राज्यसभा सचिवालय
राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संसदीय शिष्टमंडळाने 9 ऑक्टोबर 2026 रोजी टांझानियातील अरुशा येथे झालेल्या आंतर-संसदीय संघाच्या (आयपीयू) 153 व्या सभेच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी घेतला सहभाग.
Posted On:
10 OCT 2026 1:10PM by PIB Mumbai
हरिवंश आणि शिष्टमंडळातील सदस्यांनी आंतर-संसदीय संघाच्या (आयपीयू) प्रशासकीय परिषदेच्या बैठकीला उपस्थिती लावली. या बैठकीत आंतर-संसदीय संघाच्या अध्यक्षांची निवड आणि विशेष बैठकांचे अहवाल यांसह उर्वरित विषयांवर चर्चा करण्यात आली.
आंतर-संसदीय संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारताला देण्यात आलेल्या 3 मतांचा वापर राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, लोकसभेचे खासदार अनुराग सिंह ठाकूर आणि लोकसभेच्या खासदार कमलजीत सहरावत यांनी केला.
गुप्त मतदानाद्वारे झालेल्या निवडणुकीनंतर, विद्यमान आयपीयू अध्यक्षांनी ऑस्ट्रेलियाच्या प्रतिनिधीगृहाचे अध्यक्ष मिल्टन डिक यांची आंतर-संसदीय संघाच्या पुढील अध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषित केले. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच हरिवंश आणि भारतीय संसदीय शिष्टमंडळातील इतर सदस्यांनी डिक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि आयपीयू अध्यक्ष म्हणून त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर, राज्यसभेचे खासदार डॉ. सस्मित पात्रा यांनी लोकसभेचे माननीय अध्यक्ष यांचे अभिनंदनपर पत्र मिल्टन डिक यांना सुपूर्द केले. प्रशासकीय परिषदेची बैठक संपल्यानंतर, सभेच्या अधिवेशनात अरुशा जाहीरनाम्याला मंजुरी देण्यात आली. तसेच, ‘सर्वांसाठी सर्वसमावेशक सामाजिक विकास : दिव्यांग व्यक्तींचे हक्क आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी संसदीय धोरणे’ या विषयावरील लोकशाही आणि मानवाधिकारविषयक स्थायी समितीने सादर केलेल्या ठरावाला मंजुरी देण्यात आली.
याशिवाय, ‘हवामानाशी संबंधित आपत्तींचा सामना करण्यासाठी आणि हिमालयीन क्षेत्रासह इतर असुरक्षित प्रदेशांमध्ये आपत्तींचा सामना करण्याची क्षमता बळकट करण्यासाठी तातडीची संसदीय कृती’ या आपत्कालीन विषयावरील ठरावालाही मंजुरी देण्यात आली.
त्यानंतर, टांझानियाच्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष आणि सभेचे अध्यक्ष मुसा अझान झुंगू यांनी सभेच्या समारोपाची घोषणा केली. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संसदीय शिष्टमंडळाने 5 ते 9 ऑक्टोबर 2026 या कालावधीत टांझानियातील अरुशा येथे झालेल्या आंतर-संसदीय संघाच्या (आयपीयू) 153 व्या सभेत सहभाग घेतला. शिष्टमंडळाचा सहभाग महत्त्वपूर्ण आणि प्रभावी ठरला. तसेच, आयपीयू सभेतील ठराव आणि निष्कर्षांमध्ये शिष्टमंडळाने योगदान दिले.

***
शैलेश पाटील/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2321712)
अभ्यागत कक्ष : 17