वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल व्यापार, गुंतवणूक आणि औद्योगिक सहकार्य बळकट करण्यासाठी जर्मनी आणि नेदरलँड्सला भेट देणार
Posted On:
21 OCT 2026 5:38PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल धोरणात्मक आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी, द्विपक्षीय व्यापाराचा विस्तार करण्यासाठी आणि औद्योगिक व तंत्रज्ञान विषयक सहकार्याला चालना देण्यासाठी जर्मनी (22–24 ऑक्टोबर 2026) आणि नेदरलँड्स (24–27 ऑक्टोबर 2026) या देशांचा अधिकृत दौरा करणार आहेत.
या दौऱ्याच्या बर्लिन भेटीदरम्यान, पियुष गोयल 'बर्लिन ग्लोबल डायलॉग'मध्ये सहभागी होतील. यामध्ये ते आंतरराष्ट्रीय धोरणकर्ते आणि जागतिक व्यावसायिक नेत्यांशी संवाद साधून भारताची स्थूल-आर्थिक स्थिरता , उत्पादन क्षमता आणि लवचिक जागतिक पुरवठा साखळी उभारणीतील भारताची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करतील. या शिखर परिषदेच्या निमित्ताने, केंद्रीय मंत्री गोयल जर्मनीचे फेडरल अर्थ आणि ऊर्जा मंत्री तसेच जर्मनीच्या फेडरल चॅन्सेरीमधील आर्थिक व वित्तीय धोरण सल्लागार आणि G7/G20 शेरपा यांच्यासोबत उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा करतील. या बैठकांमध्ये द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीचे मार्ग बळकट करण्यावर; प्रगत अभियांत्रिकी, हरित गतिशीलता आणि स्वच्छ तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान व औद्योगिक सहकार्याला गती देण्यावर ; तसेच भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराच्या सुरू असलेल्या वाटाघाटींतून निर्माण होणाऱ्या बाजारपेठेतील प्रवेशाच्या संधी आणि गुंतवणुकीच्या मार्गांवर भर दिला जाईल.
नेदरलँड्सच्या दौऱ्यावर पियुष गोयल हेग येथे सर्वसमावेशक अशा 'सरकार-ते-सरकार' (G2G) चर्चेचे नेतृत्व करतील. यादरम्यान ते नेदरलँड्सच्या 'आर्थिक व्यवहार आणि हवामान मंत्री' तसेच 'परकीय व्यापार आणि विकास सहकार्य मंत्री' यांच्यासोबत द्विपक्षीय मंत्रीस्तरीय बैठका घेतील. या बैठकांमध्ये व्यापाराचे मार्ग विस्तारण्याबाबत आणि हरित संक्रमणाशी संबंधित उपक्रमांवर चर्चा केली जाईल.
पियुष गोयल यांच्यासोबत जर्मनी आणि नेदरलँड्सच्या दौऱ्यात सुमारे 100 व्यावसायिक आणि स्टार्टअप्सचे प्रतिनिधी असतील. मंत्र्यांसोबत जाणाऱ्या या भारतीय व्यावसायिक प्रतिनिधी मंडळासाठी बर्लिनमध्ये एक समांतर कार्यक्रम आयोजित केला जाईल, ज्यामध्ये जर्मनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भारतीय व्यावसायिक प्रतिनिधी यांच्यासोबत विविध क्षेत्रांतील गोलमेज चर्चांचा समावेश असेल. हे प्रतिनिधीमंडळ 'जर्मनी ट्रेड अँड इन्व्हेस्ट' (GTAI) सोबत आयोजित 'भारत-जर्मनी गुंतवणूक गोलमेज' मध्येही सहभागी होईल, ज्यामध्ये जर्मनीत गुंतवणूक करण्याबाबत आणि तिथे व्यवसाय सुरू करण्याबाबत चर्चा केली जाईल.
भारताचे व्यावसायिक प्रतिनिधीमंडळ 25 ऑक्टोबर 2026 रोजी रॉटरडॅम बंदराला भेट देईल आणि तेथील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी पायाभूत सुविधेची पाहणी करतील. 26 ऑक्टोबर 2026 रोजी, हेग येथे आयोजित 'भारत-नेदरलँड्स बिझनेस फोरम'मध्ये, पियुष गोयल आणि नेदरलँड्सचे परकीय व्यापार व विकास सहकार्य मंत्री, दोन्ही देशांच्या व्यावसायिकांना संबोधित करतील. या बिझनेस फोरमनंतर, विविध क्षेत्रांतील सहा समांतर गोलमेज चर्चा आणि B2B नेटवर्किंग सत्रे आयोजित केली जातील.
***
Nilima Chitale / Madhuri Pange / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2326247)
अभ्यागत कक्ष : 6