पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लडाखमधील 3,350 कोटी रुपये खर्चाच्या पाच विकास प्रकल्पांचे उद्घाटन
आज लडाखमध्ये अनेक महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले; या प्रकल्पांमुळे प्रवास सुलभ होईल, वीज पायाभूत सुविधांचा विस्तार होईल, पाण्याची उपलब्धता वाढेल आणि आपल्या प्राचीन वारशाच्या संवर्धनाला नवी चालना मिळेल: पंतप्रधान
लडाखच्या नवीन पिढीवर आमचे विशेष लक्ष आहे; येथील तरुणांना दर्जेदार शिक्षण मिळावे, नवीन तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळावी आणि यासाठी त्यांना इतर शहरांवर अवलंबून राहावे लागू नये, याकरिता लेहमध्ये एक भव्य उत्कृष्टता केंद्र उभारण्यात येणार: पंतप्रधान
नवीन क्रीडा धोरणाच्या माध्यमातून लडाखमधील क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न केले जात आहेत; आम्ही स्थानिक तरुणांना प्रगत प्रशिक्षण आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, जेणेकरून हे तरुण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाची नवी शिखरे पादाक्रांत करू शकतील: पंतप्रधान
Posted On:
15 OCT 2026 5:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीमार्फत लडाखमधील सुमारे 3350 कोटी रुपयांच्या पाच मोठ्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. पंतप्रधानांनी आभासी सहभागातून या प्रदेशाच्या विकासातील एका नव्या अध्यायाचा उत्सव साजरा करत असताना प्रवास सुलभ करणे, वीज आणि पाण्याची उपलब्धता सुधारणे, तसेच प्राचीन वारसा जतन करणे या उद्देशाने तयार केलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. झंस्कारमध्ये नव्याने झालेल्या हिमवृष्टीदरम्यान तिरंगा फडकवणाऱ्या नागरिकांच्या उत्साहाची पंतप्रधानांनी नोंद घेतली. तसेच, या आव्हानात्मक प्रकल्पांमधील कामे पार पाडणारे अभियंते, मजूर, स्थानिक कामगार आणि सीमा रस्ते संघटनेच्या (बीआरओ) कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. "या प्रकल्पांबद्दल मी लडाखमधील सर्व जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन करतो," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
लेह येथील कुशोक बकुला रिनपोचे विमानतळाच्या टर्मिनलच्या पायाभरणीच्या आपल्या पूर्वीच्या सोहळ्याची आठवण करून देत, पंतप्रधानांनी 650 कोटी रुपयांच्या या सुविधेचे उद्घाटन करताना आनंद व्यक्त केला. या सुविधेमुळे विमान उड्डाण क्षमता तिप्पट होणार असून आणि वार्षिक प्रवासी हाताळणी 10 लाखांवरून 35 लाखांपर्यंत वाढेल, असे त्यांनी सांगितले. हे टर्मिनल भारतातील पहिले असे टर्मिनल आहे, जिथे प्रतिकूल हवामानाचा विचार करून त्याचा सामना करण्यासाठी सौर ऊर्जेच्या वापरासोबतच भू-औष्णिक उर्जेवर आधारित तापमान नियंत्रणाची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. यामुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल आणि पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच पर्यावरणाची काळजी घेण्याचा समतोल साधला जाईल, असे ते म्हणाले. "लडाखमध्ये स्थानिक पर्यावरणाची संपूर्ण काळजी घेत आधुनिक पायाभूत सुविधा विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे," असेही त्यांनी नमूद केले.
प्रादेशिक संपर्क व्यवस्थेचे सामरिक आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित करत, पंतप्रधानांनी 2,500 कोटी रुपये खर्चाचा निम्मू-पदुम-दारचा हा रस्ता नागरिकांना समर्पित केला. हा रस्ता प्रवासाचा वेळ 12 तासांवरून केवळ 3 तासांपर्यंत कमी करतो, असे त्यांनी नमूद केले. प्रवाशांचा वेळ वाचवण्यापलीकडे जाऊन हा महत्त्वाचा मार्ग स्थानिक व्यापाराला लक्षणीय चालना देईल. "हा रस्ता व्यापार आणि व्यवसायालाही मोठी मदत करेल," असे पंतप्रधान म्हणाले.
श्रीनगर-लेह पारेषण वाहिनीच्या उद्घाटनानंतर, पंतप्रधानांनी पुगा खोऱ्यातील सुरू असलेल्या आधुनिक वीज निर्मिती उपक्रमांची नोंद घेत हानू जलविद्युत प्रकल्प आणि त्याच्याशी संबंधित पारेषण नेटवर्क समर्पित केले. ही वीज घरे उजळवून, मुलांचे शिक्षण, आरोग्यसेवा आणि लघुउद्योगांना सक्षम करून ग्रामीण जीवनात परिवर्तन घडवेल." असा विश्वास व्यक्त करत, या रस्त्याचा प्रत्येक क्षेत्राला याचा फायदा होईल," असे पंतप्रधान म्हणाले.
