गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2025-26 करणार प्रदान


स्वच्छ सर्वेक्षण पुरस्काराने देशातल्या सर्वात स्वच्छ शहरांचा केला जाणार सन्मान

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2025-26 मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 'स्वच्छ शहर जोडींचा' केला जाणार सन्मान

Posted On: 09 NOV 2026 3:15PM by PIB Mumbai

‍नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर 2026

नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन येथे 11 नोव्हेंबर, 2026 रोजी आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2025-26 प्रदान करतील.

'स्वच्छता की नई पहल - बढ़ायें हाथ, करें सफाई साथ' अशी संकल्पना असलेले 10 वे स्वच्छ सर्वेक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या  शहरी विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित  स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2025-26 अंतर्गत देशातील सर्वाधिक स्वच्छ शहरांचा गौरव करण्यात येणार आहे. स्वच्छ भारत अभियान-शहरीच्या यशस्वी अंमलबजावणीत या शहरांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचा यानिमित्ताने सन्मान केला जाणार आहे. नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध श्रेणींमधील हे पुरस्कार प्रदान केले जातील. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री  मनोहर लाल, तसेच गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री तोखन साहू उपस्थित राहणार आहेत.

स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 पुरस्कार हे गेल्या दशकात  शहरे आणि राज्यांनी सामूहिक प्रयत्नांतून मिळवलेल्या यशाचा गौरव असून, प्रत्यक्ष स्तरावर साध्य केलेली कामगिरी कायम राखण्यासाठीची नवी वचनबद्धताही आहे.

स्वच्छ भारत अभियान-शहरी अंतर्गत घेतले जाणारे स्वच्छ सर्वेक्षण, स्वच्छतेचे मूल्यांकन असून 2016 मधील 73 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते यंदा 4,751 शहरांपर्यंत पोहोचले आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 मध्ये अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. यात नागरिकांच्या अभिप्रायावर अधिक भर देण्यात आला असून  शहरी नदीकिनारे, समुद्रकिनारे आणि जलस्रोत यांचा सर्वेक्षणात अधिक व्यापक समावेश करणे, तसेच उघड्यावर शौचास जाणे आणि लघुशंका करणे यांना प्रतिबंध, पर्यटनस्थळे व ऐतिहासिक वारसास्थळांच्या परिसरातील स्वच्छता आणि शाळांमधील वर्तनपरिवर्तन उपक्रम यांसारख्या बाबींसाठी विशेष निकष निश्चित करणे यांचा समावेश आहे.

10 व्या स्वच्छ सर्वेक्षणाचा भाग म्हणून शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे10 प्रमुख मूल्यमापन क्षेत्रांशी संबंधित 43 निर्देशकांच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले.या क्षेत्रांमध्ये कचऱ्याचे विलगीकरण, संकलन व वाहतूक, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता-नेटकेपणा-टापटीप, स्वच्छता सुविधांची उपलब्धता, सांडपाणी निचरा सेवांचे यांत्रिकीकरण, संस्थात्मक निकष आणि व्यवस्था  बळकट करणे, वापरलेल्या पाण्याचे  व्यवस्थापन, स्वच्छतेबाबत जनजागृती, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे सर्वांगीण कल्याण, तसेच नागरिकांचा अभिप्राय आणि तक्रार निवारण यांचा समावेश होता.  देशभरात प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन सविस्तर मूल्यमापन करण्यासाठी 3,000 हून अधिक प्रशिक्षित मूल्यांकनकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या प्रक्रियेला प्रत्यक्ष वेळेत GPS-आधारित देखरेखीची जोड देण्यात आली होती. पुरावे सादर करण्यापासून ते त्यांच्या पडताळणीपर्यंतची संपूर्ण मूल्यांकन प्रक्रिया डिजिटल आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली. प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर कठोर गुणवत्ता तपासणीही करण्यात आली.

देशातील सर्वाधिक स्वच्छ शहरांसोबतच, यंदाच्या पुरस्कारांमध्ये ‘स्वच्छ शहर जोडी’  उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांचाही गौरव करण्यात येणार आहे. शहरी कचरा व्यवस्थापनातील उत्कृष्टता अधिक वेगाने साध्य करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाद्वारे 33 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 70 मार्गदर्शक शहरे आणि 191 मार्गदर्शन घेणारी शहरे  यांच्यात परस्पर शिकण्याला चालना देण्यात आली.  केंद्रीय मंत्री  मनोहर लाल यांच्या हस्ते 27 सप्टेंबर 2025 रोजी ‘स्वच्छ शहर जोडी’ या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. हा शहरी कचरा व्यवस्थापनासाठीचा अशा प्रकारचा पहिलाच मार्गदर्शक(मेंटॉरशिप) आणि परस्पर शिक्षण कार्यक्रम आहे या उपक्रमाची सुरुवात झाली तेव्हा, सर्व मार्गदर्शक आणि मार्गदर्शन घेणाऱ्या शहरांदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला.

स्वच्छ शहर जोडी उपक्रमांतर्गत मार्गदर्शन घेणाऱ्या शहरांच्या स्वच्छतेशी संबंधित प्रमुख निकषांवरील कामगिरीत स्वच्छ सर्वेक्षण 2024 आणि 2025 दरम्यान लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 च्या सर्वेक्षणात या शहरांच्या कामगिरीत उल्लेखनीय प्रगती नोंदवण्यात आली आहे.  व्हिजिबल क्लिनलीनेस या निकषावर, ही शहरे 'स्वच्छ सर्वेक्षण 2024' मधील 48% वरून यंदा  70% पर्यंत पोहोचली आहेत. 'घरोघरी जाऊन कचरा संकलन' यात, ही शहरे 'स्वच्छ सर्वेक्षण 2024' मध्ये 52% वर होती, ती आता  74% पर्यंत पोहोचली आहेत. याव्यतिरिक्त, इतर महत्त्वाच्या निकषांवरही या शहरांनी लक्षणीय सुधारणा साधली आहे; जसे की: कचऱ्याचे स्रोतस्थानी वर्गीकरण (16% वरून 30%), स्वच्छता सुविधांची उपलब्धता (11% वरून 38%), वापरलेल्या पाण्याचे  व्यवस्थापन (32% वरून 53%) आणि स्वच्छतेबाबत जनजागृती (48% वरून 66%). हे बदल, उत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांकडून मिळालेल्या समर्पित मार्गदर्शनामुळे, स्वच्छता प्रणाली अधिक बळकट झाल्याचे आणि सेवा वितरणाच्या परिणामांमध्ये सुधारणा झाल्याचे दर्शवतात.

स्वच्छतेप्रती समर्पित प्रयत्न, निकोप स्पर्धा आणि दृढ वचनबद्धतेच्या वर्षभराच्या प्रवासानंतर, देशभरातील शहरे आता 11 नोव्हेंबर 2026 रोजी जाहीर होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 च्या पुरस्कार विजेत्यांच्या घोषणेची उत्सुकतेने  प्रतीक्षा करत आहेत.  

नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2334377) अभ्यागत कक्ष : 7