आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नशामुक्तीसाठी सेवा देणाऱ्या वैद्यकीय आणि संलग्न आरोग्यविषयक व्यावसायिकांसाठीच्या क्षमता बांधणी कार्यक्रमाचा केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांच्या हस्ते शुभारंभ


‘नशा मुक्त भारत’ उद्दिष्ट 2029 पर्यंत साध्य करतानाच सरकारला व्यसनविकारांच्या समस्येचा सामना करण्यासाठी , समन्वयित आणि सर्वंकष दृष्टिकोन ठेवण्‍याची आवश्‍यकता - केंद्रीय आरोग्य मंत्री

अंमली पदार्थांच्या व्यसनाशी लढा देण्यासाठी आरोग्य व्यवस्था, सामाजिक कल्याण आणि कायद्यांची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था, यांच्यात समन्वय राखून एकत्रित प्रयत्न आवश्यक – जे. पी. नड्डा

Posted On: 26 OCT 2026 9:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2026

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी आज नवी दिल्लीत कर्तव्य भवन-1 इथे, नशा मुक्तीसाठी सेवा देणारे वैद्यकीय आणि संलग्न आरोग्य सेवा व्यावसायिक यांच्यासाठीच्या क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ केला. हा कार्यक्रम, प्रत्यक्ष आणि ऑनलाईन अशा मिश्र स्वरूपात घेण्यात आला होता.

व्यसनाधीनतेपासून प्रतिबंध, त्याची ओळख, विश्लेषण, उपचार आणि व्यवस्थापन अशा सर्व कामांमध्ये सहभागी होणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांची क्षमता अधिक वृद्धिंगत करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री  जे. पी. नड्डा यांनी यावेळी, डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, समुपदेशक आणि इतर आरोग्यसेवा व्यावसायिकांसाठी ऑनलाइन आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा समावेश असलेला, सुनियोजित अंमलबजावणी आराखड्यासह सर्वसमावेशक क्षमता-विकास कार्यक्रम विकसित केल्याबद्दल संबंधित चमूचे अभिनंदन केले. प्रशिक्षणासाठी टप्प्याटप्प्याने आखलेल्या सुनियोजित अभ्यासक्रमाचेही त्यांनी कौतुक केले. या अभ्यासक्रमाच्या आखणीनुसार, आधी प्रादेशिक आणि राष्ट्रीय संस्थांमध्ये सहकार्य वाढवून, त्यानंतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये क्षमता-विकास उपक्रमांचा विस्तार करण्याचे नियोजन आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारत सरकार 2029 पर्यंत, नशामुक्त भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार यावेळी आरोग्य मंत्र्यांनी केला. अंमली पदार्थांच्या व्यसनाशी लढा देण्यासाठी सरकारचा सर्वंकष दृष्टिकोन  आणि सर्व मंत्रालये तसेच विभाग यांच्यात समन्वय राखून एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचे जे. पी. नड्डा यावेळी म्हणाले.

 एकेकट्याने- स्वतंत्रपणे, विखुरलेल्या स्वरूपातील प्रयत्न आणि विविध विभागांनी स्वतंत्रपणे काम केल्यामुळे समन्वय आणि सेवा वितरणामध्ये त्रुटी निर्माण झाल्या होत्या, असे नड्डा यांनी यावेळी नमूद केले.  केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या हस्ते जारी करण्यात आलेला ‘अंमली पदार्थ नियंत्रणविषयक दृष्टिपत्र : 2026–2029’ हा दस्तऐवज मात्र, विविध मंत्रालये आणि विभागांच्या जबाबदाऱ्या आणि  उद्दिष्टे निश्चित करून या त्रुटी दूर करणारा आहे, असे ते म्हणाले. या दस्तऐवजाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रालयांमध्ये सातत्यपूर्ण समन्वय आणि सामूहिक उत्तरदायित्व आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

यात, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची भूमिका अधोरेखित करतांना, नड्डा यांनी, उपचार सेवा अधिक बळकट करणे आणि आरोग्य सेवा व्यावसायिक तसेच नशामुक्ती केंद्रांची क्षमता बांधणी करण्यावर भर देत, या राष्ट्रीय प्रयत्नात, त्यांच्या मंत्रालयाचे योगदान त्यांनी विशद केले.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या व्यसनमुक्ती केंद्रांना योग्य प्रशिक्षण, संस्थात्मक बळकटीकरण आणि पुरेसा आर्थिक निधी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

नशामुक्ती अभियानाची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी आणि त्यात येणाऱ्या नवनव्या  आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, आरोग्यसेवा व्यावसायिक आणि सहभागी संस्थांनी आंतरविभागीय समन्वयाची आवश्यकता असलेल्या सूचनांसह इतर व्यावहारिक सूचनाही  मांडाव्यात, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


सुवर्णा बेडेकर/राधिका अघोर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2328756) अभ्यागत कक्ष : 5