आयुष मंत्रालय
स्वच्छता ही सेवा 2026 अभियानाची एआयआयए येथे सांगता; विशेष अभियान 6.0 31 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार
Posted On:
04 OCT 2026 10:08AM by PIB Mumbai
नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने (एआयआयए) 2 ऑक्टोबर 2026 रोजी स्वच्छता ही सेवा (एसएचएस) अभियान 2026 ची सांगता केली. एआयआयएच्या स्वस्थवृत्त आणि योग विभागाने आयोजित केलेले हे अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2026 या कालावधीत “स्वच्छतेत सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत” या संकल्पनेअंतर्गत राबवण्यात आले. संस्थेच्या परिसरात आणि आजूबाजूच्या भागात स्वच्छता, जबाबदार कचरा व्यवस्थापन, पर्यावरणविषयक जागरूकता आणि समुदायाचा सहभाग वाढवण्यावर या अभियानात भर देण्यात आला.
सांगता कार्यक्रमाला एआयआयएचे संचालक प्रा. (डॉ.) पी. के. प्रजापती, डीयूच्या अधिष्ठाता प्रा. (डॉ.) मंजुषा राजगोपाल, संशोधन अधिष्ठाता प्रा. (डॉ.) राजगोपाल, एएमएस डॉ. राजा राम महतो तसेच संस्थेतील प्राध्यापक उपस्थित होते.
सांगता कार्यक्रमाचा एक भाग म्हणून एआयआयएच्या संपूर्ण परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. उपस्थितांना संबोधित करताना एआयआयएचे संचालक प्रा. (डॉ.) पी. के. प्रजापती यांनी स्वच्छता आणि आरोग्यविषयक स्वच्छता ही सर्वांची सामाईक जबाबदारी असल्याचे सांगितले आणि प्रत्येकाने स्वच्छतेला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचे आवाहन केले.
एआयआयएच्या सहभागी सदस्यांना स्वच्छतेची शपथही देण्यात आली. शिक्षक, संशोधक आणि कर्मचाऱ्यांनी स्वच्छता आणि आरोग्यविषयक स्वच्छता कायम राखण्याची, जबाबदारीने कचरा व्यवस्थापन करण्याची तसेच स्वच्छ, निरोगी आणि शाश्वत पर्यावरण राखण्यासाठी योगदान देण्याची शपथ घेतली.
संस्थेतील स्वच्छता आणि आरोग्यविषयक स्वच्छता कायम राखण्यासाठी समर्पित आणि सातत्यपूर्ण योगदान दिल्याबद्दल सफाई मित्रांचा सत्कार करण्यात आला.
विभागाच्या वतीने ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत एनटीपीसी परिसरात वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेतून पर्यावरणाचे रक्षण आणि समुदाय सहभाग यांना प्रोत्साहन देण्यात आले. या वृक्षारोपण मोहिमेत प्रा. डॉ. मंजुषा राजगोपाल, प्रा. डॉ. महेश व्यास, अधिष्ठाता, प्रा. डॉ. राजगोपाल, संशोधन अधिष्ठाता आणि डॉ. राजा राम महतो, एएमएस यांच्यासह एआयआयएचे वरिष्ठ प्राध्यापक, संशोधक आणि कर्मचारी सहभागी झाले. या सहभागातून स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणासाठी संस्थेची बांधिलकी दिसून आली.
दोन आठवडे चाललेल्या या मोहिमेत प्राध्यापक, पीएच.डी.चे विद्यार्थी, पदव्युत्तर विद्यार्थी, कर्मचारी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या काळात रुग्णालयातील प्रतीक्षालयांमध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये कचऱ्याचे चार प्रकारे वर्गीकरण, घरच्या घरी कंपोस्ट खात तयार करणे, वस्तूंचा वापर कमी करणे, पुनर्वापर आणि पुनर्चक्रण याबाबत माहिती देण्यात आली. तसेच, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले.
श्रमदान उपक्रमांतर्गत संस्थेच्या कार्यालय परिसरासह इमारतीच्या विविध भागांची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमातून स्वेच्छेने सेवा करण्याची आणि सामूहिक जबाबदारीची भावना बळकट करण्यात आली. तसेच, संस्थेच्या परिसरातील आणि आजूबाजूच्या विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छ आणि निरोगी परिसर राखणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याबाबत जनजागृती करणे, हा या मोहिमेचा उद्देश होता.
विशेष मोहीम 6.0 अंतर्गत संस्थेच्या वतीने स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनासाठीचे काम पुढेही सुरूच ठेवण्यात येणार आहे. 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत ही मोहीम राबवण्यात येणार असून, ई-कचऱ्याचे योग्य संकलन, वर्गीकरण आणि विल्हेवाट ही या मोहिमेची संकल्पना आहे.



***
आशिष सांगळे/गजेंद्र देवडा /राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2318894)
अभ्यागत कक्ष : 18