Posted On:
29 OCT 2026 4:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2026
- ऑक्टोबर 2026 पर्यंत भारतीय कंपन्यांनी जगातील सर्वात मोठ्या हरित हायड्रोजन खरेदीच्या एकूण 5.5 लाख मेट्रिक टन प्रति वर्षाहून (एमटीपीए) अधिक क्षमतेच्या करारांवर स्वाक्षरी केली आहे. यामुळे भारताने हरित हायड्रोजन पुरवठा करारांमध्ये जागतिक स्तरावर आघाडीचे स्थान मिळवले आहे.
- 2026 या वर्षात भारतीय कंपन्यांनी 4 लाख मेट्रिक टन प्रति वर्षाहून अधिक हरित हायड्रोजन समतुल्य प्रमाणाच्या पुरवठ्यासाठी 18 नवीन खरेदी करारांवर स्वाक्षरी केली.
- 2023 मध्ये राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानाच्या प्रारंभापासून आजतागायत सुमारे 5.5 लाख मेट्रिक टन प्रति वर्ष हरित हायड्रोजन समतुल्याचे एकूण 23 खरेदी करार (ऑफटेक कॉन्ट्रॅक्ट्स) करण्यात आले आहेत. यापैकी 70% पेक्षा अधिक उत्पादन निर्यातीसाठी राखून ठेवण्यात आले आहे.
- या हरित हायड्रोजन प्रकल्पांमुळे सुमारे 90,000 कोटी रुपयांची (अंदाजे 9.5 अब्ज अमेरिकन डॉलर्स) एकूण गुंतवणूक आकर्षित होण्याची अपेक्षा आहे.
- भारतीय पुरवठादार हरित अमोनिया आणि हरित मिथेनॉल जगातील सर्वात स्पर्धात्मक दरात उपलब्ध करून देत आहेत. यामुळे युरोपीय आणि जपानी बाजारपेठांमध्ये भारताचे अग्रगण्य स्थान अधिक बळकट होत आहे.
- हरित अमोनिया हे जागतिक जहाजवाहतूक क्षेत्रात जहाजांसाठी स्वच्छ इंधन म्हणून उदयास येत आहे. तसेच, हरित मिथेनॉलचाही स्वच्छ इंधन म्हणून वापर वाढत आहे.
- कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये अमोनिया को-फायरिंगसाठी देखील हरित अमोनियाचा वापर केला जात आहे.
- औद्योगिक क्षेत्रातील कार्बन उत्सर्जन कमी करणे शक्य व्हावे यासाठी जगभरात खत उत्पादन आणि तेल शुद्धीकरण क्षेत्रात हरित हायड्रोजनपासून तयार होणाऱ्या उत्पादनांचा वापर वाढत आहे.
ऑक्टोबर 2026 पर्यंत भारतीय कंपन्यांनी निश्चित केलेल्या आणि स्वाक्षरी केलेल्या एकूण हरित हायड्रोजन खरेदीची पातळी 5,55,610 मेट्रिक टन प्रति वर्ष पर्यंत पोहोचली आहे. हे राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनच्या उद्दिष्टाच्या सुमारे 11% आहे. यामुळे भारत हरित हायड्रोजन क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रणी ठरला आहे.
हे सर्वसमावेशक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय करार पूर्ण करण्यासाठी 90,000 कोटी रुपयांहून (सुमारे 9.5 अब्ज अमेरिकन डॉलर्स) अधिक भांडवली गुंतवणुकीची आवश्यकता आहे.

राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानाला (एनजीएचएम) केंद्रीय मंत्रिमंडळाने 2029-30 पर्यंत 19,744 कोटी रुपयांच्या प्रारंभिक खर्चासह मंजुरी दिली. 2030 पर्यंत किमान 50 लाख मेट्रिक टन प्रति वर्ष हरित हायड्रोजनचे उत्पादन करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. याव्यतिरिक्त, या अभियानातून पुढील परिणाम अपेक्षित आहेत – 125 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमतेची भर; 8 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आकर्षित करणे; 6 लाखांहून अधिक पूर्णवेळ रोजगारांची निर्मिती आणि दरवर्षी 5 कोटी मेट्रिक टन कार्बन डायऑक्साइड (CO2) उत्सर्जनात घट.
