कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

​देशभरात राबवल्या जात असलेल्या हयातीचा डिजिटल दाखला मोहीमेच्या 5 व्या पर्वाअंतर्गत 100% निवृत्तीवेतनधारकांना सामावून घेण्याचे निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचे आवाहन


​हयातीचा डिजिटल दाखल्यामुळे निवृत्तीवेतनधारकांना इतरांवर अवलंबून न राहता सेवांचा लाभ मिळवणे झाले शक्य: निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग सचिव

Posted On: 03 NOV 2026 9:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 नोव्‍हेंबर 2026

 

​निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या (DoPPW) वतीने पंजाब नॅशनल बँकेच्या सहकार्याने आज नवी दिल्लीतील संसद मार्ग शाखेत हयातीच्या डिजिटल दाखल्यांसंबंधित भव्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. देशभरात राबवल्या जात असलेल्या हयातीचा डिजिटल दाखला मोहीमेच्या 5व्या पर्वाअंतर्गत अंतर्गत हे शिबीर घेण्यात आले. चेहऱ्याच्या आधारे ओळख पडताळणी तंत्रज्ञानाच्या (Face Authentication Technology) माध्यमातून निवृत्तीवेतनधारक आणि कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांना सुलभतेने त्यांचा  हयातीचा डिजिटल दाखला सादर करता यावा, हा या शिबीराचा मुख्य उद्देश होता. यासोबतच या शिबिराच्या माध्यमातून डिजिटल सेवांच्या सुलभतेबद्दल निवृत्तीवेतनधारकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावरही भर दिला गेला.

या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या सचिव निवेदिता शुक्ला वर्मा यांनी उपस्थितांना संबोधित केले. निवृत्तीवेतनधारक हेच विभागाच्या उपक्रमांच्या केंद्रस्थानी आहेत ही बाब त्यांनी अधोरेखित केली. हयातीच्या डिजिटल दाखल्यासाठीची ही मोहिम दुर्गम भागांत राहणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांसह प्रत्येक निवृत्तीवेतनधारकापर्यंत पोहोचण्यावरच या मोहिमेचे यश अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले. या मोहिमेतील ज्येष्ठ निवृत्तीवेतनधारकांच्या सहभागाचे आणि योगदानाचे त्यांनी कौतुकही केले. या मोहिमेच्या या पूर्वीच्या आवृत्तीदरम्यान 80 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या 14 लाखापेक्षा जास्त निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या हयातीचे डिजिटल दाखले सादर केले होते, आणि हे दखलपात्र यश आहे असे त्या म्हणाल्या.

​निवृत्तीवेतनधारकांनी डिजिटल सक्षमीकरणाचे दूत बनावे. यासाठी त्यांनी आपले अनुभव इतरांसोबत सामायिक करावेत आणि आपल्या सहकारी निवृत्तीवेतनधारकांना चेहऱ्याच्या आधारे ओळख पडताळणी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमाच्या अंतर्गत मिळणारी सुविधा कशी सोयीची आहे याबद्दलही त्यांनी सांगितले. यामुळे निवृत्तीवेतनधारकांना इतरांवर अवलंबून न राहता अथवा बँकेच्या शाखांना भेट न देता आपल्या स्मार्टफोनचा वापर करून घरातूनच स्वतःचा हयातीचा डिजिटल दाखला तयार करता येऊ शकतो अशी माहिती त्यांनी दिली.

​निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचे सहसचिव ध्रुवज्योती सेनगुप्ता यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. हयातीच्या डिजिटल दाखल्याचा प्रारंभ 2014 मध्ये झाला होता. तेव्हापासून या सेवेत लक्षणीय प्रगती झाली असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर 2021 मध्ये या सेवेला चेहऱ्याच्या आधारे ओळख पडताळणी तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली. यामुळे आता ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोयीची बनली असल्याचे त्यांनी सांगितले. या मोहिमेच्या या पूर्वीच्या आवृत्तीदरम्यान चेहऱ्याच्या आधारे ओळख पडताळणी तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या प्रमाणपत्रांची संख्या सुमारे 50 लाखांवरून वाढून जवळपास 1.25 कोटी झाल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय ज्यांना शिबीरांना भेट देणे किंवा स्वतंत्रपणे प्रक्रिया पूर्ण करणे अशक्य आहे अशा निवृत्तीवेतनधारकांसाठी बँका आणि टपाल कार्यालयांच्या माध्यमातून घरोघरी सेवा उपलब्ध करून दिल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली.

​पंजाब नॅशनल बँकेच्या या शिबीरात ज्येष्ठ निवृत्तीवेतनधारकांसोबत संवादाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. यासोबतच हयातीच्या डिजिटल दाखल्याशी संबंधित सेवांसोबतच वैद्यकीय तपासणी शिबीराची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. या उपक्रमाच्या माध्यमातून सुलभ, सुरक्षित आणि निवृत्तीवेतनधारक केंद्रित डिजिटल सेवांना प्रोत्साहन देण्याच्या निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाची वचनबद्धताही पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

 

* * *

निलिमा चितळे/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2332300) अभ्यागत कक्ष : 11