प्रतिकूल हवामानातही टिकून राहण्याची शेतीची लवचिकता आणि अति-उंचावरील क्षेत्रातील जलसुरक्षेवर भर देत, पंतप्रधानांनी ' अमृत हिम सरोवर' प्रकल्पांतर्गत विकसित केलेल्या 40 नवनिर्मित जलाशयांचे स्थानिक समुदायाकडे लोकार्पण केले. लागवडीच्या महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये कृषी अर्थव्यवस्थेला पाठबळ देण्यासाठी या जलसाठ्यांची रचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. “हे जलाशय शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यास मदत करतील,” असे मोदी यांनी नमूद केले.
लडाख 2019 मध्ये केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर त्या भागात अतिशय मोठ्या प्रमाणात झालेल्या पायाभूत सुविधांच्या विकासाची सविस्तर माहिती पंतप्रधानांनी दिली. रस्त्यांचे जाळे 1,800 किलोमीटरवरून वाढून 4,000 किलोमीटरपेक्षा जास्त झाले आहे, मोठ्या पुलांची संख्या 19 वरून सुमारे 75 पर्यंत वाढली आहे, हेलिपॅड्स 7 वरून 40 पेक्षा जास्त झाले आहेत, नळाच्या पाण्याची सोय 3.5 टक्क्यांवरून तब्बल 99 टक्के घरांपर्यंत पोहोचली आहे, रुग्णालयातील खाटांची संख्या दुप्पट झाली आहे, आणि सुरू असलेला झोजीला बोगदा आता बारमाही हवामानांत राष्ट्रीय संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सज्ज आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. “आज केंद्र सरकारसाठी लडाखचा विकास ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे,” असे मोदी यावेळी म्हणाले.
प्रादेशिक समृद्धीचे नवीन मार्ग खुले करण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न अधोरेखित करत, पंतप्रधानांनी संपूर्ण केंद्रशासित प्रदेशात हिवाळी आणि साहसी पर्यटनाला दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनाकडे लक्ष वेधले. तळागाळातील आर्थिक उपक्रमांना गती देण्यासाठी 'व्हायब्रंट व्हिलेजेस' कार्यक्रमांतर्गत सध्या 40 पेक्षा जास्त सीमावर्ती वस्त्यांचा विकास केला जात आहे. “यामुळे अगदी दूरवरच्या गावांमध्येही रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत,” असे मोदी यांनी नमूद केले.
आदरातिथ्य क्षेत्र आणि आधुनिक शेतीच्या, झपाट्याने झालेल्या विस्ताराकडे लक्ष वेधताना, स्थानिक होमस्टेंची( घरगुती पर्यटकनिवास) संख्या अंदाजे 150 वरून वाढून 3,000 पर्यंत पोहोचली आहे, असे मोदी यांनी नमूद केले.यासोबतच त्यांनी संरक्षित शेतीला सातत्याने दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनावर भर दिला, ज्याचा परिणाम म्हणून संपूर्ण प्रदेशात 11,000 ग्रीनहाऊस कार्यरत झाले आहेत. “यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत,” असे मोदी यांनी सांगितले.
आपल्या जवळच्या भागात न्यायदानाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या बऱ्याच काळापासून होत असलेल्या प्रादेशिक मागणीची दखल घेत, पंतप्रधानांनी घोषणा केली की सरकारने या वर्षी ऑगस्टमध्ये लडाखसाठी उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. ही अत्यंत महत्त्वाची संस्थात्मक गरज पूर्ण केल्याने नागरिकांसाठी प्रशासन आणि कायदेशीर उपाययोजना दोन्ही सुलभ होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “यामुळे प्रशासनासोबतच न्यायप्रणालीही अधिक सुलभ आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यातली होईल,” असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला .
हॉटेल्स,रेस्टॉरंट्स, होमस्टे आणि स्थानिक हस्तकलेसाठी आधुनिक व्यापाराला गती देण्यामध्ये डिजिटल संपर्कव्यवस्थेच्या भूमिकेवर भर देत, पंतप्रधानांनी केंद्रशासित प्रदेशातील दूरवरच्या भागांमध्ये भारतनेट आणि हाय-स्पीड इंटरनेटच्या विस्ताराची सविस्तर माहिती दिली. ई-गव्हर्नन्स, तरुणांसाठी ऑनलाइन शिक्षण आणि स्थानिक उद्योजकांसाठी जागतिक बाजारपेठेचे एकत्रीकरण सुरळीतपणे उपलब्ध व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आज ऑनलाईन व्यवसाय उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले करत आहेत,” असे मोदी यांनी नमूद केले.
