रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय रेल्वेने ऑक्टोबर 2026 मध्ये नोंदवली 145.07 दशलक्ष टन मालवाहतूक


ऑक्टोबर 2025 च्या तुलनेत ऑक्टोबर 2026 मध्ये अन्नधान्याची वाहतूक 26.3 टक्क्यांनी, देशांतर्गत कोळशाची वाहतूक 16.0 टक्क्यांनी, इतर मालाची वाहतूक 11.0 टक्क्यांनी आणि देशांतर्गत कंटेनर वाहतूक 6.3 टक्क्यांनी वाढली

ऑक्टोबर 2026 मध्ये वीज प्रकल्पांना होणारा कोळसा पुरवठा 19.5 टक्क्यांनी वाढला

एप्रिल ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत एकूण मालवाहतूक 978.78 दशलक्ष टनांवर पोहोचली, जी आर्थिक वर्ष 2025-26 च्या याच कालावधीतील कामगिरीपेक्षा अधिक आहे

Posted On: 04 NOV 2026 11:30AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 नोव्‍हेंबर 2026

 

भारतीय रेल्वेने ऑक्टोबर 2026 मध्ये आपली दमदार कार्यात्मक कामगिरी सुरू ठेवत मालवाहतुकीमध्ये मोठी वाढ नोंदवली आहे. मालवाहतुकीतील वाढ आणि त्यातून मिळणारे उत्पन्न, हे भारतीय रेल्वेच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या आणि देशातील लॉजिस्टिक क्षेत्राला बळकट करण्याच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे.

मालवाहतुकीत दमदार वाढ

भारतीय रेल्वेने ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक मालवाहतूक नोंदवली आहे. या महिन्यात 145.07 दशलक्ष टन मालाची वाहतूक झाली, जी ऑक्टोबर 2025 मधील 133.93 दशलक्ष टनांच्या तुलनेत 8.32 टक्क्यांनी अधिक आहे.

या महिन्यात अनेक प्रमुख वस्तूंच्या वाहतुकीत उत्साहवर्धक वाढ दिसून आली. यामध्ये अन्नधान्य 26.3 टक्के, देशांतर्गत कोळसा 16.0 टक्के, इतर माल 11.0 टक्के, क्लिंकर 10.4 टक्के, देशांतर्गत कंटेनर 6.3 टक्के, लोह खनिज 5.0 टक्के, खनिज तेल 1.9 टक्के आणि तयार पोलाद 0.5 टक्क्यांनी वाढले आहेत.

वीज प्रकल्पांची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी, भारतीय रेल्वेने देशांतर्गत कोळसा वाहतुकीत वाढ केली आहे. ऑक्टोबर 2026 मध्ये दररोज सरासरी 469.8 रेक, अर्थात मालागाड्या कोळसा पुरवण्यात आला, जो गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील 393.2 रेकच्या तुलनेत 19.5 टक्क्यांनी अधिक आहे. ऑक्टोबर 2026 मधील दमदार कामगिरी ही आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या सात महिन्यांत (एप्रिल ते ऑक्टोबर) नोंदवलेल्या वाढीवर आधारित आहे. या कालावधीत, भारतीय रेल्वेने 978.78 दशलक्ष टन मालवाहतूक केली, जी मागील वर्षाच्या याच कालावधीतील 935.10 दशलक्ष टन मालवाहतुकीच्या तुलनेत 4.67 टक्क्यांनी अधिक आहे.

प्रवासी वाहतुकीतही सातत्यपूर्ण वाढ

ऑक्टोबर 2026 मध्ये प्रवासी वाहतुकीतही स्थिर वाढ दिसून आली. भारतीय रेल्वेने 64.72 कोटी प्रवाशांची ने-आण केली, तर मागील वर्षीच्या याच महिन्यात ही संख्या 63.52 कोटी होती.

एप्रिल ते ऑक्टोबर 2026 या काळात, भारतीय रेल्वेने 443.8 कोटी प्रवाशांना सेवा दिली, जी मागील वर्षाच्या याच कालावधीतील 431.4 कोटी प्रवाशांच्या तुलनेत अधिक आहे. यामध्ये नॉन-सबरबन म्हणजे मेल एक्सप्रेस विभागात 4.2 टक्क्यांची, तर सबरबन अर्थात उपनगरी रेल्वे विभागात 1.7 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.

मालवाहतुकीतील ही वाढ, लॉजिस्टिक व्यवस्था बळकट करण्याच्या आणि भारताच्या आर्थिक विकासाला पाठबळ देण्याच्या भारतीय रेल्वेच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. क्षमता विस्तार आणि कार्यक्षमतेत सुधारणा करून, भारतीय रेल्वे आपल्या परिवहन जाळ्याचा सातत्याने विकास करत आहे.

 

* * *

नितीन फुल्लुके/राजेश शिरभाते/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2332506) अभ्यागत कक्ष : 10