युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
माय भारत–एनएसएसच्या ‘नशामुक्त युवा अभियान’च्या पहिल्या महिन्याची सांगता देशव्यापी ‘युवा संवाद मेळ्या’ने; 1.06 लाखांहून अधिक युवकांचा सहभाग
Posted On:
10 OCT 2026 4:35PM by PIB Mumbai
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने माय भारत आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांच्या माध्यमातून 9 ऑक्टोबर 2026 रोजी देशव्यापी ‘युवा संवाद मेळ्या’चे यशस्वी आयोजन केले. ‘माझे आरोग्य, माझा अभिमान’ या संकल्पनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या 100 आठवड्यांच्या संकल्प अभियानाच्या पहिल्या महिन्याची सांगता या उपक्रमाने झाली. देशभरातील निश्चित केलेल्या 200 संस्था आणि त्यांच्या दत्तक गावांमध्ये हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या माध्यमातून एकूण 1,06,855 सहभागींपर्यंत पोहोचण्यात आले. अंमली पदार्थांच्या गैरवापराला प्रतिबंध करण्याबाबत जागरूकता वाढवणे आणि निरोगी, व्यसनमुक्त समाजाला प्रोत्साहन देणे, या उद्देशाने युवक आणि समुदायातील सदस्यांना एकत्र आणण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या 15 प्रादेशिक संचालनालयांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या चौथ्या आठवड्यातील या उपक्रमात 200 संस्थांचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करण्यात आले. या उपक्रमात 93,662 युवक सहभागी झाले, तर गावांमध्ये आणि झोपडपट्टी वस्त्यांमध्ये आयोजित विशेष जनजागृती उपक्रमांद्वारे अतिरिक्त 13,193 नागरिकांपर्यंत पोहोचण्यात आले. केवळ पारंपरिक शपथविधी उपक्रमांपुरता मर्यादित न राहता, युवा संवाद मेळ्यात परस्परसंवादी चर्चा, जनजागृती आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीवर भर देण्यात आला. यामुळे अंमली पदार्थांच्या गैरवापराचे दुष्परिणाम यांवर माहितीपूर्ण चर्चा करण्यास प्रोत्साहन मिळाले.
या देशव्यापी उपक्रमात युवक संवाद, जनजागृती स्टॉल आणि सांस्कृतिक सादरीकरणे असे तीन प्रमुख घटक होते. युवक संवाद या घटकांतर्गत 509 परस्परसंवादी परिसंवाद आणि खुल्या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 36,086 युवकांनी सहभाग घेतला. अंमली पदार्थांच्या गैरवापरामागील मूळ कारणे, समवयस्कांचा दबाव आणि समुदायाच्या सहभागातून राबवता येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना यांवर चर्चा करण्यात आली. या चर्चांमध्ये प्राध्यापक आणि स्थानिक नेत्यांनीही सहभाग घेतला.
जनजागृती उपक्रमांतर्गत एनएसएस स्वयंसेवकांनी माहितीचा प्रसार करण्यासाठी 396 माहितीपर स्टॉल आणि किऑस्क उभारले. व्यसनाचे शारीरिक आणि मानसिक परिणाम यांविषयी माहिती देणे तसेच उपलब्ध समुपदेशन सुविधांची ओळख करून देणे, हा यामागील उद्देश होता. या उपक्रमांमध्ये 32,909 सहभागी सहभागी झाले.
या अभियानात सर्व लिंगांतील व्यक्तींचा लक्षणीय सहभाग दिसून आला. युवकांच्या सहभागाच्या आकडेवारीनुसार, 48,269 तरुणी आणि 45,618 तरुण सहभागी झाले. देशव्यापी जनजागृती मोहिमेत तरुणींचा सक्रिय सहभाग यातून दिसून येतो.
तळागाळातील जनसहभागाला डिजिटल मंचांच्या माध्यमातूनही चालना मिळाली. युवा दूतांनी #NashaMuktYuva या हॅशटॅगचा वापर करून समाजमाध्यमांवर 935 पोस्ट प्रसिद्ध केल्या.
पहिल्या महिन्याच्या यशस्वी सांगतेमुळे 100 आठवड्यांच्या संकल्प अभियानाच्या पुढील टप्प्यासाठी भक्कम पायाभरणी झाली आहे. दुसऱ्या महिन्यात ‘सुदृढ युवा, व्यसनमुक्त युवा’ या संकल्पनेअंतर्गत शारीरिक तंदुरुस्ती आणि क्रीडा यांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. युवकांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि अंमली पदार्थांच्या गैरवापराला प्रतिबंध करण्यासाठी शारीरिक हालचालींचे महत्त्व अधोरेखित करणे, हा या टप्प्याचा उद्देश आहे.
***
शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2321825)
अभ्यागत कक्ष : 17