तरुण पिढीला इतर शहरांमध्ये स्थलांतर करावे लागू नये, यासाठी त्यांच्या शैक्षणिक सक्षमीकरणाला प्राधान्य देत, पंतप्रधानांनी लेह येथे एका प्रमुख सेंटर ऑफ एक्सलन्सच्या उभारणीवर आणि त्याचबरोबर आयआयटी जम्मू व आयआयएम जम्मूच्या उपकेंद्रांच्या प्रस्तावांना पुढे नेण्यावर प्रकाश टाकला. या प्रमुख संस्था स्थानिक विद्यार्थ्यांना त्यांच्या दारातच प्रगत संशोधन आणि आधुनिक तांत्रिक कौशल्यांनी सुसज्ज करतील. "लडाखच्या तरुणांना त्यांच्याच प्रदेशात उच्च शिक्षण, संशोधन आणि नवीन कौशल्यांसाठी उत्तम संधी मिळतील, असे मोदींनी सांगितले.
आइस हॉकी, हिवाळी खेळ आणि गिर्यारोहण यांमध्ये स्थानिक तरुणांनी निर्माण केलेल्या वेगळ्या क्रीडा ओळखीची दखल घेत, पंतप्रधानांनी प्रादेशिक प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी लडाखच्या नवीन क्रीडा धोरणाच्या अंमलबजावणीचे स्वागत केले. स्थानिक खेळाडूंना जागतिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यास मदत करण्यासाठी जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण सुविधा पुरवण्याच्या प्रशासनाच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.आम्ही स्थानिक तरुणांना सुधारित प्रशिक्षण आणि सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, जेणेकरून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन उंची गाठू शकतील, असे मोदींनी सांगितले.
स्थानिक कारागीर आणि शेतकऱ्यांच्या अपवादात्मक कारागिरीची प्रशंसा करताना, पंतप्रधानांनी सांगितले की ते जर्मन चॅन्सलर, स्वीडिश पंतप्रधान आणि किर्गिझस्तानच्या राष्ट्रपतींना लडाखी उत्पादने वारंवार भेट म्हणून देत आले आहेत. तसेच, त्यांनी सी-बकथॉर्न, हस्तकला, जीआय-टॅग केलेले जर्दाळू, उंच प्रदेशातील व्यावसायिक पुष्पशेती आणि चांगपा समुदायाद्वारे तयार केलेल्या पारंपरिक पश्मिना यांच्या प्रचंड व्यावसायिक क्षमतेवर प्रकाश टाकला. त्यांनी यावर जोर दिला की सरकार पश्मिनाची जागतिक ओळख सक्रियपणे मजबूत करत आहे आणि प्रादेशिक वस्तूंसाठी बाजारपेठेतील ब्रँडिंगचा विस्तार करत आहे. येथील उत्पादनांना नवीन बाजारपेठा मिळाव्यात, त्यांचे ब्रँडिंग अधिक चांगले व्हावे आणि त्यांचे फायदे थेट उत्पादकांपर्यंत पोहोचावेत, हा आमचा प्रयत्न आहे असे मोदींनी सांगितले.
प्राचीन मठ, बौद्ध परंपरा आणि पूज्य कृशोक बाकुला रिनपोचे यांच्यापासून प्रेरित सणांच्या अमूल्य सांस्कृतिक वारशाचा सन्मान करत, पंतप्रधानांनी ऐतिहासिक शैलचित्रांचे संरक्षण करण्यासाठी लेह येथे भारतातील पहिल्या पेट्रोग्लिफ संवर्धन उद्यानाचे उद्घाटन केले. त्यांनी यावर जोर दिला की, हा वारसा जपल्याने भावी पिढ्या आणि जगभरातील पर्यटक या प्रदेशाच्या प्राचीनतेशी सखोलपणे जोडले जाऊ शकतील. देशातून आणि जगभरातून येणारे लोकही लडाखच्या समृद्ध इतिहासाशी परिचित होतील, असे मोदींनी स्पष्ट केले.
या प्रदेशाच्या वाटचालीबद्दल दृढ आशावाद व्यक्त करत आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी या प्रदेशाला अभूतपूर्व विकासात्मक टप्प्यांवर नेण्यासाठी सामूहिक कृतीवर आपला विश्वास पुन्हा व्यक्त केला. नव्याने सुरू झालेल्या पायाभूत सुविधांच्या कामांबद्दल त्यांनी नागरिकांना शेवटी अभिनंदन आणि पारंपरिक शुभेच्छा दिल्या. आपण सर्व मिळून लडाखला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊ, असे मोदींनी सांगितले.
राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/शैलेश पाटील/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2323995)
अभ्यागत कक्ष : 11