रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय रेल्वेने पदवीधर स्तरावरील 3,548 एनटीपीसी पदांची केली घोषणा, तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी खुल्या



मालगाडी व्यवस्थापक पदासाठी सर्वाधिक 2,750 रिक्त जागा

पात्र उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सवलत, आरक्षणाचे लाभ आणि परीक्षा शुल्क परताव्याच्या तरतुदींसह गुणवत्तेवर आधारित निवड.

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 नोव्हेंबर 2026 

Posted On: 11 OCT 2026 11:16AM by PIB Mumbai

 

भारतीय रेल्वेने रेल्वे भरती मंडळाने (आरआरबीएस) जारी केलेल्या केंद्रीकृत रोजगार अधिसूचना (सीईएन) क्रमांक 06/2026 द्वारे बिगर तांत्रिक लोकप्रिय श्रेणीतील (एनटीपीसी–पदवीधर) भरती अंतर्गत पदवीधर स्तरावरील 3,548 रिक्त पदांची घोषणा केली आहे. ही भरती पात्र पदवीधरांना भारतीय रेल्वेमध्ये करिअर करण्याची आणि देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक सेवा संस्थांपैकी एक असलेल्या संस्थेच्या कामकाजात योगदान देण्याची संधी प्रदान करते.

या भरतीमध्ये मुख्य वाणिज्यिक तथा तिकीट पर्यवेक्षक, मालगाडी व्यवस्थापक, कनिष्ठ लेखा सहाय्यक तथा टंकलेखक आणि वरिष्ठ लिपिक तथा टंकलेखक या चार पदांचा समावेश आहे. ही पदे देशभरातील रेल्वे सेवांच्या कार्यक्षम कामकाजास साहाय्य करण्यासाठी वाणिज्यिक सेवा, रेल्वे संचालन, लेखा आणि प्रशासन या क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध करून देतात.

एकूण 3548 रिक्त जागांपैकी, 2750 जागा मालगाडी व्यवस्थापक पदासाठी, त्यानंतर 371 जागा वरिष्ठ लिपिक तथा टंकलेखकासाठी, 300 जागा कनिष्ठ लेखा सहाय्यक तथा टंकलेखक पदासाठी आणि 127 जागा मुख्य वाणिज्यिक तथा तिकीट पर्यवेक्षक पदासाठी आहेत. या रिक्त जागा पदवीधरांना रेल्वे संचालन आणि प्रशासनाच्या विविध कार्यात्मक क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी देतात.

या पदांसाठी सातव्या केंद्रीय वेतन आयोगाअंतर्गत प्रारंभिक मूळ वेतन दिले जाईल. मुख्य वाणिज्यिक तथा तिकीट पर्यवेक्षक पदासाठी वेतन स्तर 6 अंतर्गत दरमहा 35,400 रुपये इतके प्रारंभिक मूळ वेतन आहे, तर इतर तीन प्रवर्गांसाठी वेतन स्तर 5 अंतर्गत दरमहा 29,200 रुपये इतके प्रारंभिक मूळ वेतन आहे. संबंधित नियमांनुसार लागू होणारे भत्ते आणि सेवाशर्ती नियंत्रित केल्या जातील.

महत्त्वाच्या तारखा आणि पात्रता निकष

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 8 ऑक्टोबर 2026 रोजी सुरू झाली असून, पात्र उमेदवार 6 नोव्हेंबर 2026, रात्री 11:59 वाजेपर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात. परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 8 नोव्हेंबर 2026 आहे, तर अर्जात बदल करण्याची मुदत 9 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर 2026 पर्यंत आहे.

उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे. त्यांनी विहित पद-विशिष्ट पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. अधिसूचित वयोमर्यादा 1 जानेवारी 2027 रोजी 18-33 वर्षे असून, विहित नियमांनुसार पात्र प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत सवलत मिळेल.

पात्र पदवीधरांना सविस्तर अधिसूचनेचे अवलोकन करण्याचे, त्यांच्या पसंतीच्या पदांसाठीच्या आवश्यक पात्रता पडताळून पाहण्याचे आणि विहित मुदतीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले जात आहे.

गुणवत्तेवर आधारित निवड प्रक्रिया, पात्र उमेदवारांसाठी विविध सवलती 

निवड प्रक्रियेमध्ये पहिल्या टप्प्यातील संगणक-आधारित चाचणी (सीबीटी), दुसऱ्या टप्प्यातील संगणक-आधारित चाचणी, त्यानंतर लागू असेल त्याप्रमाणे कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश आहे. निवड प्रक्रिया गुणवत्तेवर आणि विहित पात्रता अटींच्या पूर्ततेवर आधारित असेल. भरती आराखड्यात विहित तरतुदींनुसार, लागू आरक्षण आणि वयोमर्यादेतील सवलतीचे लाभ, तसेच दिव्यांग पात्र उमेदवारांसाठी लेखनिक सहाय्य आणि परिक्षेसाठी अतिरिक्त वेळेची तरतूद देखील आहे.

सीईएन क्र. 06/2026 अंतर्गत आणखी एक तरतूद म्हणजे कनिष्ठ लेखा सहाय्यक तथा टंकलेखक आणि वरिष्ठ लिपिक तथा टंकलेखक या पदांसाठी संगणक-आधारित टंकलेखन कौशल्य चाचणीतून (सीबीटीएसटी) सूट देण्यात आली आहे. मात्र, उमेदवारांकडे संगणक आणि टंकलेखनाचे मूलभूत ज्ञान असणे अपेक्षित आहे. अधिसूचनेत नमूद केल्यानुसार, रुजू झाल्यानंतर या कौशल्याचे मूल्यांकन केले जाईल.

अधिकृत डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे भरतीबाबत माहिती उपलब्ध

उमेदवार रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून सविस्तर अधिसूचना, रिक्त पदांचे वितरण, पात्रता निकष आणि भरतीविषयक अद्यतने मिळवू शकतात:

आरआरबी अधिकृत वेबसाइट: https://rrb.indianrailways.gov.in

ऑनलाइन अर्ज पोर्टल: https://www.rrbapply.gov.in

उमेदवारांना सल्ला दिला जातो की त्यांनी भरती-संबंधित विश्वसनीय माहिती आणि अद्यतनांसाठी याच अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा.

***

नितीन फुल्लुके / श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2321933) अभ्यागत कक्ष : 11