नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत नविकरणीय उर्जा शिखर परिषद आणि प्रदर्शन 2026 दरम्यान प्रल्हाद जोशी यांनी जागतिक सौर सहकार्याबद्दलच्या वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार


आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या अध्यक्षपदी भारताची सलग तिसऱ्यांदा निवड: केंद्रीय नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री

सौर ऊर्जा आणि अ‍ॅग्री-पीव्ही द्वारे 30 लाख शेतकऱ्यांचे सक्षमीकरण: प्रल्हाद जोशी

Posted On: 03 NOV 2026 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 नोव्‍हेंबर 2026

 

केंद्रीय नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा, शिक्षण आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज येथे भारत नविकरणीय उर्जा शिखर परिषद आणि प्रदर्शन   2026 दरम्यान पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय सौर सहकार्याला पुढे नेण्यासाठी आणि प्रगतीचा लाभ सर्वांपर्यंत समानतेने पोहोचेल हे सुनिश्चित करण्यासाठी, भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, सक्षमीकरणासाठी सामर्थ्य आणि 'एक सूर्य, एक जग, एक ग्रीड' या संकल्पनांना अनुसरून आंतरराष्ट्रीय सौर सहकार्य  पुढे नेण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर भारत ठाम राहिला आहे, असे केंद्रीय मंत्र्यांनी अधोरेखित केले. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या  अध्यक्षपदी भारताची सलग तिसऱ्यांदा निवड झाली आहे.

या विश्वासानेच 2015 मध्ये भारत आणि फ्रान्सला एकत्र आणून 'आंतरराष्ट्रीय सौर आघाडी'ची स्थापना झाली असल्याची आठवण त्यांनी करून दिली. आज 130 स्वाक्षरीकर्ते आणि सदस्य देशांसह, ही संकल्पना आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी, विशेषतः 'ग्लोबल साउथ'साठी  एका शक्तिशाली व्यासपीठाच्या रुपात विकसित झाली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

भारत नविकरणीय उर्जा शिखर परिषद आणि प्रदर्शन 2026 चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2 नोव्हेंबर 2026 रोजी झाले असून 5 नोव्हेंबर 2026 रोजी याचा समारोप होईल. गेल्या दोन दिवसांतील आणि पुढील दोन दिवसांतील चर्चा सौर वचनबद्धतेकडून गुंतवणुकीकडे, सहकार्याकडून प्रकल्पांकडे आणि महत्त्वाकांक्षेपासून प्रत्यक्ष प्रभावाकडे जाण्याच्या स्पष्ट प्राधान्यक्रमाला बळकट करतील, असे जोशी यांनी सांगितले.

आघाडीच्या प्रमुख प्राधान्यांना अधोरेखित करत जोशी यांनी सर्वात जास्त गरज असलेल्या ठिकाणी सौरऊर्जा उभारणीसाठी वित्तपुरवठा करण्याच्या महत्त्वावर भर दिला.

जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सौरऊर्जेच्या भूमिकेवर भर देताना जोशी यांनी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली. लहान बेटांवर वसलेल्या विकसनशील देशांसाठी एकत्रित सौर ऊर्जा निर्मिती आणि साठवणुकीचे मॉडेल तयार करण्यासाठी सौर आघाडी मॉरिशसपासून सुरुवात करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

केंद्रीय मंत्र्यांनी सौरऊर्जेच्या माध्यमातून 30 लाख शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि अ‍ॅग्री-पीव्ही चा विस्तार करण्याच्या महत्त्वावरही भर दिला. भारताचा 'पीएम-कुसुम' उपक्रम सौरऊर्जेवर चालणारी शेती कशा प्रकारे सिंचन खर्च कमी करू शकते आणि अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी निर्माण करू शकते हे दर्शवत आहे, असे त्यांनी सांगितले. आयएसएच्या माध्यमातून, विशेषतः आफ्रिकी सदस्य देशांमध्ये या मॉडेलचा अवलंब करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना ऊर्जा संक्रमणाच्या केंद्रस्थानी ठेवले जात आहे.

तांत्रिक प्रगतीच्या संदर्भात स्वच्छ ऊर्जेचे वाढते महत्त्व अधोरेखित करताना, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थव्यवस्थांना नवा आकार देत आहे, त्यानुसार परवडणाऱ्या, विश्वासार्ह आणि स्वच्छ विजेची उपलब्धता ही अधिक महत्त्वाची धोरणात्मक गरज बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारतावर विश्वास दर्शवत आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या अध्यक्षपदासाठी सलग तिसऱ्यांदा भारताची निवड केल्याबद्दल त्यांनी भारत सरकारतर्फे, सर्व सदस्य देशांचे मनःपूर्वक आभार मानले.

 

* * *

निलिमा चितळे/शैलेश पाटील/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2332268) अभ्यागत कक्ष : 10