वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ता मोहिमेचे नेतृत्व युवकांनी करावे - केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे युवकांना आवाहन


लवचिक पुरवठा साखळी आणि न्याय्य व्यापार पद्धतींमुळे जागतिक गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून भारताचे स्थान अधिक मजबूत : गोयल

Posted On: 15 OCT 2026 6:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2026

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी तरुण भारतीयांना उदयोन्मुख तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे, आपली कौशल्ये सातत्याने अद्ययावत करण्याचे आणि 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या प्रवासात योगदान देण्याचे आवाहन केले. विकसित भारताचे मार्ग या विषयावरील एसआरसीसी शताब्दी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी उत्पादन, तंत्रज्ञानाचा अवलंब आणि कौशल्य विकास यामधील गुंतवणुकीमुळे भारतातील युवकांसाठी संधी निर्माण होतील आणि जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये देशाचे स्थान अधिक मजबूत होईल. यावर भर दिला.

राजकीय स्थैर्य, लवचिक पुरवठा साखळी आणि न्याय्य व पारदर्शक व्यापार पद्धतींच्या आधारावर देशांचे उत्पादन आणि गुंतवणुकीचे पसंतीचे ठिकाण म्हणून भारताचे चांगले मूल्यांकन केले जात आहे, असे गोयल यावेळी म्हणाले. रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी भारताकडे गुंतवणूक आकर्षित करण्याची, उत्पादन वाढवण्याची आणि उत्तर व ईशान्य भारतासह नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची संधी आहे. बदलत्या रोजगार क्षेत्रासाठी तयार राहण्याकरिता कृत्रिम बुद्धीमत्ता , सायबर सुरक्षा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या व्यावहारिक उपयोगात कौशल्ये विकसित करण्याचे आवाहन त्यांनी तरुणांना केले. गोयल म्हणाले की, मोठे लँग्वेज मॉडेल्स आणि इतर एआय प्रणालींना अशा व्यावहारिक साधनांमध्ये विकसित करण्याची गरज आहे, जी व्यवसाय आणि सामान्य नागरिक वापरू शकतील.

गोयल यांनी निरंतर शिक्षण आणि वैयक्तिक विकासाच्या महत्त्वावरही भर दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना कौशल्यवृद्धीला आजीवन महत्व देण्याचे आवाहन करत, त्यांना व्यवसायाच्या वाढीसाठी, व्यवसाय सुलभतेसाठी आणि जीवनमान सुलभतेसाठी योगदान देण्यास मदत करू शकतील, अशा उदयोन्मुख संधी ओळखण्यास प्रोत्साहित केले. भारतातील तरुण विविध क्षेत्रांमध्ये तांत्रिक प्रगतीचे व्यावहारिक उपायांमध्ये रूपांतर करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात, असेही ते म्हणाले.

गोयल यांनी तरुण भारतीयांच्या, विशेषतः स्टार्टअप संस्थापकांच्या उद्योजकतेच्या भावनेविषयी सांगितले. आजचे युवा जोखीम पत्करत आहेत, आव्हानांना सामोरे जात आहेत आणि नाविन्यपूर्ण उपायांचा पाठपुरावा करत आहेत, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, तरुण उद्योजकांची ऊर्जा, दृढनिश्चय आणि महत्त्वाकांक्षा भारताच्या बदलत्या आकांक्षा दर्शवते आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी देशाच्या वाढत्या संबंधांना हातभार लावते.

भारताची तरुण लोकसंख्या, लोकसांख्यिक लाभांश,देशांतर्गत मोठी बाजारपेठ आणि उद्योजकतेची प्रेरणा यांच्या पाठबळावर भारत पुढील 20-25 वर्षांत सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय व्यापार कराराचा पहिला टप्पा निश्चित झाला असून, त्याची अंतिम रूपरेषा व कायदेशीर मसुदा तयार करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली. एकदा का आपल्याला आपल्या समकक्ष देशांवर स्पर्धात्मक फायदा मिळाला की, आम्ही तो लवकरच अंतिम करून कार्यान्वित करू शकू अशी आशा आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.


राधिका अघोर/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


 


(Release ID: 2324034) अभ्यागत कक्ष : 8