कृषी मंत्रालय
भारत आणि घाना दरम्यान प्रगत कृषि संशोधन, शिक्षण आणि तंत्रज्ञान आदान-प्रदान संबंधित ऐतिहासिक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
Posted On:
07 OCT 2026 7:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2026
नवी दिल्लीतील भारतीय कृषि संशोधन परिषद आणि घानातील आक्रा येथील पिके संशोधन संस्था यांच्यादरम्यान कृषि संशोधन, शिक्षण आणि तंत्रज्ञान आदान-प्रदान या क्षेत्रांत सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमुळे या क्षेत्रांतील भारत आणि घाना यांच्यातील सहकार्य अधिक दृढ झाले आहेत.
पाच वर्षांसाठी करण्यात आलेल्या या करारांमुळे संयुक्त कृषि संशोधन, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचे आदान-प्रदान, क्षमता बांधणी आणि कृषि तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यापारीकरण या क्षेत्रांतील सहकार्यासाठी एक चौकट उपलब्ध झाली आहे. घानातील अरिमा फार्म्स या कंपनीने या सहकार्यासाठी पुढाकार घेतला असून, या कराराअंतर्गत विशिष्ट संशोधन आणि व्यापारीकरण उपक्रमांसाठी 'CSIR-CRI'चा व्यावसायिक भागीदार म्हणून त्यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे.
या सहकार्याच्या पहिल्या टप्प्यात भाजीपाला पिकांवरील संशोधनावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येईल. त्यात विशेषकरून टोमॅटो संशोधन आणि विकासावर भर देण्यात येईल. या सहकार्यांतर्गत, घानातील टोमॅटोच्या देशांतर्गत उत्पादनात वाढ व्हावी यासाठी मदत म्हणून, सिद्ध झालेल्या कृषी तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यास तसेच योग्य आणि अधिक उत्पादन देणाऱ्या टोमॅटोच्या वाणांची आणि प्रकारांची ओळख करून देण्यास ICAR (भारतीय कृषी संशोधन परिषद) सहकार्य करेल.
या भागीदारीद्वारा, कृषि मूल्य साखळी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने, कसावा (साबुदाणा कंद), रताळी आणि इतर कंदवर्गीय पिकांवर प्रक्रिया आणि त्यांचे मूल्यवर्धन करण्यावरही लक्ष्य केंद्रित करण्यात येणार आहे. या सहकार्य करारात पीक काढणी पश्चात करायच्या व्यवस्थापनाचाही समावेश असेल. यात, पीक काढणीनंतर होणारे नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने शीतगृहे, वातानुकूलित वाहतूक, तसेच मालाची वर्गवारी, प्रतवारी आणि प्रक्रिया तंत्रज्ञान यांबाबत तांत्रिक सहाय्य आणि क्षमता बांधणी यांचा समावेश असेल.
या सामंजस्य करारामध्ये शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ, जननद्रव्य (germplasm) आणि बियाणे लागवडीचे साहित्य, वैज्ञानिक माहिती, कार्यपद्धती आणि तांत्रिक ज्ञान यांच्या आदान-प्रदानासोबतच सहयोगी संशोधन प्रकल्पांचा विकास आणि अंमलबजावणी करण्याची तरतूद आहे.
सुषमा काणे/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2320360)
अभ्यागत कक्ष : 10