युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वात युवा वर्गासाठी शारीरिक  तंदुरुस्तीविषयक  उपक्रम, अमली पदार्थविरोधी शपथ उपक्रम आणि 5.5 किमीची सायकल रॅली संपन्न


वाराणसीतील फिट इंडिया संडेज ऑन सायकल या उपक्रमाच्या 94 व्या आवृत्तीच्या माध्यमातून सर्वदूर पसरला विकसित भारतासाठी नशामुक्त युवा हा संदेश

Posted On: 11 OCT 2026 1:37PM by PIB Mumbai

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वात आज वाराणसी इथे आयोजित फिट इंडिया संडेज ऑन सायकल या उपक्रमाची 94 वी आवृत्ती संपन्न झाली. नशामुक्त युवा आणि अधिक आरोग्यसंपन्न भारताचा संदेश देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते. या रॅलीत 500 पेक्षा जास्त सायकलपटू आणि 1,000 पेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले होते. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा ही या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना होती. आज झालेल्या कार्यक्रमात जपानच्या ऐची नागोया इथे पार पडलेल्या आशियायी क्रीडा स्पर्धा 2026 मधील  प्राची चौधरी, पारुल चौधरी, जय कुमार आणि राज कुमार पाल हे पदकविजेते खेळाडू सहभागी झाले होते.

 

सकाळी 6.00 वाजता नमो घाट इथून या रॅलीचा प्रारंभ झाला. या उपक्रमाअंतर्गत हैदराबाद इथल्या कान्हा शांतिवनमच्या हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट इथे युवा व्यवहार संचालक डॉ. निवेदिता श्रेयांस यांच्या नेतृत्वाखाली ध्यानधारणा सत्राचे आयोजन केले गेले. आरोग्यसंपन्न आयुष्यासाठी शारीरिक तंदुरुस्तीसोबतच मानसिक आरोग्यही महत्त्वाचे असते ही बाब या सत्रातून अधोरेखित केली गेली. त्यानंतर कथ्थक सादरीकरण आणि झुम्बा सत्रही आयोजित करण्यात आले होते. या सत्रांमधून सांस्कृतिक अभिव्यक्ती, चळवळी आणि लोकसहभागाचा मिलाफ साधून  सर्वांगीण आरोग्याचा संदेश देण्यात आला.

 

वाराणसी इथल्या कार्यक्रमात डॉ. मांडविया यांनी उपस्थितांना संबोधित केले. युवा वर्गाने शारीरिक तंदुरुस्तीला आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवावे आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगिकार करावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मांडविया यांनी नशामुक्त समाजाचे महत्त्वही अधोरेखित केले. यावेळी मांडविया यांच्यासोबत उपस्थितांनी नशामुक्त भारतासाठी शपथ घेतली. यानंतर मांडविया यांनी नमो घाट ते संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठादरम्यान सायकल रॅलीचे नेतृत्व केले आणि वाराणसीच्या रस्त्यांवरून विकसित भारतासाठी नशामुक्त युवा हा संदेश सर्वदूर पोहोचवला.

 

या कार्यक्रमाच्या निमित्ताने जपानच्या ऐची नागोया इथे पार पडलेल्या आशियायी क्रीडा स्पर्धा 2026 पदकविजेत्यांचा सत्कार करत देशाच्या क्रीडा यशाचाही गौरव केला गेला. सत्कार झालेल्या या खेळाडूंमध्ये महिलांच्या 400 मीटर शर्यतीतील कांस्य पदकविजेती प्राची चौधरी, महिलांच्या 3000 मीटर अडथळ्याच्या शर्यतीतील तसेच 5000 मीटर शर्यतीतील दुहेरी कांस्य पदकविजेती पारुल चौधरी. 4x400 मीटर मिश्र रिले शर्यतीत रौप्य पदक आणि पुरुषांच्या 4x400 मीटर रिले शर्यतीत कांस्य पदक जिंकलेल्या जय कुमार याचा, तसेच सुवर्णपदक विजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा सदस्य राज कुमार पाल यांचा समावेश होता.

 

या खेळाडूंच्या उपस्थितीमुळे उपस्थितांमध्ये क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेचा पाया असलेली शिस्त, चिकाटी आणि निष्ठा या मूल्यांबद्दल जाणीव जागृती होण्यास मदत झाली. यातून सहभागी झालेल्या युवा वर्गाला शारीरिक तंदुरुस्तीचा तसेच आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगिकार करण्याची प्रेरणा मिळाली.

 

शारीरिक तंदुरुस्ती ही केवळ शारीरिक हालचालींपुरती मर्यादित नसून त्यामुळे शिस्त, मानसिक आरोग्य आणि जबाबदारीने निर्णय घेण्याला मदत करणारी  एक जीवनशैली आहे असा संदेशही , या 94 व्या आवृत्तीच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचला.

***

शैलेश पाटील/तुषार पवार/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2321977) अभ्यागत कक्ष : 7