अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

भारताच्या युरेनियम उत्खनन आणि प्रक्रिया क्षमतेच्या सहा दशकांच्या वाटचालीनिमित्त युसीआयएलकडून हीरक महोत्सवी वर्ष

Posted On: 05 OCT 2026 8:31AM by PIB Mumbai
  • अणुऊर्जा विभागाअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, युसीआयएलची स्थापना 4 ऑक्टोबर 1967 रोजी झाली. यानिमित्त आणि भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमातील आपल्या योगदानानिमित्त युसीआयएल हीरक महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. 
  • सीमा जैन, सदस्य-वित्त, अणुऊर्जा आयोग,  झारखंडमधल्या जादुगोडा येथे झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी 'टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन पायलट प्लांट'ला तसेच अणुऊर्जा विभागाची  अनुदानित संस्था असलेल्या 'साहा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर फिजिक्स'च्या प्रस्तावित 'डार्क मॅटर लॅबोरेटरी'च्या स्थानाला भेट दिली.
  • पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका आगळ्यावेगळ्या कार्यशाळेमुळे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना  युसीआयएलचे कार्य प्रत्यक्ष जाणून घेण्याची संधी मिळाली.
  • शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या अणुऊर्जा विभागाच्या विशेष तंत्रज्ञान प्रदर्शनात अणुऊर्जेचे औद्योगिक आणि सामाजिक उपयोग प्रदर्शित करण्यात आले.
  • हीरकमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये, भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमात युसीआयएलचे ऐतिहासिक आणि निरंतर योगदान,  यासोबतच युसीआयएलची युरेनियम उत्खनन आणि प्रक्रिया क्षेत्रात विकसित होत जाणाऱ्या क्षमतांचे प्रतिबिंबही उमटले. 

अणुऊर्जा विभागाअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (युसीआयएल) 4 ऑक्टोबर 2026 रोजी हीरक महोत्सवी वर्ष सोहळा साजरा केला.  युरेनियम उत्खनन आणि प्रक्रिया क्षेत्रातील आपली सहा दशकांची वाटचाल आणि भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमात महत्त्वपूर्ण योगदान यांचे स्मरण यानिमित्त करण्यात आले. 

झारखंडमधल्या जादुगोडा येथे आयोजित या कार्यक्रमात वरिष्ठ अधिकारी, शास्त्रज्ञ, अभियंते, तांत्रिक कर्मचारी, इतर कर्मचारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि संबंधित घटक एकत्र आले होते. युसीआयएलच्या संस्थात्मक वाटचालीतला हा महत्त्वाचा टप्पा साजरा करणे आणि भविष्यातील संधी व सामायिक जबाबदाऱ्यांचा आढावा घेणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

या कार्यक्रमाला, अणुऊर्जा आयोगाच्या वित्त सदस्य सीमा जैन,  प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी C, R&D विभागातील 'टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन पायलट प्लांट'ला तसेच जादुगोडा भूमिगत खाणीतील 815-मीटर खोलीवर प्रस्तावित 'डार्क मॅटर लॅबोरेटरी'च्या  नव्या स्थानाला भेट दिली.

सीमा जैन यांनी कार्यक्रमाला संबोधित केले. त्या म्हणाल्या, '' युसीआयएलचे हीरक महोत्सवी वर्ष वैज्ञानिक क्षमता, संस्थात्मक अनुभव आणि राष्ट्रासाठी केलेली समर्पित सेवा यांचा सहा दशकांचा उत्सव आहे. तसेच, डॉ. होमी जहांगीर भाभा आणि भारताच्या युरेनियम उत्खनन व प्रक्रिया क्षमतांचा पाया रचणाऱ्या अग्रदूतांना आदरांजली वाहण्याची ही एक संधी आहे. जमिनीच्या उदरातून ते व्यापक अणुऊर्जा कार्यक्रमापर्यंतच्या प्रवासात, युरेनियम उत्खनन आणि प्रक्रियेमध्ये स्वदेशी क्षमता विकसित करण्यात युसीआयएलने महत्त्वपूर्ण आणि जबाबदारीची भूमिका बजावली आहे. या सहा दशकांच्या काळात, यूसीआयएल कर्मचाऱ्यांच्या अनेक पिढ्यांनी आव्हानात्मक परिस्थिती आणि वातावरणात काम करून, या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमाला अविरतपणे पुढे नेण्यासाठी उल्लेखनीय निष्ठा आणि जिद्द दर्शविली आहे. भारत अणुऊर्जेकडे एक महत्त्वपूर्ण योगदान क्षेत्र म्हणून पाहत असताना, हा टप्पा, या प्रवासाला बळ देणारे लोक, तंत्रज्ञान आणि प्रणाली यांची दखल घेण्याची आणि आत्मविश्वासाने भविष्याकडे पाहण्याची एक संधी आहे."
अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजितकुमार मोहंती यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले, '' युसीआयएलच्या योगदानाची दखल घेण्याचे आणि भारत अणुऊर्जा अभियानात प्रगती करत असताना निरंतर नवोन्मेष आणि क्षमता बांधणीचे महत्त्व पुन्हा अधोरेखित करण्याची संधी, हा हीरक महोत्सवी वर्ष सोहळा आहे.''

