर 2026

 

भारतातील निसर्गोपचार पद्धती आता हळूहळू निसर्गोपचाराच्या पारंपरिक स्वरूपातून पुढे जात वैज्ञानिक संशोधन, उपचारपद्धतीचे वैद्यकीय मूल्यमापन आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांच्या एका अधिक संघटित व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. जीवनशैलीशी संबंधित आजार, लठ्ठपणा, ताणतणाव आणि निरोगी वाढत्या वयाबाबत वाढत्या जागरुकतेमुळे, निसर्गोपचाराचा आहार, नैसर्गिक उपचार पद्धती आणि जीवनशैलीतील बदलांवरील भर पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.

“प्राकृतिक चिकित्सा, स्वस्थ भारत” या संकल्पनेखाली 9वा राष्ट्रीय निसर्गोपचार दिन 18 नोव्हेंबर 2026 रोजी केंद्रीय योग आणि निसर्गोपचार संशोधन संस्था (CRIYN), नागमंगला, कर्नाटक येथे साजरा केला जाणार आहे. आरोग्य संवर्धनात निसर्गोपचाराची भूमिका, आजार प्रतिबंध आणि निरोगी जीवनशैलीचा अंगिकार याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

योग्य आहारविषयक सवयी, शारीरिक हालचाली, योग, ताणतणाव व्यवस्थापन आणि इतर पुराव्यावर आधारित निसर्गोपचार पद्धतींद्वारे प्रतिबंधात्मक आणि आरोग्यवर्धक सेवेवर भर देते. तसेच, लठ्ठपणा प्रतिबंध आणि जीवनशैलीशी संबंधित आजारांबद्दल जनजागृती मजबूत करणे, व्यक्ती व समुदायांना अधिक निरोगी आणि शाश्वत जीवनशैली स्वीकारण्यास प्रवृत्त करणे हा यामागचा उद्देश आहे. हा दिनविशेष भारताला तंदुरुस्त आणि निरोगी बनवण्याच्या माननीय पंतप्रधानांच्या स्वप्नाशी सुसंगत आहे, जो प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, निरोगी जीवन आणि सार्वजनिक आरोग्याप्रति सामूहिक जबाबदारीवर भर देतो.

“निसर्गोपचार आपल्याला जीवनशैली, निसर्ग आणि संपूर्ण आरोग्य यांच्यातील जवळचा संबंध ओळखण्यास प्रवृत्त करतो. विश्वासार्ह संशोधन, दर्जेदार शिक्षण आणि पारंपरिक आरोग्य सेवेसोबतच्या जबाबदार समन्वयाद्वारे या पद्धतीचा वैज्ञानिक पाया मजबूत करण्यावर आमचा भर आहे, हा दृष्टिकोन 'फिट अँड हेल्दी इंडिया'चे स्वप्न साकार करत असताना प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेत मोठे योगदान देऊ शकतो,” असे केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले.

“निसर्गोपचाराची विश्वासार्हता आणि त्याचा व्यापक प्रसार वाढवण्यासाठी वैज्ञानिक प्रमाणीकरण अत्यंत आवश्यक आहे. केंद्रीय योग आणि निसर्गोपचार संशोधन संस्था आणि इतर संस्थांच्या माध्यमातून आम्ही पद्धतशीर संशोधन, वैद्यकीय मूल्यमापन आणि सहकार्याला प्रोत्साहन देत आहोत, जेणेकरून निसर्गोपचाराच्या पद्धतींचे योग्य वैज्ञानिक पद्धतींद्वारे मूल्यमापन करून त्यांना जबाबदार आरोग्य सेवा पद्धतींमध्ये रूपांतरित करता येईल,”  असे आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी अधोरेखित केले.

केंद्रीय योग आणि निसर्गोपचार संशोधन परिषदेने (CCRYN) आर्थिक वर्ष 2025–26 दरम्यान पुनरावलोकित संशोधन पत्रिकांमधून (पीअर-रिव्ह्यूड जर्नल्स) विविध शोधनिबंध प्रकाशित केले आहेत, तसेच मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या पाच संशोधन परिषदांनी एकत्रितपणे 653 शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. या परिषदेची देशभरात 22 केंद्रे असून, त्यातून संशोधन, शिक्षण आणि जनजागृती या क्षेत्रांतील त्यांचे संस्थात्मक अस्तित्व दर्शवित आहे.

योग आणि निसर्गोपचार शिक्षण व संशोधनासाठी समर्पित पदव्युत्तर संस्था, तसेच हरियाणातील झज्जर आणि कर्नाटकातील नागमंगला येथील 200- खाटांच्या योग आणि निसर्गोपचार रुग्णालयांमुळे भारतात या उपचारांच्या संस्थात्मक पायाभूत सुविधांचा विस्तार झाला आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत, स्नातक पदवी देणारे पहिले महाविद्यालय निसर्ग ग्राम पुणे येथे स्थापन झाले असून; ही राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था (NIN), निसर्गोपचार आणि योगिक विज्ञान स्नातक (BNYS) निसर्गोपचार आणि योगातील शैक्षणिक व रोगोपचार प्रशिक्षण देते तसेच, संशोधन-आधारित शिक्षण आणि व्यावहारिक अनुभवाद्वारे या परिसंस्थेला अधिक बळकट करते, त्याचप्रमाणे पदवीधरांना आरोग्यसेवा, संशोधन, शिक्षण आणि खाजगी व्यवसाय या क्षेत्रांत विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी तयार करते.  

या पुणे स्थित राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेने (NIN), आरोग्य संशोधन विभागाकडे एक नोंदणीकृत असा एक समर्पित संशोधन विभाग सुरू केला असून  संस्थात्मक नीती समितीच्या माध्यमातून आपली संशोधनाची चौकट अधिक बळकट केली आहे. त्यांच्या उपक्रमांमध्ये संशोधन पद्धती कार्यशाळा, उत्तम वैद्यकीय सराव प्रशिक्षण, निरीक्षणात्मक अभ्यास, पद्धतशीर पुनरावलोकन आणि सहयोगी संशोधन यांचा समावेश आहे.

या संशोधनावर वाढता भर देणे विशेष करून महत्त्वाचे आहे, कारण निसर्गोपचार निरोगी आहार पद्धती, शारीरिक हालचाल, पुरेशी विश्रांती आणि तणाव व्यवस्थापन यांना उपचारांत विशेष प्रोत्साहन देतो. हे जीवनशैलीविषयक उपाय विविध वयोगटांमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला साहाय्यक ठरू शकतात आणि जीवनशैलीशी संबंधित जोखमीच्या घटकांविषयी अधिक जागरूकता निर्माण करण्यास हातभार लावू शकतात.

राष्ट्रीय निसर्गोपचार दिनानिमित्त, निसर्गोपचाराचा वैज्ञानिक पाया मजबूत करणे, संस्थात्मक क्षमता वाढवणे आणि आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे या उपक्रमांवर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. सातत्यपूर्ण संशोधन, दर्जेदार शिक्षण आणि सार्वजनिक सहभागाच्या माध्यमातून, आपल्या व्यापक प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा प्रयत्नांना पूरक ठरेल आणि ‘प्राकृतिक चिकित्सा, स्वस्थ भारत’ या दूरदृष्टीमध्ये योगदान देईल; अशी एक अशी विश्वासार्ह आणि सुलभ निसर्गोपचार परिसंस्था भारत आणखी विकसित करू इच्छितो.

 

* * *

नितीन फुल्‍लुके/शैलेश पाटील/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2335372) अभ्यागत कक्ष : 6