वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनवण्याच्या प्रवासाचे नेतृत्व युवकांनी करावे- वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे आवाहन


विश्वासार्ह जागतिक भागीदार म्हणून भारताचा उदय,विविध प्रदेशातील देश भारतासोबत पसंतीचे व्यापारी करार आणि मुक्त व्यापार करार करण्यास उत्सुक : गोयल

Posted On: 03 NOV 2026 5:03PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 नोव्‍हेंबर 2026

 

युवकांनी महत्वाकांक्षी व्हावे, परिवर्तनाचा आनंदाने अंगीकार करावा आणि राष्ट्र उभारणीत योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत किरोडीमल महाविद्यालयाच्या व्यासपीठावर आयोजित, यंग लिडर्स डीस्कोर्स फोरम मध्ये बोलत होते.

2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्याच्या उद्दिष्टात कुठलीही तडजोड होणार नाही, असे अधोरेखित करत, या मैलाचा टप्पा साध्य करण्याच्या प्रवासाचे खरे शिल्पकार देशाचे युवक असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.     

भारताच्या निर्यात कामगिरीला अधोरेखित करतांना, गोयल यांनी सांगितले की, गेल्या वर्षी, देशाने आजवरची सर्वाधिक म्हणजेच, 863 अब्ज डॉलर्सची निर्यात नोंदवली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आपल्या एप्रिल- मे महिन्यातील अंदाजात, जागतिक व्यापारात 1.9  टक्क्यांची वाढ होईल, असे म्हटले आहे, मात्र, भारताने, चालू आर्थिक वर्षात एक ट्रिलियन निर्यातीचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे, यातून 16 टक्के विकास प्रतिबिंबित होतो, असेही त्यांनी सांगितले.   

भारताच्या आर्थिक वृद्धीसाठी अनेक घटक कारणीभूत आहे, असे सांगत, त्यात भारतातील प्रतिभा, युवकांचे कौशल्य, भारताची लोकशाही प्रणाली, सरासरी वय 30 च्या खाली असलेली, युवा लोकसांख्यिक रचना, निर्णयक्षम नेतृत्व आणि 140 कोटी भारतीयांनी दर्जेदार गुणवत्तेची उत्पादने आणि सेवा यांची केलेली मागणी, अशा सर्व घटकांना त्यांनी श्रेय दिले.

भारताने आज संपूर्ण जगाचा विश्वास जिंकला आहे, त्यामुळे, जवळपास प्रत्येक प्रदेशातील देश, भारताशी पसंतीचे व्यापार करार आणि मुक्त व्यापार करण्यास उत्सुक असल्याचे गोयल यांनी सांगितले. अधिकाधिक देश आज भारताकडे एक विश्वासार्ह भागीदार म्हणून बघत असून, त्यात युवा लोकसंख्या, गुणवत्ता, कठोर मेहनत करण्याची तयारी आणि जागतिक अर्थव्यवस्थेत योगदान देण्यासाठीची कटिबद्धता, हे घटक, भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जा उंचावत आहेत, असेही ते म्हणाले.

देशातील युवकांनी, स्वतःला वारंवार नव्याने सिद्ध करत राहावे, बदलत्या परिस्थितीचा स्वीकार करण्यासाठी आणि आपल्या संपूर्ण आयुष्यात ज्ञानाचा अंगीकार करण्यासाठी स्वतःचे मन आणि बुद्धी मुक्त ठेवावी, असा सल्ला त्यांनी दिला.

आजचे विद्यार्थी भाग्यवान आहेत, कारण त्यांच्यासमोर अनेकविध संधी उपलब्ध आहेत आणि त्यांना त्यांच्या निवडीचे करियर निवडण्याचे स्वातंत्र्य आहे, असेही गोयल म्हणाले.

आपल्या भाषणाच्या शेवटी, गोयल यांनी विद्यार्थ्यांना, आयुष्यात शिस्त पाळण्याचे आवाहन केले. नेहमी मोठे उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवा आणि कधीही आत्मविश्वास आणि धैर्य डळमळीत होऊ देऊ नका, कारण जो धैर्य आणि साहस दाखवतो, तोच, अखेर यशस्वी होतो, असेही गोयल म्हणाले.

 

* * *

निलिमा चितळे/राधिका अघोर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2332101) अभ्यागत कक्ष : 11