पत्रकारांसाठी नरवापहार माहिती केंद्र  येथे आयोजित कार्यशाळा, हे हीरक महोत्सवी वर्ष सोहळा कार्यक्रमाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ठ्य ठरले. यासोबतच अणुऊर्जा विभागाच्या  विविध केंद्र आणि संस्थांमधून विकसित झालेले तंत्रज्ञान व उपयोजने दर्शवणारे डीएई तंत्रज्ञान प्रदर्शनदेखील लक्षवेधी ठरले. 

या कार्यशाळेमुळे भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमातल्या व्यक्ती, विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयी अधिक जाणून घेण्याची संधी सहभागी माध्यम प्रतिनिधींना मिळाली. शास्त्रज्ञ, अभियंते आणि तांत्रिक तज्ज्ञांशी संवाद साधण्याची आणि अणु व किरणोत्सार तंत्रज्ञानाच्या व्यापक परिसंस्थेचा भाग असलेल्या विविध तंत्रज्ञान, प्रणाली व उपयोजनांविषयी सखोल माहिती मिळवण्याची संधी त्यांना या कार्यशाळेतून मिळाली.

माध्यम प्रतिनिधींनी यूसीआयएलच्या युरेनियम खाणकाम आणि धातुक प्रक्रिया सुविधांना भेट देऊन खाणकामाच्या कार्यपद्धती, खनिज हाताळणी व प्रक्रिया प्रणाली, तसेच कार्यस्थळी अवलंबण्यात येणारे तंत्रज्ञान आणि कार्यपद्धती याविषयी प्रत्यक्ष जाणून घेता आले. 

युसीआयएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.कचम आनंद राव म्हणाले, ''युसीआयएल कुटुंबातल्या प्रत्येकासाठी हीरक महोत्सवी वर्ष अभिमानाचा क्षण आहे. गेल्या सहा दशकांहून अधिक काळात, यूसीआयएलने युरेनियम उत्खनन आणि प्रक्रियेमध्ये सातत्याने कौशल्य व पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत. त्याचसोबत  तंत्रज्ञान, सुरक्षा आणि पर्यावरण व्यवस्थापन या क्षेत्रांतील आपली क्षमताही अधिक बळकट केली आहे. या निमित्ताने आमचे कामकाज आणि सुविधा प्रसारमाध्यमांसाठी खुल्या करताना आम्हाला विशेष आनंद झाला. 'पत्रकार कार्यशाळा' आणि 'डीएई  तंत्रज्ञान प्रदर्शन' यांच्या माध्यमातून, आमच्या कामकाजामागील विज्ञान, तंत्रज्ञान आणि या कार्याशी संबंधित व्यक्तींविषयी, तसेच अणुऊर्जा विभागाच्या व्यापक योगदानाविषयी प्रत्यक्ष जाणून घेण्याची संधी दिली."

युसीआयएलची स्थापना 1967 मध्ये झाली असून, युसीआयएल भारताचा स्वदेशी युरेनियम उत्खनन आणि परकीय क्षमता विकासात अविभाज्य भाग आहे. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांचा आधार यूसीआयएलने पुरवला आहे. हीरक महोत्सवी वर्ष कार्यक्रमाच्या निमित्ताने  भूमिगत आणि खुल्या खाणकामापासून खनिज प्रक्रिया, तंत्रज्ञान विकास, व्यावसायिक सुरक्षा, किरणोत्सारापासून संरक्षण आणि पर्यावरण व्यवस्थापनापर्यंतच्या विशेषीकृत राष्ट्रीय क्षमतेच्या विकासाचा प्रवास अधोरेखित झाला.

सहा दशकांचा अनुभव. क्षमतावृद्धीसाठी निरंतर वचनबद्धता आणि भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या भविष्यातील वाटचालीसाठी नव्या जोमाने सुरू झालेला प्रवास.... प्रवास युरेनियमच्या अग्रणी वाटेवरचा.

***

Nehakulkarni / SonaliKakde / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2319036) अभ्यागत कक्ष : 16