भारतीय उद्योगांनी प्रमुख जागतिक बाजारपेठांमध्ये महत्त्वपूर्ण धोरणात्मक भागीदारी आणि बंधनकारक हरित हायड्रोजन खरेदी करार केले आहेत. त्यापैकी उल्लेखनीय करारांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
- भारतातील ॲक्मे ACME ग्रुपने जपानच्या आयएचआय (IHI) कंपनीसोबत 4,88,000 मेट्रिक टन प्रतिवर्ष हरित अमोनियाच्या पुरवठ्यासाठी खरेदी करारावर स्वाक्षरी केली आहे.
- ॲक्मे ग्रुपने जपानच्या मित्सुबिशी गॅस केमिकल (एमजीसी) कंपनीशी 1,00,000 एमटीपीए हरित मेथॅनॉलच्या पुरवठ्यासाठी एका करारावर स्वाक्षरी केली आहे.
- एल अँड टी आणि इटोचू (आयटीओसीएचयू) यांनी 3,00,000 टीपीए हरित अमोनियाच्या पुरवठ्यासाठी एक विशेष उद्देशीय वाहन (एसपीव्ही) तयार केले असून, त्याचे वितरण डिसेंबर 2029 पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.
- रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने दक्षिण कोरियाच्या सॅमसंग सी अँड टी कॉर्पोरेशनसोबत 3 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त मूल्याचा दीर्घकालीन पुरवठा आणि खरेदी करार केला आहे, ज्यामुळे हा जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या हरित अमोनिया खरेदी करारांपैकी एक झाला आहे.या करारानुसार 2028 पर्यंत यांचे वितरण सुरू होण्याची अपेक्षा आहे.
- अगस्त्य हे श्रीलंकेतील एसएआरला (SAR) 2,50,000 मेट्रिक टन प्रति वर्ष हरित मेथॅनॉलचा पुरवठा करण्याच्या खरेदी प्रक्रियेत आहेत.
- HINT.CO GmbH द्वारे आयोजित केलेल्या H2Global लिलावात, आशियाई विभागासाठी एएम ग्रीनची (AM Green) एकमेव विजेता म्हणून निवड झाली आहे, ज्यामुळे जर्मनीला अ-जैविक मूळ असलेल्या नवीकरणीय इंधनासाठी (RFNBO) लागणाऱ्या अमोनियाच्या पुरवठ्यासाठी एक दीर्घकालीन खरेदी करार निश्चित झाला आहे. या करारानुसार, HINT.CO 10 वर्षांच्या कालावधीत AM Green कडून किमान 585 दशलक्ष युरो मूल्याचा अमोनिया खरेदी करेल. याचे पहिले वितरण 2029 मध्ये जर्मनीला पोहोचण्याची अपेक्षा आहे.
- एएम ग्रीनने जर्मनीच्या युनिपरसोबत प्रति वर्ष 2,50,000 मेट्रिक टन प्रति वर्ष हरित अमोनियाच्या पुरवठ्यासाठी एक निश्चित खरेदी करारही केला आहे.
- एएम ग्रीनने जपानची प्रमुख वीज उत्पादक कंपनी जेरा (JERA) सोबत प्रतिवर्ष 70,000 मेट्रिक टन प्रति वर्ष हरित अमोनियाच्या दीर्घकालीन पुरवठ्यासाठी एका बंधनकारक प्राथमिक करारावर स्वाक्षरी केली.
- जोनो ज्युल्सने सिलेक्ट एनर्जी जीएमबीएचसोबत 600 टीपीडी (सुमारे 2,19,000 एमटीपीए) हरित अमोनियासाठी खरेदी करारावर स्वाक्षरी केली आहे.
निर्यातीच्या आकडेवारीसोबतच, लक्ष्यित सरकारी आराखड्यांअंतर्गत देशांतर्गत मागणीही अधिक वाढली आहे:
- मिशनच्या साईट ('स्ट्रॅटेजिक इंटरव्हेन्शन्स फॉर ग्रीन हायड्रोजन ट्रान्झिशन ,SIGHT)' कार्यक्रमांतर्गत, देशभरातील 11 खत युनिट्सना 6,70,000 मेट्रिक टन प्रति वर्ष हरित अमोनियाच्या उत्पादन आणि पुरवठ्यासाठी करार करण्यात आले आहेत.
- त्याचप्रमाणे, SIGHT कार्यक्रमांतर्गत, IOCL, BPCL, HPCL आणि NRL च्या रिफायनरींना 30,000 MTPA हरित हायड्रोजनच्या उत्पादन आणि पुरवठ्यासाठी प्रकल्प प्रदान करण्यात आले आहेत.
* * *
आशिष सांगळे/श्रद्धा मुखेडकर/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai