Posted On:
24 OCT 2026 11:40AM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी 23 ऑक्टोबर 2026 रोजी बर्लिनमध्ये जर्मन सरकारचे वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक प्रमुख, संशोधन संस्था आणि तेथील भारतीय समुदायाच्या सदस्यांसोबत विविध बैठका घेत आपला दोन दिवसांचा जर्मनीचा अधिकृत दौरा पूर्ण केला. या बैठकांमध्ये व्यापार, गुंतवणूक, प्रगत उत्पादन, संशोधन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रांतील भारत-जर्मनी सहकार्य बळकट करण्यावर भर देण्यात आला.
पीयूष गोयल यांनी जर्मन फेडरल चॅन्सेलरीचे आर्थिक व वित्तीय धोरण सल्लागार आणि जी7/जी20 शेर्पा लेव्हिन हॉले यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. या चर्चेत द्विपक्षीय आर्थिक सहकार्य आणि भारत व जर्मनीमधील आर्थिक तसेच गुंतवणुकीचे संबंध अधिक दृढ करण्याच्या संधींवर विचारमंथन करण्यात आले.
मंत्र्यांनी सिमेन्स हेल्थिनियर्स एजी चे सीईओ बर्न्ड मोन्ताग; बर्टल्समन च्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आणि बर्टल्समन इन्व्हेस्टमेंट्सचे सीईओ कार्सटेन कोसफिल्ड; तसेच फॉक्सवॅगन एजी चे सीएफओ आणि स्कोडा ऑटो चे सीईओ होल्गर पीटर्स यांच्याशी वैयक्तिक बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये दोन्ही देशांमधील व्यावसायिक भागीदारी, गुंतवणूक आणि औद्योगिक सहकार्य विस्तारण्याच्या संधींची चाचपणी करण्यात आली.
गोयल यांनी प्रगत औद्योगिक तंत्रज्ञान आणि नवोन्मेषविषयक सहकार्यावर चर्चा करण्यासाठी प्रमुख जर्मन औद्योगिक संशोधन संस्थांच्या प्रमुखांसोबत एका गोलमेज परिषदेत भाग घेतला. याशिवाय, सोबत आलेल्या भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाचे सदस्य द्विपक्षीय व्यावसायिक सहकार्याच्या संधींचा शोध घेण्यासाठी जर्मन उद्योग प्रतिनिधी आणि क्षेत्राधारित संघटनांसोबत विविध चर्चासत्रांमध्ये सहभागी झाले.
गोयल यांनी बर्लिनमधील भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधला आणि प्रसारमाध्यमांनाही संबोधित केले.
संशोधन आणि नवोन्मेष परिसंस्थेशी संबंधित उपक्रमांचा भाग म्हणून, गोयल यांनी जर्मनीतील भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान संशोधक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, लॉजिस्टिक्स, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, औद्योगिक नवोन्मेष आणि बॅटरी तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांतील निवडक फ्रॉउनहोफर संस्थांच्या प्रमुखांसोबत एक गोलमेज बैठक घेतली. या बैठकीत भारत आणि जर्मनीमधील संशोधन सहकार्य तसेच उद्योग-शैक्षणिक भागीदारी भक्कम करण्याच्या मार्गांवर चर्चा झाली.
या सर्व बैठकांच्या माध्यमातून भारत-जर्मनी धोरणात्मक भागीदारीमधील, विशेषतः व्यापार, गुंतवणूक, प्रगत उत्पादन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संशोधन तसेच औद्योगिक सहकार्याचे महत्त्व अधोरेखित झाले.
***
आशिष सांगळे/शैलेश पाटील/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com