गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या ‘सेवा आणि समर्पणा’च्या कार्यकाळाच्या निमित्ताने सुरू असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत, नक्षलवादी हिंसाचारामुळे बळी ठरलेल्या व्यक्तींसह इतर दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक उपकरणे वितरण कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दूरदृश्‍य प्रणालीच्या माध्‍यमातून केले मार्गदर्शन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून पूर्ण झालेल्या 25 वर्षांच्या सेवा कार्यकाळाच्या निमित्ताने,देशभरात अशा ‘सेवा संकल्प अभियानां’चे आयोजन

या मोहिमेत केवळ बस्तरमधील 1,570 हून अधिक लाभार्थी आहेत, यातून बस्तरमधील लोकांच्या वेदना आणि संघर्षाचे प्रतिबिंब जाणवते -अमित शाह

'नक्षलवाद्यांनी राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आयईडी स्फोट घडवून आणून निष्पाप लोकांना दिव्यांग बनवले;मानवी हक्कांचे यापेक्षा मोठे उल्लंघन दुसरे असूच शकत नाही'- केंद्रीय गृहमंत्री

ज्याप्रमाणे नक्षलवादाचा नायनाट करण्यात आला आहे, त्याचप्रमाणे त्या घटनांच्या अस्तित्वाच्या सर्व खुणाही पुसून टाकणेही गरजेचे – गृहमंत्री अमित शाह

Posted On: 15 OCT 2026 7:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2026

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या ‘सेवा आणि समर्पणा’च्या कार्यकाळाच्या निमित्ताने आयोजित ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत, नक्षलवादी हिंसाचाराचे बळी ठरलेल्या व्यक्तींसह इतर दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक उपकरणे वाटप करण्याच्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज दूरदृश्‍य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

याप्रसंगी बोलताना केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, ‘सेवा संकल्प अभियाना’चा एक भाग म्हणून आज ‘दिव्यांग सेवा शिबिरा’च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर भारताचे पंतप्रधान म्हणून पूर्ण केलेल्या 25 वर्षांच्या ‘सेवा’ आणि ‘समर्पणा’च्या कार्यकाळाच्या निमित्ताने, देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. या मोहिमेअंतर्गत, छत्तीसगडमधील नक्षलवादी हिंसाचाराचा फटका बसलेल्या आदिवासी दिव्यांग व्यक्तींचे जीवन सुसह्य करण्यासाठी त्यांना आवश्यक ती कृत्रिम साधने (सहाय्यक उपकरणे) पुरवली जात आहेत. अमित शाह यांनी सांगितले की, 5 ते 7 ऑक्टोबर २०२६ दरम्यान जगदलपूर येथे आयोजित कार्यक्रमातून 3,600 हून अधिक दिव्यांग व्यक्तींना त्याचा  लाभ मिळाला आहे. यापैकी 1,570 हून अधिक लाभार्थी केवळ बस्तरमधील आहेत; ही संख्या त्या प्रदेशातील दुर्दशेची व्याप्ती दर्शवते. त्यांनी नमूद केले की, पाच दशकांच्या नक्षलवादाने बस्तरमधील गरीब आदिवासी समुदायांना अतोनात दुःख दिले आहे. राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निष्पाप नागरिकांना ‘आयईडी’  स्फोटकांद्वारे अपंग करणे, हे मानवी हक्कांचे अत्यंत गंभीर उल्लंघन आहे. यावेळी शाह म्हणाले की, 31 मार्च, 2026 पूर्वी संपूर्ण देशातून नक्षलवाद नष्ट करण्यासाठी मोदी सरकार दृढनिश्चयी होते आणि आता नक्षलवाद पूर्णपणे नष्ट झाला आहे. मात्र, त्यांनी यावर भर दिला की, केवळ नक्षलवाद संपल्याने पाच दशकांच्या वेदना पुसल्या जाणार नाहीत. आपल्याला या दुःखातून निर्माण झालेल्या जखमा भरून काढाव्या लागतील, पीडितांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी  मदत करावी लागेल आणि त्यांना सन्मानाने तसेच आदराने जगता येईल, याची खात्री करावी लागेल.

अमित शाह म्हणाले की, मोदी सरकार प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला आणि प्रत्येक पीडिताला पुनर्वसनाची संधी देण्यासाठी कटिबद्ध आहे.

अमित शाह म्हणाले की, हिंसाचाराने त्रस्त असलेल्या बस्तरला पुन्हा एकदा एक चैतन्यमय आणि आनंदी प्रदेशात रूपांतरित करण्यासाठी छत्तीसगड सरकारने बस्तर ऑलिम्पिक्स, बस्तर पंडुम, नियाद नेलानार आणि मुख्यमंत्र्यांची सामूहिक बस योजना यांसारखे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.  एकेकाळी गोळीबार आणि बॉम्बस्फोटांच्या आवाजाने भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या बस्तरमध्ये आता हजारो तरुण खेळांमध्ये सहभागी होत आहेत आणि आपल्या परंपरा जिवंत ठेवत आहेत.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, अंदाजे 8,526 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. ज्यांची यापूर्वी खाती नव्हती अशा 7,328 जणांसाठी बँक खाती उघडण्यात आली आहेत. एकूण 1,620 लोकांना बक्षीस रक्कम, 7,882 लोकांना प्रोत्साहनपर रक्कम मिळाली आहे, 455 जणांना रोजगार देण्यात आला आहे आणि 129 जणांना जमीन वाटप करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 4014 लाभार्थ्यांना घरे मिळाली असून, 2308 हून अधिक आदिवासी लोकांनी कौशल्य विकास प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, 6763 नवीन शिधापत्रिका जारी करण्यात आल्या असून, 2808 कुटुंबांना मोफत वीज पुरवण्यात आली आहे आणि 372 नवीन रस्ते प्रकल्पांचे काम सुरू झाले आहे. 670 छोट्या पुलांचे बांधकाम सुरू असून, 48,526 लोकांना आधार कार्ड जारी करण्यात आले आहेत आणि इलवाड पंचायत पुरस्कारांअंतर्गत 44 ग्रामपंचायतींना मान्यता देण्यात आली आहे.


राधिका अघोर/शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2324101) अभ्यागत कक्ष : 9