पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 15 ऑक्टोबर रोजी आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंच्या पथकाशी संवाद साधणार

Posted On: 14 OCT 2026 5:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 4:30 वाजता नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम येथे आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय पथकाशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करतील.

जपानमधील आयची-नागोया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले. भारताने 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह एकूण 85 पदके जिंकली. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सलग दुसऱ्यांदा पहिल्या पाच देशांमध्ये स्थान मिळवले. विविध क्रीडा प्रकारांमध्ये देशाची वाढती स्पर्धात्मक क्षमता यातून दिसून आली.

या स्पर्धेत भारताने अनेक उल्लेखनीय कामगिरी केल्या. त्यामध्ये रिकर्व्ह तिरंदाजीतील ऐतिहासिक कामगिरी, एकाच स्पर्धेत पुरुष आणि महिला हॉकी संघांनी सुवर्णपदके जिंकणे आणि सॉफ्ट टेनिस तसेच मिश्र मार्शल आर्ट्स  मध्ये पहिल्यांदा पदके मिळवणे यांचा समावेश आहे. इतर महत्त्वपूर्ण कामगिरींमध्ये महिला ट्रॅप प्रकारात भारताचे पहिलेवहिले सुवर्णपदक, 28 वर्षांच्या खंडानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक पटकावले आणि ग्रीको-रोमन कुस्तीमध्ये रौप्यपदक जिंकून या प्रकारात अंतिम फेरीतील भारतीय खेळाडूसाठी असलेली 64 वर्षांची प्रतीक्षा संपवली.

या कार्यक्रमाला भारतीय पथकातील खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अधिकारी, राष्ट्रीय क्रीडा महासंघांचे प्रतिनिधी तसेच युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित राहतील.


सुषमा काणे /राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2323391) अभ्यागत कक्ष : 9